चालू घडामोडी (4 मार्च 2018)
अजिंक्य, सूर्यकुमारवर सर्वाधिक बोली :
- भारताचा कसोटी उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि सूर्यकुमार यादव यांच्यावर प्रत्येकी सात लाख रुपयांची बोली लावत मुंबई ट्वेन्टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेसाठी अनुक्रमे मुंबई उत्तर आणि मुंबई उत्तर-पूर्व संघांनी त्यांना स्थान दिले आहे.
- वानखेडे स्टेडियमवर 11 ते 21 मार्च या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी झज्ञलेल्या लिलावात भारताचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील उपकर्णधार रोहित शर्माला सहा लाख रुपयांना मुंबई उत्तर-पश्चिम संघाने स्थान दिले आहे.
- विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित श्रीलंकेत होणाऱ्या तिरंगी ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पध्रेत भारताचे नेतृत्व करणार आहे.
भारत-व्हिएतनाम दरम्यान तीन करार :
- भारत व व्हिएतनाम यांच्यात अणुसहकार्य, इंम्डो-पॅसिफिक, खुली व्यवस्था यासह तीन मुद्दय़ांवर करार झाले आहे. यांच्यादरम्यान स्वाक्षरी झालेल्या करारांचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि व्हिएतनामचे औद्योगिक व देवाणघेवाणमंत्री त्रान तुआन अन्ह यांनी हस्तांतरित केले आहे.
- पंतप्रधान मोदी व व्हिएतनामचे अध्यक्ष त्रान दाय क्वांग यांनी अनेक क्षेत्रात द्विपक्षीय सहकार्य करण्याचे ठरवले असून त्यात संरक्षण, तेल व वायू तसेच कृषी या क्षेत्रांचा समावेश आहे.
- तसेच दोन्ही देश द्विपक्षीय सागरी सहकार्यावर भर देणार असून खुली, कार्यक्षम व नियमाधिष्ठित प्रादेशिक व्यवस्था आवश्यक आहे. भारत व व्हिएतनाम यांनी व्यापार व गुंतवणूक संबंध हे तेल व वायू शोधन, शाश्वत ऊर्जा, कृषी व कापड उद्योगात वाढवण्याचे ठरवले आहे.
एनए परवानगीची गरज नाही, शासनाकडून कायद्यात सुधारणा :
- जमिनीच्या अकृषिक वापराकरिता आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी येणा-या अडचणी दूर व्हाव्यात. त्यासंदर्भातील कार्यप्रणालीत सुलभता यावी, या साठी राज्य शासनाने कायद्यात सुधारणा केल्या आहेत.
- त्यानुसार आता अकृषिक परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. तर केवळ अकृषिक आकारणी करून बांधकाम परवानगी दिली जाते आहे. याबाबतची समान कार्यपध्दती लागू व्हावी यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयातर्फे परिपत्रक काढले आहे.
- ‘‘महाराष्ट्र जमीन महसूल” अधिनियमामधील कलम 42 नंतर एकूण 4 सुधारित कलमे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार कलम 42अ नुसार विकास योजनेतील समाविष्ट केलेल्या क्षेत्रात स्थित असलेल्या जमिनीच्या वापरात बदल करण्यासाठी परवानगीची आवश्यक नाही.
- कलम 42 ब नुसार अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट केलेल्या जमिनीसाठी जमीनवापरातील तरतूद तपासली जाईल. तसेच, अंतिम विकास योजना क्षेत्रात समाविष्ट असलेल्या जमिनीसाठी जमीनवापरात बदल करण्यासाठी योजना प्रसिद्ध केल्यावर यामधील क्षेत्रासाठी रूपांतर कर, अकृषिक आकारणी लागू असेल. तसेच, त्या ठिकाणी नजराणा किंवा अधिमूल्य व इतर शासकीय देणी यांचा भरणा केला असल्यास अशा क्षेत्रात समाविष्ट असलेल्या कोणत्याही जमिनीचा वापर हा विकास योजनेत दर्शविलेल्या वापरात रूपांतरित करण्यात आला आहे, असे गृहीत धरले जाईल. या तरतुदी लागू होत असलेल्या क्षेत्रात बांधकाम परवानगी देण्यास संबंधित नियोजन प्राधिकरण सक्षम आहे.
क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांवर कारवाई सुरू :
- नियमबाह्यपणे क्रॅशगार्ड बसविणा-या वाहनांविरोधात उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. फेब्रुवारीपासून तब्बल 210 वाहनधारकांकडून दंडवसुली केली आहे.
- नियमाप्रमाणे चार चाकी वाहनांच्या समोरील बाजू फायबरची बनविण्यात आलेली असते. परंतु वाहनधारक त्या ठिकाणी क्रॅशगार्ड बसवून घेत असतात. अपघात झाल्यानंतर वाहनाचे नुकसान होऊ नये व आतमधील चालकासह प्रवाशांना दुखापत होऊ नये यासाठी क्रॅशगार्ड बसवून घेतले जात आहेत. वास्तविक नियमाप्रमाणे पुढील बाजूला फायबर असणे आवश्यक असते. त्यामुळे अपघात झाल्यास पुढील वाहनाचे कमी नुकसान होते. याशिवाय फायबरमुळे कारमधील एअर बलून फुगण्यास मदत होते.
रशियाकडे अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र :
- रशियाने अदृश्य आण्विक क्षेपणास्त्र बनवले आहे. हे क्षेपणास्त्र वेगवान असेल व शत्रूला समजण्याआधीच ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेले असेल, असा खुलासा रशियाचे राष्ट्राध्यक्ष वल्दमीर पुतीन यांनी केला आहे.
- रशियाचे तरुण हे अत्याधुनिक तंत्रात अग्रेसर आहेत. या तरुणांनी तयार केलेले नवीन क्षेपणास्त्र वेगवान असून शत्रूला चोख उत्तर देणारे आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी नुकतीच पूर्ण झाली आहे.
जगातील पहिले आण्विक ऊर्जेवरील विमान :
- आण्विक ऊर्जेवर चालणारे हे जगातील पहिले मॅग्नावेम विमान आहे. या विमानाचे डिझायनर ऑस्कर विनाल्स यांनी याची कन्सेप्ट डिझाइन तयार केली आहे. या विमानाची किमान गती सुमारे 1850 किमी प्रतितास राहील. म्हणजे लंडन ते न्यूयॉर्क पोहोचण्यासाठी केवळ तीन तास लागतील.
- विशेष म्हणजे या विमानातून कार्बन उत्सर्जित होणार नसल्याने पर्यावरणाला नुकसान होणार नाही. विमानात लावण्यात आलेल्या कॉम्पॅक्ट फ्यूजन रिअॅक्टरमधून त्याला ऊर्जा मिळेल. लॅटिन भाषेतील ‘मॅग्ना एवम’ या शब्दातून या विमानाला नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ मोठा पक्षी असा होतो.
- विमानात “प्लाझ्मा अॅक्युटेटर्स” आहेत, जे विमानाला तसेच पंखांवरील हवेला नियंत्रित करतील. त्यामुळे आकाशात हे विमान चांगले प्रदर्शन करू शकणार आहे.
त्रिपुरा आणि नागालँडवर आता भाजपाची सत्ता :
- ईशान्येतील तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले आहेत. त्रिपुरा हा डाव्यांचा गड मानला जात होता. मात्र त्याला भगदाड पाडत भाजपाने तिथे सत्ता काबीज केली. तसेच नागालँडमध्येही भाजपाने एनडीपीपीसोबत युती करून तिथेही सत्ता आणली आहे.
- त्यामुळे आता भाजपाशासित राज्यांची संख्या 21 झाली आहे. 21 राज्यांमध्ये सत्ता असलेला भाजपा हा पहिलाच पक्ष ठरला आहे.
दिनविशेष :
- 1791 : व्हरमाँट हे अमेरिकेचे 14 वे राज्य बनले.
- 1837 : शिकागो शहराची स्थापना झाली.
- 1936 : हिंडेनबर्गरचे पहिले उड्डाण झाले.
- 1974 : पिपल मॅगझिन चे पहिले प्रकाशन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा