Current Affairs of 30 November 2015 For MPSC Exams
चालू घडामोडी (30 नोव्हेंबर 2015)
पी.व्ही.सिंधूने पटकावले मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद :
- दोन वेळच्या विजेत्या पी. व्ही. सिंधूने सलग तिसऱ्यांदा मकाऊ बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
- जागतिक क्रमवारीत बाराव्या असलेल्या सिंधूने अप्रतिम स्ट्रोक्स; तसेच मोक्याच्या वेळी बहारदार रॅली करीत तीन गेममध्ये बाजी मारली.
- तसेच तिने निर्णायक लढतीत जपानच्या मिनात्सु मितानी हिचा 21-9, 21-23, 21-14 असा पाडाव केला.
Must Read (नक्की वाचा):
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ योजनेची घोषणा :
- असहिष्णुतेच्या मुद्द्यावर देशभरात सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या योजनेला मूर्त रूप देण्याची घोषणा केली.
- पंतप्रधान मोदींनी 31 ऑक्टोबरला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ अभियानाचे सुतोवाच केले होते.
- देशात ऐक्याचा प्रवाह सदैव वाहता राहावा यासाठी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही योजना राबविली जाणार आहे.
- या योजनेची रूपरेषा, जनतेची भागीदारी याबाबतच्या सूचना, अभिप्राय ‘मायजीओव्ही’ या वेबसाइटवर पाठवाव्यात, असेही आवाहन केले होते.
लोकपाल विधेयकाचा मसुदा संसदीय समितीने तयार केला :
- तब्बल वर्षभरापासून रखडलेल्या बहुचर्चित लोकपाल विधेयकाचा मसुदा संसदीय समितीने तयार केला असून, या मसुद्याची अंतिम प्रत पुढील महिन्यात राज्यसभेत सादर करण्यात येईल.
- काँग्रेसचे खासदार ई. एम. सुदर्शन नचिप्पन यांच्या अध्यक्षतेखालील 31 सदस्यीय जनलवाद, कायदा आणि न्यायविषयक समितीने लोकपाल, लोकायुक्त आणि अन्य दुरुस्तीविषयक विधेयक-2014 चा सखोल अभ्यास केला होता.
- या सर्व सदस्यांचे मत लक्षात घेतल्यानंतर 10 डिसेंबरपूर्वीच यासंबंधीचा अंतिम अहवाल राज्यसभेत सादर केला जाणार आहे.
- तसेच मागील वर्षी 18 डिसेंबर रोजी सुधारित विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले होते. त्यानंतर ते समितीकडे पाठविण्यात आले. यावर्षी 25 मार्चपर्यंत समितीने या विधेयकावर आपले मत नोंदविणे अपेक्षित होते. राज्यसभेचे अध्यक्ष हमीद अन्सारी यांच्याकडे यासंबंधीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
पॅरिसमध्ये आजपासून जागतिक हवामान बदलांविषयक परिषदेला सुरूवात :
- पॅरिसमध्ये आजपासून सुरू होत असलेल्या जागतिक हवामान बदलांविषयक परिषदेला अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह देशोदेशीचे नेते उपस्थित राहणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीही या परिषदेसाठी पॅरिसला रवाना झाले आहेत. या परिषदेत भारत सरकार अपारंपरिक ऊर्जास्रोतांबाबत ग्रॅंड प्लॅन सादर करणार आहे.
- परिषदेच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलॉंद यांच्यामध्ये 122 करार होणार असून, मोदी आणि बराक ओबामा यांच्यामध्येही चर्चा होणे अपेक्षित आहे.
- तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून भारताने हवामान बदलांविषयीचा कृती आराखडा सादर केला होता.
भारताची परिषदेतील भूमिका :
- सौर महाआघाडीची स्थापना
- हवामानविषयक न्याय्य करार
- तंत्रज्ञान हस्तांतरण आणि भागीदारीसाठी बळ देणे
- विकसित देशांकडून तंत्रज्ञान आणि निधी मिळविण्यावर भर
- परवडणाऱ्या किमतीत हवामान तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी आग्रही
- 2030 पर्यंत कार्बन उत्सर्जन 2-3 अब्ज टनांनी घटविण्याचा प्रस्ताव
- परंपरा, संवर्धन आणि सुधारणांवर आधारित निरोगी आणि शाश्वत जगण्याचा प्रस्ताव
- श्रीमंत देशांकडून निधी गोळा करून त्याचा सदुपयोग करणे
संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत :
- संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
- वयाच्या साठीनंतर लोकांनी आपल्या निवृत्तीचा विचार करायला हवा. मी येत्या 13 डिसेंबरला साठ वर्षांचा होतोय. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच यासंदर्भात विचार करणं सुरू केलं होतं, असे मनोहर पर्रिकर गोव्यातील मापुसा शहरात लोकमान्य को-ऑपरेटीव्ह सोसायटीच्या कार्यक्रमात म्हणाले.
जपानचे भारताला रेल्वेसाठी कर्ज देण्याचे जाहीर :
- जपानने भारताला चेन्नई व अहमदाबाद मेट्रो रेल्वेसाठी 5479 कोटी रूपयांचे कर्ज देण्याचे जाहीर केले आहे, असे अर्थ मंत्रालयाने सांगितले.
- दोन्ही देशांनी या करारावर आधीच स्वाक्षऱ्या केल्या असून चेन्नई मेट्रोला 1069 कोटी तर अहमदाबाद मेट्रोला 4410 कोटी रूपये कर्ज देण्यात आले आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
- काही वर्षांत भारत-जपान यांचे आर्थिक सहकार्य वाढले असून त्यात धोरणात्मक भागीदारीचा सहभाग वाढला आहे. भारत व जपान यांच्यात आर्थिक कामकाज सचिव एस. सेल्वाकुमार व जपानचे उपराजदूत युकाटा किकुटा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
दिनविशेष :
- लोकशिक्षण दिन
- बालक हक्क दिन
- 1917 : युक्रेन प्रजासत्ताक झाले.
- 1984 : सेटीची स्थापना.
- 1985 : मायक्रोसॉफ्टने मायक्रोसॉफ्ट विन्डोज 1.0 ही संगणक-प्रणाली प्रसिद्ध केली.
- 1998 : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचा पहिला भाग प्रक्षेपित.