Current Affairs of 4 December 2017 For MPSC Exams
चालू घडामोडी (4 डिसेंबर 2017)
मुंबईच्या ईटीसीला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार :
- अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सेवासुविधा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महापालिकेच्या अपंग शिक्षण व प्रशिक्षण केंद्राला (ईटीसी) 3 डिसेंबर रोजी ‘सर्वोत्कृष्ट संस्था’ हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
- नवी दिल्लीतील विज्ञान भवनातील शानदार सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते महापालिकेचे आयुक्त डॉ. एन.रामास्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
- पुरस्कार प्रदान केल्यावर राष्ट्रपती कोविंद यांनी नवी मुंबई महापालिकेच्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक केले. प्रत्येक व्यक्तीमध्ये वेगवेगळी विशेषता असते. ती ओळखून आपण त्यावर भर दिला पाहिजे, असे सांगतानाच कोविंद यांनी दिव्यांगांमधील विशेषतांचा सन्मान होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. पुरस्कारप्राप्त संस्थांचे कौतुक करत त्यांचे कार्य इतरांसाठी प्रोत्साहन देणारे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
- केंद्रीय मंत्रालयाकडून देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी कार्य करणाऱ्या संस्था, दिव्यांग कर्मचारी, दिव्यांगांसाठी आदर्श व्यक्ती, संशोधन करणाऱ्या संस्था अशा विविध 52 श्रेणींमध्ये व्यक्ती व संस्थांना पुरस्कार देण्यात आले.
- तसेच यात दिव्यांगांचे भावनिक, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक पुनर्वसनाकरिता कार्य करणारी देशातील सर्वोत्कृष्ट संस्था म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या ईटीसी केंद्राला गौरवण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
इराणमधील चाबहार बंदराचे उद्घाटन :
- भारताच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या इराणमधील चाबहार बंदराच्या पहिल्या विस्तारित टप्प्याचे 3 डिसेंबर रोजी इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या बंदरामुळे भारताला इराणमधून अफगाणिस्तानशी संपर्क साधता येणार आहे. तसेच येथून पूर्वेला केवळ 80 किलोमीटर अंतरावर पाकिस्तानच्या किनाऱ्यावर चीन विकसित करत असलेल्या ग्वादर या बंदराला शह देता येणे शक्य होणार आहे.
- उद्घाटनाच्या कार्यक्रमाला इराण, भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान यांच्यासह अन्य देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारताच्या वतीने सागरी वाहतूक मंत्रालयाचे राज्यमंत्री पोन राधाकृष्णन हे उपस्थित होते.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे 2016 मध्ये इराणला दिलेल्या भेटीत भारत, इराण आणि अफगाणिस्तानमध्ये संपर्क विकसित करण्याचा त्रिपक्षीय करार करण्यात आला. त्यानुसार भारत इराणला चाबहार बंदर विकसित करण्यास मदत करणार आहे.
- तसेच इराणमधून पुढे अफगाणिस्तानमधील झरंज आणि देलाराममार्गे थेट काबुलपर्यंत रस्ता व रेल्वे मार्ग विकसित केला जाणार आहे. याशिवाय चाबहारच्यापुढे मध्य आशियातील देश आणि थेट रशियाशी संपर्क साधण्याची योजना आहे.
सहा व्दिशतके करणारा विराट पहिला कर्णधार :
- विक्रमामागून विक्रम रचणाऱ्या कर्णधार विराट कोहलीने 3 डिसेंबर रोजी आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटमध्ये सहावे व्दिशतक झळकावून त्याने सर्वाधिक व्दिशतके करणारा कर्णधार म्हणून आपली ओळख निर्माण केली.
- श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने 238 चेंडूत व्दिशतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीत 20 चौकारांचा समावेश होता. विराटने 2 डिसेंबर रोजी सामन्याच्या पहिल्या दिवशी कारकिर्दीत 5 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला होता.
- भारताकडून सर्वाधिक व्दिशतके करण्याचा मान मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग (6 व्दिशतके) यांच्या नावावर होता. विराटने यांची बरोबरी केली आहे. याबरोबरच एकपाठोपाठ एक व्दिशतके करणारा तो दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विनोद कांबळीने 1993 मध्ये इंग्लंडविरुद्ध 224 आणि झिंबाब्वेविरुद्ध 227 धावा केल्या होत्या.
आयआयटीच्या विद्यार्थ्याला सव्वा कोटीचे वार्षिक पॅकेज :
- मायक्रोसॉफ्ट या सॉफ्टवेअर निर्मितीतील नामांकित कंपनीने मुंबईतील आयआयटीच्या एका विद्यार्थ्याला तब्बल एक कोटी 38 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. दोन वर्षांतील हे सर्वांत मोठे पॅकेज असून, यंदा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मुंबई आयआयटीकडे रांगा लागल्या आहेत. उबरने 99 लाखांचे पॅकेज दिले आहे; मात्र याला दुजोरा मिळाला नाही.
- आयआयटी मुंबईचे कॅम्पस सिलेक्शन 1 डिसेंबरपासून सुरू झाले आहे. मायक्रोसॉफ्टने चार विद्यार्थ्यांना अंतिम मुलाखतीसाठी निवडले होते. त्यातील एकाला तब्बल एक कोटी 38 लाखांचे पॅकेज दिले आहे.
- भारतातील विभागासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्याला 39 लाखांचे पॅकेज मायक्रोसॉफ्टने दिले आहे. ब्लॅकस्टोन या अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपनीने भारतात सर्वाधिक म्हणजे 45 लाखांचे पॅकेज दिले आहे.
- तसेच पहिल्या टप्प्यात मायक्रोसॉफ्ट आणि जपानच्या एनईएस या कंपन्यांनी परदेशात काम करण्यासाठी दोन विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
दिनविशेष :
- 4 डिसेंबर हा दिवस ‘नौदल दिन’ म्हणून पाळला जातो.
- भारताचे 11 पंतप्रधान ‘इंद्रकुमार गुजराल’ यांचा जन्म 4 डिसेंबर 1919 मध्ये झाला.
- 4 डिसेंबर 1924 मध्ये ‘गेटवे ऑफ इंडिया’ या वास्तूचे व्हाईसराय लॉर्ड रीडिंग यांच्या हस्ते उद्घाटन झाले होते.
- सन 1971 मध्ये 4 डिसेंबर रोजी ‘भारत-पाकिस्तान तिसरे युद्ध-ऑपरेशन ट्रायडेंट’ भारतीय आरमाराने कराचीवर हल्ला केला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा