Current Affairs of 31 October 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (31 ऑक्टोबर 2017)
भारत आणि इटलीमध्ये सहा करार :
- भारत दौऱ्यावर आलेले इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी यांनी 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. व्दिपक्षीय चर्चेनंतर दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत दोन्ही देशांमध्ये सहा करारांवर स्वाक्षरी करण्यात आली.
- रेल्वे सुरक्षा, राजनैतिक संबंध, उर्जा, सांस्कृतिक सहकार्य, दोन्ही देशांमधील परराष्ट्र मंत्रालय आणि गुंतवणूक अशा सहा करारांचा यात समावेश आहे.
- इटलीचे पंतप्रधान पाओले जेंटिलोनी हे एक दिवसाच्या भारत दौऱ्यावर असून जवळपास दशकभरानंतर इटलीचे पंतप्रधान भारतात आले आहेत.
- दिल्लीत जेंटिलोनी यांचे राष्ट्रपती भवनात शाही स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम जेंटिलोनी यांनी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
- नरेंद्र मोदी आणि पाओले जेंटिलोनी यांनी भारतातील 12 आणि इटलीतील 19 उद्योजकांच्या शिष्टमंडळाच्या उपस्थितीत चर्चा केली. आर्थिक आणि गुंतवणुकीबाबत या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी सहा करारांवर स्वाक्षरी केली.
Must Read (नक्की वाचा):
मदरशांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके बंधनकारक :
- उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये एनसीईआरटीची पुस्तके सक्तीची करण्याचा निर्णय उत्तर प्रदेश सरकारने घेतला आहे.
- मदरशांमधील शिक्षणाच्या स्वरुपात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारने म्हटले आहे.
- लवकरच कुरान आणि धार्मिक पुस्तकांसोबत आधुनिक शिक्षण देणारी पुस्तकेही मदरशांमध्ये दिसणार आहेत. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मांनी ट्विट करुन याबद्दलची माहिती दिली.
- आतापर्यंत तैतानिया (1 ते 5) आणि फौकानिया (5 ते 8) स्तरावर धार्मिक विषय शिकवले जायचे. मात्र आता राज्य सरकारकडून मिळालेल्या मंजुरीमुळे मदरशांमध्ये उच्च आणि त्यापुढील विद्यार्थ्यांना एनसीईआरटीची पुस्तके घ्यावी लागतील. त्यामुळे मदरशांमध्ये गणित आणि विज्ञान हे विषय अनिवार्य असणार आहेत.
- सध्या तैनातिया आणि फौकानियामध्ये सरकारी शाळांच्या धर्तीवर हिंदी, इंग्रजी, गणित या विषयांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे.
चीनची ब्रह्मपुत्रेचा प्रवाह बदलण्याची योजना :
- भूतानमधील डोकलामच्या प्रश्नावरून भारत आणि चीनमध्ये निर्माण झालेला तणाव निवळल्याला काही दिवस उलटले नाही, तोच चीनने नवी कुरापत केल्याने दोन्ही देशांत पुन्हा नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
- चीनच्या ताब्यातील तिबेटमधून भारतात वाहणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह वळवण्याची योजना चीनने आखली आहे. या महाप्रचंड प्रकल्पाची रंगीत तालीम म्हणून त्याच्या तुलनेत एका लहान प्रकल्पाचे कामकाज त्यांनी सुरू केले असल्याचे वृत्त ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ या वृत्तपत्राने दिले आहे.
- तसेच या प्रकल्पानंतर झिनजिअँगच्या वैराण प्रदेशाचा कॅलिफोर्निया होईल, असे प्रकल्पात सहभागी तंत्रज्ञाने म्हटले आहे. मात्र हे प्रकल्प मार्गी लागल्यास भारताच्या ईशान्येकडील राज्ये आणि बांगलादेश यांच्या जीवन-मरणाचा प्रश्न उभा राहणार आहे.
- ब्रह्मपुत्रा नदीला चीनमध्ये यार्लुग त्सांगपो म्हणतात. ती तिबेटमधील सांग्री भागात वळण घेऊन भारतात प्रवेश करते. या ठिकाणी नदीच्या प्रवाहात कृत्रिम बेट निर्माण करून तिचा प्रवाह बदलण्याची व ते 10 ते 15 अब्ज टन पाणी तिबेटच्या पठारावरील 1000 किलोमीटर लांब बोगद्यातून चीनच्या पश्चिमेकडील झिनजिअँग (सिकिअँग) प्रांतातील टाकलामकान वाळवंटात नेण्याची चीनची अतिमहत्त्वाकांक्षी योजना आहे. या प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी चीनने 100 हून अधिक शास्त्रज्ञांचे देशभरात विविध अभ्यासगट स्थापन केले आहेत.
अंजली गायकवाड सारेगमपची ‘लिटल चॅम्प’ :
- ‘सारेगमप लिटल चॅम्प’चे विजेतेपद अहमदनगरची स्वरकन्या अंजली अंगद गायकवाड हिने पटकावले. अंजली आणि पश्चिम बंगालमधील श्रेयन भट्ट्याचार्य यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले.
- जयपूरमध्ये ‘सारेगमप लिटल चॅम्प 2017’च्या सिझनचा ग्रँड फिनाले झाला. 30 ऑक्टोबर रोजी अंजली, तिची बहीण नंदिनी, आई-वडील व गुरू मनीषा व अंगद गायकवाड यांची नगरमध्ये सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
- स्पर्धेचे परीक्षक ख्यातनाम गायक जावेद अली यांनी अंजलीचे कौतुक केले. अंतिम फेरीत सहा स्पर्धक होते. 170 देशांतून त्यांना मतदान करण्यात आले. अंजलीला सर्वाधिक मते मिळाली.
- तसेच यापूर्वी अंजली-नंदिनी जोडीने ‘महाराष्ट्राचा संगीत सम्राट’ स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते. अंजली ही सावेडी येथील आनंद विद्यालयात सातवीत तर तिची बहीण नंदिनी नववीत शिकत आहे.
डेव्हिड मिलरचे विश्वविक्रमी शतक :
- दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने 29 ऑक्टोबर रोजी ट्वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान शतक झळकाविले. मिलरच्या झंझावातामुळे दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 83 धावांनी सहज विजय मिळवित मालिकाही जिंकली.
- मिलरने केवळ 35 चेंडूंतच शतक झळकाविले. यापूर्वीचा ट्वेंटी-20 मधील वेगवान शतकाचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्याच रिचर्ड लेव्हीच्या नावे होता. त्याने 2012 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. लेव्हीने 45 चेंडूंत शतक झळकाविले होते. विशेष म्हणजे, ट्वेंटी-20 मध्ये वेगवान शतकांच्या यादीत पहिल्या तीन क्रमांकांवर दक्षिण आफ्रिकेचेच फलंदाज आहेत. तिसऱ्या क्रमांकावर फाफ डू प्लेसिस आहे. त्याने 2015 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 46 चेंडूंत शतक पूर्ण केले होते.
- विशेष म्हणजे, या सामन्यात मिलर पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला होता. ट्वेंटी-20 मध्ये चौथ्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्याने शतक झळकाविण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा