चालू घडामोडी (4 ऑक्टोबर 2016)
न्यूझीलंडविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात भारत विजयी :
- भारताने (दि.3) ईडन गार्डनवर शानदार कामगिरी करीत दुसऱ्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी न्यूझीलंडचा 178 धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली.
- तसेच या निकालाच्या आधारावर भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पिछाडीवर सोडत आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले.
- विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाने मायदेशात भारताच्या 250 व्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडपुढे विजयासाठी 376 धावांचे लक्ष्य ठेवले.
- लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाने सुरुवातीला शानदार खेळ केला, पण ब्रेकनंतर संघाचा डाव गडगडला. न्यूझीलंडचा दुसरा डाव 81.1 षटकांत 197 धावांत संपुष्टात आला.
- दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करणारा यष्टिरक्षक फलंदाज रिद्धिमान साहा सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
जपानच्या ओहसुमी शास्त्रज्ञ यांना नोबेल पुरस्कार जाहीर :
- जपानमधील शास्त्रज्ञ योशिनोरी ओहसुमी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार 2016 मिळविला आहे.
- जिवाणूंमध्ये वाढणाऱ्या परावलंबी विषाणूंवर (ऑटोफाजी) केलेल्या संशोधनाबद्दल ओहसुमी यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
- ऑटोफाजी ही पेशी जैवशास्त्रातील एक मूलभूत प्रक्रिया आहे.
- मानवी आरोग्य आणि रोगांशी त्याचा निकटचा संबंध आहे.
- तसेच ज्या पेशी विस्कळीत झाल्याने कंपवात आणि मधुमेह होऊ शकतो अशा पेशींना त्याच प्रकारच्या पेशी खातात, त्यांच्याशी संबंधित ही प्रक्रिया आहे.
वेदनाशामक औषधाची निर्मिती :
- मनुष्य जन्माला येतो तेव्हापासून अनेक छोट्या मोठ्या आजारांचा प्रतिकार त्याला करावा लागतो. त्यातच काही भयानक आजारांवर गोरगरिबांना आर्थिक झळ ही अजिबात परवडणारी नसते.
- गरीब रुग्णांमध्ये ईश्वराचे अस्तित्व समजणाऱ्या एका प्राचार्यांना आरोग्यवर्धक जायफळापासून एका विशेष संशोधनातून वेदनाशामक औषधाची निर्मिती करण्यास मोठे यश मिळाले आहे.
- इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथील एसएमबीटी डी फार्मसी सेवाभावी ट्रस्टमधील प्राचार्य डॉ. योगेश विष्णुपंत उशीर आणि डॉ. सुदर्शन सिंग यांनी विद्यार्थ्यांना डॉक्टरकीचे शिक्षण देताना फावल्या वेळात त्यांनी ‘टॉपिकल जेल फॉर्म्युलेशन ऑफ टायमेटिन’ या विषयावर पेटंटची नोंदणी करून दोन
- वर्षांच्या अथक परिश्रमातून वेदनाशामक या परिपूर्ण औषधाची यशस्वीरीत्या निर्मिती केली आहे.
- तसेच त्यांनी शोधलेले टायमेटीनचे मलम हे औषध अनेक आजारांवर रामबाण व गुणकारी ठरले आहे.
- महत्त्वाच्या औषधाची सहज उपलब्धता, सोपी निर्मितीपद्धती आणि वापरण्यास सोईस्कर असल्याने आरोग्यक्षेत्रातील विविध थरांतून त्यांचे कौतुक केले जात आहे.
- डॉ. उशीर व डॉ. सिंग औषधनिर्माण क्षेत्रात अनेक वर्षांपासून संशोधन करत आहेत. या संशोधनात त्यांना असे आढळून आले की, दैनंदिन जीवनात वापरात येणाऱ्या आणि निसर्गातून सहज उपलब्ध होणाऱ्या जायफळात ‘टायमेटिन’ हा घटक आहे आणि तो शरीरातील वेदना, चमक तसेच सुजही कमी करतो.
- जायफळातील टायमेटीन विलग करून त्याचे जेल फॉर्म्युलेशन अर्थात मलम बनविल्याने रुग्णांना सहजतेने वापरता येऊ शकते आणि कमीत कमी दरात सर्वसामान्यांना उपलब्धही करता येऊ शकते.
किरेन डिसूझाची ऐतिहासिक कामगिरी :
- नागपूरमध्ये जन्मलेल्या किरेन डिसूझाने 1 ऑक्टोबरला ऐतिहासिक कामगिरी करताना जगातील खडतर मानल्या जाणाऱ्या 246 किलोमीटर अंतराची ‘स्पार्टाथॅलोन’ यशस्वीपणे पूर्ण केली.
- तसेच या वार्षिक स्पर्धेचे आयोजन ग्रीसच्या अथेन्स आणि स्पार्ट यांच्यादरम्यान करण्यात आले होते.
- अशी कामगिरी करणारा 23 वर्षीय किरेन भारताचा पहिला स्पर्धक ठरला. त्याने हे अंतर 33 तास 3 मिनिट 25 सेकंद वेळेत पूर्ण केले.
- या शर्यतीदरम्यान त्याने 100 मैल अंतर 18.37 तासांमध्ये पूर्ण करण्याचा पराक्रम करताना 159.5 किलोमीटर अंतरावर असलेला 47 वा चेक पॉर्इंट गाठला.
- सहभागी 370 स्पर्धकांमध्ये त्याला 86 व्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- शर्यत पूर्ण करणाऱ्या स्पर्धकांसाठी पुरस्कार नव्हता. शर्यत पूर्ण करणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाचा ओलिव्हच्या पानाचा मुकुट देऊन गौरव करण्यात आला आणि पुरस्कार म्हणून इरोटस नदीचे जल प्रदान करण्यात आले.
- 2012 पासून किरेन या शर्यतीसाठी तयारी करीत होता. या शर्यतीसाठी पात्र ठरलेला तो पहिला भारतीय ठरला.
- तसेच या शर्यतीपूर्वी किरेनला 60 किलोमीटर अंतराच्या शर्यतीचा ‘अल्ट्रा मॅराथॉनपटू’ म्हणून गौरविण्यात आले होते.
- गत वर्षी किरेनने 100 मैलांची सालोमन भट्टी लेक्स अल्ट्रा मॅरेथॉन जिंकून सर्वांत वेगवान भारतीय अॅथलिटचा मान मिळवला होता.
- किरेन डिसूझा लद्दाखची 222 किलोमीटर अंतराची अल्ट्रा शर्यत पूर्ण करणारा पहिला भारतीय अॅथलिट होण्याचा मान मिळवला होता.
दिनविशेष :
- राष्ट्रीय एकता दिन
- 1914 : मराठी समीक्षक, म.वा. धोंड यांचा जन्मदिन.
- 1921 : मराठी गायक, केशवराव भोसले स्मृतीदिन.
- 2002 : भाई भगत, भारतीय वृत्तपट निवेदक स्मृतीदिन.
- 2004 : स्पेसशिपवन या अंतराळयानाने अन्सारी एक्स पारितोषिक मिळवले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा