Current Affairs of 31 July 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (31 जुलै 2017)
न्यायालयाकडून मोहटा देवस्थानला माहिती अधिकार लागू :
- मोहटा देवस्थान ट्रस्ट शासकीय अनुदान घेत असल्याने या देवस्थानला माहिती अधिकार लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा जिल्हा न्यायालयातील अपिलीय अधिकारी तथा जिल्हा न्यायाधीश एस.व्ही. माने यांनी दिला आहे.
- जिल्हा न्यायाधीशांनी अध्यक्ष म्हणून या देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली, ही माहिती मागणारा अर्ज देवस्थानकडे वर्ग करण्याचा आदेशही माहिती अधिकार्याला देण्यात आला आहे.
- जिल्हा न्यायाधीश हे जगदंबा देवी ट्रस्ट या संस्थेचे अध्यक्ष असतात. अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधीशांनी सन 2015, 2016 व 2017 या कार्यकाळात देवस्थानच्या किती बैठकांना हजेरी लावली.
- तसेच गत 11 जानेवारीला देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीला विद्यमान अध्यक्ष सुवर्णा केवले या उपस्थित होत्या का? याबाबतची माहिती जिल्हा न्यायालयाकडे माहिती अधिकारात मागण्यात आली होती.
Must Read (नक्की वाचा):
प्रख्यात व्यंगचित्रकार बळी लवंगारे कालवश :
- प्रख्यात व्यंग्यचित्रकार बळी लवंगारे (वय 67 वर्षे) यांचे 30 जुलै रोजी कुर्ला-नेहरूनगर येथील राहत्या घरी निधन झाले.
- काळाचौकी परिसरात वाढलेल्या लवंगारे यांनी मासिक, दैनिकांपासून ते दिवाळी अंकांद्वारे खुसखुशीत आणि ठसकेबाज व्यंगचित्रांच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजविले.
- महापालिकेच्या शिक्षण विभागातही त्यांनी काम केले. सुरुवातीला चित्रकलेची आवड असलेल्या लवंगारे यांनी पुढे कलेला हास्याचा तडका देत, प्रसिद्धीला गवसणी घातली.
- हास्य व्यंगचित्रकारांनी सुरुवात केलेल्या लवंगारे यांच्या राजकीय आणि सामाजिक विषयांवर भाष्य करणार्या व्यंगचित्रांनीही राजकीय पुढार्यांना चांगलेच चिमटे काढले.
जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा :
- पुणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित जसमेल कौर आणि मंगला मळेकर स्मृती आयोजित जिल्हा ज्युनिअर अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ओम कांबळे, आकांक्षा गायकवाड, अनुष्का देशपांडे, पायल गोरे, अंकिता कोंडे, मनोज रावत, मेलविन थॉमस यांनी आपाल्या गटांमध्ये अव्वल स्थान पटकावले.
- म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ही स्पर्धा सुरू आहे. 16 वर्षांखालील मुलांच्या गटात डेक्कन जिमखान्याच्या ओम कांबळे याने 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत 24.6 सेकंद वेळ देत अव्वल क्रमांक पटकावला.
- तसेच उंच उडीत डेक्कनच्याच मनोज रावतने (1.75 मीटर) बाजी मारली. 800 मीटर धावण्याच्या शर्यतीत एएसएफचा सुमीत खर्बे, तर 2000 मीटर धावण्याच्या शर्यतीत एसएसआयचा मोनू यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
मुंबई विद्यापीठ परीक्षा निकाल जाहीर :
- परीक्षांचे निकाल जाहीर करण्यासाठी राज्यपाल व कुलगुरू सी. विद्यासागर राव यांनी मुंबई विद्यापीठाला दिलेली मुदत 31 जुलै रोजी संपुष्टात येत आहे.
- मात्र, हा शेवटचा दिवस असूनही उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामध्ये समाधानाची बाब इतकीच की विद्यापीठाकडून 153 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये कला शाखेच्या 78, तंत्रज्ञान 48 , विज्ञान 10, वाणिज्य 7 आणि व्यवस्थापन शाखेच्या 10 परीक्षांच्या निकालाचा समावेश आहे.
- तसेच 90 टक्के उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचे काम पूर्ण झाल्याचा दावाही विद्यापीठाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठ उर्वरित 10 टक्के मूल्यांकन ठराविक दिवसात पूर्ण करू शकेल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- 30 जुलै रोजी मुंबई विद्यापीठाकडून 10 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.
उस्ताद सईदुद्दीन डागर यांचे निधन :
- धृपद गायकीची समृद्ध परंपरा पुढे नेणारे ख्यातनाम गायक उस्ताद सईदुद्दीन डागर (वय 78 वर्षे) यांचे 30 जुलै रोजी निधन झाले.
- हिंदुस्थानी संगीतातील अस्सल भारतीय संगीताचा ज्ञात प्रवाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धृपद गायकीला समृद्ध करण्यात डागर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.
- डागर घराण्याच्या मागील 19 पिढयांकडून हा समृद्ध वारसा उस्ताद सईदुद्दीन यांच्याकडे आला होता. ते धृपद-धमार गायला बसले की, मैफल रंगून जात असे, याचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
- देश-विदेशात त्यांच्या अनेक मैफली झाल्या आहेत. अनेक शिष्यांनाही त्यांनी घडवले आहे. धृपद गायनशैलीतील बारकावे समजून सांगण्याचे खास कौशल्य त्यांच्याकडे होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा