चालू घडामोडी (30 ऑक्टोबर 2017)
देशातील सर्वांत श्रीमंत प्रादेशिक पक्ष ‘द्रमुक’ :
- देशातील 47 प्रादेशिक राजकीय पक्षांमध्ये तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) सर्वांत श्रीमंत पक्ष ठरला आहे. आर्थिक वर्ष 2015-16 दरम्यान त्यांच्याकडे 77.63 कोटी रूपयांची देणगी प्राप्त झाली होती.
- तामिळनाडूमध्ये द्रमुक प्रमुख विरोधी पक्ष आहे. तर सत्ताधारी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना 54.93 कोटी रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
- तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी पक्ष तेलुगु देशम पार्टी (टीडीपी) आहे. त्यांचे 2015-16 मधील एकूण उत्पन्न हे 15.97 कोटी रूपये इतके होते.
- असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (एडीआर) प्रादेशिक पक्षांच्या उत्पन्नाचे विश्लेषण करून एक अहवाल सादर केला असून त्यात हा दावा करण्यात आला आहे.
17 वर्षांखालील फिफा विश्वचषक विजेता संघ इंग्लंड :
- जगभरातील गुणवान युवा फुटबॉलपटूंनी भारतात पहिल्यांदाच पार पडलेल्या 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेत आपले कौशल्य दाखवले.
- इंग्लंड संघाने जबरदस्त खेळ करताना पिछाडीवरुन बाजी मारताना स्पेनच्या हातून विश्वचषक हिसकावून घेतला. दरम्यान, देशातील सहा शहरांमध्ये झालेल्या स्पर्धेतील विविध सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीसह स्पर्धेत नोंदवलेल्या गोलच्या बाबतीतही यजमान म्हणून भारताने विश्वविक्रम नोंदवले.
- चौथ्यांदा अंतिम फेरी गाठलेल्या इंग्लंड संघाने आपल्या स्टार खेळाडूंच्या जोरावर पहिल्यांदाच 17 वर्षांखालील फिफा विश्वचषक पटकावण्याची कामगिरी केली.
- विशेष म्हणजे आतापर्यंत झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेपैकी हा अंतिम सामना सर्वात रोमांचक झाल्याचे मत अनेक फुटबॉलप्रेमींनी व्यक्त केले.
- तसेच या स्पर्धेच्या निमित्ताने पहिल्यांदाच युरोपियन देशांमध्ये विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना झाला. विशेष म्हणजे इंग्लंडने या जेतेपदासह यंदाच्या वर्षी झालेल्या 17 वर्षांखालील युरो चषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात झालेल्या पराभवाचा कमीही भरून काढली.
भारताने मलेशियाला नमवत जिंकले कांस्यपदक :
- विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने यजमान मलेशियाचा 4-0 असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.
- तमन दया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत भारताकडून अंतिलने 15 व्या आणि 25 व्या मिनिटाला असे दोन गोल केले.
- भारताला विवेक प्रसादने 11 व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली, तर शैलानंद लाकडाने 21 व्या मिनिटाला संघाकडून तिसरा गोल केला. अशा प्रकारे भारताने कास्यपदक जिंकताना या स्पर्धेचा समारोप केला.
औरंगाबाद शहराचे 22 वे महापौर नंदकुमार घोडेले :
- ऐतिहासिक औरंगाबाद शहराचे 22 वे महापौर म्हणून 29 ऑक्टोबर रोजी सेनेचे नंदकुमार घोडेले सर्वाधिक 77 मते मिळवून महापौरपदी विराजमान झाले.
- भाजपचे विजय औताडेही तेवढेच मताधिक्य घेऊन उपमहापौरपदी अरूढ झाले. सेना-भाजप युतीकडे फक्त 50 मते असताना त्यांनी छोट्या-छोट्या पक्षांना सुरुंग लावत, अपक्षांच्या मदतीने विजयाचा कळस चढविला.
- महापालिकेच्या इतिहासात आजपर्यंत एवढे मोठे मताधिक्य कोणत्याच उमेदवाराला मिळाले नाही, हे विशेष.
- महापालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना-भाजप युतीचा भगवा फडकताच हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून फटाक्यांची आतषबाजी करून दिवाळी साजरी केली.
- महापौर, उपमहापौर निवडणुकीच्या निमित्ताने मागील एक महिन्यापासून सेना-भाजप युतीमध्ये नाट्यमय ‘घडामोडी’ सुरू होत्या. त्यामुळे यंदा निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकतो किंवा नाही, अशी शक्यता निर्माण झाली होती.
जमनालाल बजाज फाउंडेशनचे पुरस्कार प्रदान :
- जमनालाल बजाज फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना पुरस्कार प्रदान करत गौरव केला जातो.
- संस्थेचे यंदाचे 40वे वर्ष असून, यंदा ग्रामीण विकास विज्ञान समितीचे शशी त्यागी, सलाम बालक ट्रस्टच्या संचालिका डॉ. प्रवीण नायर, अल-अक्सा विद्यापीठाच्या फ्रेंच विभागाचे संचालक डॉ. झियाद मेदुख आणि जन स्वास्थ सहयोग (संस्था) यांना, जमनालाल बजाज फाउंडेशनच्या वेगवेगळ्या विभागातील पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
- 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता कुलाबा येथे पार पडलेल्या सोहळ्यात अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले.
- तसेच या वेळी जमनालाल बजाज फाउंडेशनच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, फाउंडेशनच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष सी.एस. धर्माधिकारी उपस्थित होते.
- विधायक कार्य विभागामध्ये अभूतपूर्व योगदानाबद्दलचा पुरस्कार ग्रामीण विकास समितीचे सचिव शशी त्यागी यांना प्रदान करण्यात आला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा