चालू घडामोडी (5 डिसेंबर 2015)
दिल्ली सरकारचे नवे मोबाईल ऍप :
- आम आदमी पक्षाच्या दिल्लीतील सरकारने शहरातील बेघरांना शोधण्यासाठी नवे मोबाईल ऍप तयार केले असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमात हे “ऍप” कार्यान्वित करण्यात आली आहे.
- दिल्लीतील थंडीमुळे बेघरांचा मृत्यू रोखण्यासाठी सरकारने अशा लोकांसाठी रात्रीची आश्रयस्थाने सुरु केली आहेत. अशाप्रकारची एकूण 190 आश्रयस्थाने आणि 40 तंबू उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे एकूण 19 हजार जणांना रात्रीचा निवारा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
- तसेच अशा लोकांचा शोध घेण्यासाठी दिल्ली नागरी निवारा सुधारणा मंडळाने (डीयुएसआयबी) ऍप तयार केले आहे.
- नागरिकांना आढळून येणाऱ्या बेघर व्यक्तींचे मोबाईल फोनद्वारे फोटो काढण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. नागरिकांनी काढलेले फोटो अपलोड करण्याची सुविधा ऍपमध्ये देण्यात आली आहे.
- हे ऍप डीयुएसआयबीच्या सर्व्हर्सना जोडलेली असल्याने संबंधित फोटो अपलोड केलेले ठिकाण स्वयंचलित यंत्रणेद्वारे नोंद होणार आहे. त्यानंतर जवळच्या बचावपथकाला संबंधित बेघर व्यक्तीला निवारा देण्याचे निर्देश देण्यात येणार आहेत.
लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी “ई-लिलाव” प्रक्रिया :
- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार “क” प्रतीचा लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी “ई-लिलाव” प्रक्रिया राबविणारे कर्नाटक देशातील पहिलेच राज्य ठरणार आहे.
- ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी राज्य सरकारने 1 फेब्रुवारी 2016 ही तारीख निश्चित केली आहे.
- केंद्र सरकारने खाण आणि खनिज (विकास व नियमन) कायदा 1957 मध्ये सुधारणा केल्यानंतर लोह खनिज लीजसाठी लिलाव करण्याचा पहिला निर्णय कर्नाटकने घेतला आहे.
- तसेच कायद्यातील सुधारणेत नैसर्गिक स्रोतांच्या उत्खननासाठी ई-लिलाव बंधनकारक केला आहे. राज्यातील “क” प्रतीच्या लोह खनिज उत्खनन लीजचे पुनर्वाटप स्टील व तत्सम उद्योगांना करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने 31 महिन्यांपूर्वी राज्य सरकारला दिले होते.
- त्यानंतर आता खाण व भूगर्भशास्त्र विभागाने बळ्ळारी व चित्रदुर्गमधील अशा 51 पैकी 11 खाणींसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या 11 खाणींमध्ये एकूण 127 दशलक्ष टन लोहखनिज साठा आहे.
- कर्नाटकातील बेकायदा खनिज उत्खनन प्रकरणाची अंतिम सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने “क” प्रतीच्या लोह खनिजाची 51 लीज रद्द करून पारदर्शक लिलावाद्वारे पुनर्वाटप करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सरकारी मालकीची कंपनी मेटल स्क्रॅप ट्रेड कॉर्पोरेशन लि. 9 ते 11 फेब्रुवारीला ई-लिलाव प्रक्रिया राबविणार आहे. त्यासाठी आर्थिक व तांत्रिक निविदा ऑनलाइन भराव्या लागणार आहेत; पण मुख्य कंपन्यांच्या सहयोगी कंपन्यांना लिलावात भाग घेता येणार नाही.
दार्जिलिंगची “टॉय ट्रेन” पुन्हा एकदा सुरू होणार :
- चहाच्या मळ्यांमधून धावणारी दार्जिलिंगची जगप्रसिद्ध “टॉय ट्रेन” पाच वर्षांच्या खंडानंतर पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
- दार्जिलिंगची ही प्रसिद्ध “टॉय ट्रेन” तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये पाहिली असेल. मात्र, 2010 मध्ये दरड कोसळल्यामुळे कुर्सियांग ते न्यू जलपायगुडी दरम्यानची ही सेवा बंद करण्यात आली होती. या ट्रेनमधून सफर करण्याचा मोह सर्वांनाच होतो. गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली ही ट्रेन लवकरच सुरू होणार आहे.
- दरड कोसळल्यामुळे रेल्वे रुळांचे नुकसान झाले होते. त्यामुळे 2010 पासून कुर्सियांग ते न्यू जलपायगुडी दरम्यानची “टॉय ट्रेन”ची सेवा बंद ठेवण्यात आली होती.
जनलोकपाल विधेयक मंजूर :
- दिल्ली विधानसभेत आज बहुचर्चित जनलोकपाल विधेयक मंजूर करण्यात आले, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुचविलेल्या दोन सुधारणांचा समावेश करत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सुधारित विधेयक सादर केल्यानंतर ते बहुमताने मंजूर करण्यात आले.
- या विधेयकायमुळे भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन होईल, असा विश्वास केजरीवाल यांनी व्यक्त केला; परंतु या विधेयकास अद्याप नायब राज्यपाल आणि संसदेचीही मंजुरी मिळणे बाकी आहे.
सायना नेहवालचे ‘सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन’पटू पुरस्काराच्या यादीत नामांकन :
- स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला यंदा विश्व बॅडमिंटन महासंघाच्या वर्षातील ‘सर्वोत्कृष्ट बॅडमिंटन’पटू पुरस्काराच्या यादीत नामांकन मिळाले आहे.
- सध्या दुसऱ्या स्थानावर असलेली सायना काही वेळ जगात अव्वल स्थानावर होती हे विशेष. या पुरस्काराच्या चढाओढीत सायनासोबत अव्वल स्थानावर विराजमान असलेली स्पेनची कॅरोलिना मारिन, चीनची झाओ युन्लेई आणि चाओ यिक्सिन यांचा समावेश आहे.
- विजेत्या खेळाडूच्या नावाची घोषणा 7 डिसेंबर रोजी दुबईत होणाऱ्या दुबई विश्व सुपरसिरिज फायनन्सदरम्यान केली जाईल.
‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी बिल गेट्स यांचा मदतीचा हात :
- ‘स्वच्छ भारत’ अभियानासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनीचे संस्थापक बिल गेट्स यांनीदेखील केंद्र सरकारला मदतीचा हात देऊ केला आहे.
- नागरी विकासमंत्री व्यंकय्या नायडू यांच्यासमवेत झालेल्या प्रदीर्घ चर्चेत त्यांनी देशातल्या शहरी भागांत आरोग्य सुविधा उभारण्यासाठी केंद्राला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
- गेट्स यांनी स्थापन केलेल्या ‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाऊंडेशन’ने जानेवारीमध्ये नागरी विकास विभागाशी सहकार्य करार केला होता.
दिनविशेष :
- आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन
- 2013 : नेल्सन मंडेला, दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपिता, वर्णद्वेषविरोधी नेता यांचा मृत्यू