चालू घडामोडी (4 मे 2018)
न्यायालयातील कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा :
- राज्यभरातील जिल्हा न्यायालयांमधील कर्मचारी भरती प्रक्रियेवरील स्थगिती मुंबई उच्च न्यायालयाने हटवली. मात्र, दिव्यांगांच्या कोट्यातील जागा रिक्त ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
- न्यायालयांतील कनिष्ठ पदांच्या भरतीची प्रक्रिया न्याय प्रशासनाने ऑनलाइन पद्धतीने सुरू केली आहे; मात्र या प्रक्रियेत दिव्यांगांच्या कोट्यातील भरतीसंबंधित नियमांचे पालन केले नसल्याचा आरोप करणारी
- जनहित याचिका दोन सामाजिक संस्थांनी दाखल केली आहे. या याचिकेवर न्या. नरेश पाटील आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली.
- न्यायालयाने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. भविष्यात दिव्यांग कोट्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. स्टेनो, कारकून आणि शिपाई-हमाल पदांसाठी ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
डॉ. फडणवीस सोलापूर विद्यापीठाच्या नव्या कुलगुरू :
- नागपूर येथील महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मृणालिनी मिलिंद फडणवीस यांची राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदावर नियुक्ती केली.
- डॉ. एन.एन. मालदार यांचा कुलगुरुपदाचा कार्यकाळ दहा डिसेंबर 2017 रोजी संपल्यापासून हे पद रिक्त झाले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमाळकर हे सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा अतिरिक्त कार्यभार पाहत होते.
- डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मध्य प्रदेशातील सागरच्या डॉ. हरिसिंग गौर विद्यापीठातून अर्थशास्त्र, तसेच इकॉनॉमेट्रिक्स या विषयांत एम.ए., तसेच पीएच.डी. प्राप्त केली असून, त्यांना अध्यापन, संशोधन, तसेच प्रशासनाचा प्रदीर्घ अनुभव आहे.
- महिला महाविद्यालयात 1983 मध्ये त्या प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. यानंतर 2003 मध्ये त्यांची महाविद्यालयात प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2011-2015 या दरम्यान त्या विदर्भ वैधानिक विकास मंडळाच्या सदस्या होत्या. सध्या त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विद्वत परिषदेवर राज्यपाल नामित सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
- सोलापूर विद्यापीठात बराचसा भाग ग्रामीण आहे. त्या भागातील महाविद्यालयांचा विकास करण्यासाठी आणि डिजिटलायझेशन करण्याच्या दृष्टीने त्या प्रयत्न करणार आहे.
मिथिला ठरल्या ब्युटीफुल स्माईलच्या मानकरी :
- मिसेस इंडिया क्विन ऑफ सबस्टंस 2018 च्या अंतिम फेरीत पिंपळे सौदागर येथील मिथिला वराडे-डहाके यांना ब्युटिफुल स्माईल सन्मानाने गौरविण्यात आले.
- देश-विदेशातील हजारो महिलांमधून निवड झालेल्या 46 जणींची अंतिम फेरी नुकतीच झाली. त्यामध्ये महाराष्ट्रातील चार महिलांचा समावेश होता.
- मिथिला या मूळच्या नागपूरच्या असून, त्यांनी एचआर अँड फायनान्स या शाखेत (एमबीए) पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. त्यांनी मॉडेलिंग क्षेत्रातही काही काळ काम केले असून, हवाई सुंदरीचे प्रशिक्षणही पूर्ण केले. त्या सध्या एका मल्टिनॅशनल कंपनीत मानव संसाधन विभागात एचआर एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत आहेत. त्यांचे वडील महावितरणमध्ये नोकरी करतात तर आई शिक्षिका आहेत.
शिओमी जगातील सर्वात मोठा आयपीओ आणणार :
- स्मार्टफोन कंपनी असलेली शिओमी लवकरच हाँगकाँगच्या शेअर बाजारात प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) करणार आहे. ब्लूमबर्गच्या मते, 2014 बाजारात येणारा हा जगातील सर्वात मोठा आयपीओ ठरण्याची शक्यता आहे.
- कंपनीचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सच्या घरात पोचण्याची शक्यता आहे. अलीबाबा ग्रुप होल्डिंग लिमिटेडने 2014 मध्ये आयपीओच्या माध्यमातून 21.8 अब्ज डॉलरचा निधी उभारला होता.
- कंपनीने संपूर्ण आर्थिक स्थिती गुंतवणूकदारांसमोर मांडत बाजारात आयपीओ आणत असल्याची घोषणा केली. कंपनीचे उत्पन्न 2017 मध्ये 114.62 अब्ज युआनवर (18 अब्ज अमेरिकी डॉलर्स) पोचले असून 2016 च्या तुलनेत त्यात 67.5 टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.
- स्मार्टफोनबरोबरच शिओमी इंटरनेटशी जोडलेली घरगुती उपकरणे आणि गॅझेट्स बनविते. त्याचबरोबर स्कूटर, एअर प्युरिफायर्स आणि राइस कुकरसह डझनभर इतर घरगुती उपकरणे तयार करते.
- स्मार्टफोन बाजारात स्वस्त स्मार्टफोन सादर करून शिओमीने सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स कंपनी आणि ऍपल इंकसमोर आव्हान उभे केले आहे.
राज्यात यंदा 13 ओजस शाळा सुरू होणार :
- नवीन शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षण विभागातर्फे सरकारी शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी ‘ओजस‘ या आंतरराष्ट्रीय शाळांची सुरवात करण्यात येणार आहे.
- जूनपासून 13, तर पुढील शैक्षणिक वर्षापासून 100 ‘ओजस‘ शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- स्थानिक स्वराज्य संस्था, आदिवासी विकास विभाग व सामाजिक न्याय विभाग, शालेय शिक्षण विभाग यांच्या शाळांतून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या 100 शाळा निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
- तावडे म्हणाले, की आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणात अग्रेसर असणाऱ्या सिंगापूर, हॉंगकॉंग, जपान या देशांतील शिक्षण पद्धतींचा अभ्यास करून आणि समृद्ध आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आणि प्रभावी अध्ययन संसाधने यांची उपलब्धता सुनिश्चित करून हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आलेला आहे.
- 14 जुलै 2017 च्या सरकारी निर्णयानुसार पहिल्या टप्प्यातील 13 ‘ओजस’ शाळांची निवड झालेली आहे. या शाळा मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी तयार होतील. या शाळांतील शिक्षकांना पहिल्या टप्प्यात सरकारकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यापुढील टप्प्यांमध्ये या शाळांच्या मार्गदर्शनाखाली नव्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा सुरू केल्या जातील, असेही तावडे यांनी सांगितले.
वेंगुर्ले येथे होणार आंतरराष्ट्रीय आंबा परिषद :
- डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली आणि इंटरडिसिप्लीनरी सोसायटी फॉर ऍडव्हॉन्मेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी यांच्यावतीने येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात 8 ते 11 या कालवधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषद होत आहे.
- प्रादेशिक फळ संशोधन केंद्राची स्थापना 1957 मध्ये झाली. त्यानंतर येथे आंब्यावर महत्वपूर्ण संशोधन झाले. आंबा विषयक महत्वपूर्ण संशोधनात्मक योगदानाबद्दल तसेच संशोधन विषयाच्या माहितीचे जागतिक पातळीवर देवाणघेवाण करुन बदलत्या वातावरणात शाश्वत आंबा उत्पादन तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने कुलगुरु डॉ. तपस भट्टाचार्य यांच्या संकल्पनेतून प्रथमच जिल्ह्यात अशी परिषद होत आहे. यात देशविदेशातून 150 हून अधिक कृषि शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत.
- तसेच यावेळी कृषी विषयक प्रदर्शनही होईल. यात 200 हून अधिक आंब्याच्या जाती प्रदर्शित करण्यात येणार आहेत. आंब्यामध्ये यांत्रिकीकरणाच्या दृष्टीने विविध यंत्र सामुग्रीचे प्रात्यक्षिकही होणार आहे. याशिवाय विविध कृषी विषयक प्रशिक्षणे, मत्स्य संवर्धन प्रशिक्षणांचा यात समावेश असेल.
दिनविशेष :
- 4 मे 1854 मध्ये भारतातील पहिले टपाल तिकीट प्रकाशित झाले.
- पहिले ग्रॅमी पुरस्कार 4 मे 1959 रोजी आयोजीत केले गेले.
- श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर नाशिक येथील मंदिरात जाऊन देवाची पूजा करण्याचा अधिकार सर्वांना आहे असा निर्णय.उच्च न्यायालयाचा 4 मे 1967 रोजी घेतला.
- 4 मे 1979 रोजी मार्गारेट थॅचर युनायटेड किंग्डमच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.
- 4 मे 1995 मध्ये महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने बॉम्बे हे नाव बदलून मुंबई असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा