चालू घडामोडी (5 डिसेंबर 2017)
ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर कालवश :
- ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- शशी कपूर यांनी 1940 पासून बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत काम करायला सुरूवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 116 सिनेमांमध्ये काम केले असून त्यातील 61 सिनेमांमध्ये मुख्य भूमिका साकारली.
- 2011 मध्ये ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेल्या या हरहुन्नरी अभिनेत्याने तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कारांवर आपले नाव कोरले. तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
सीआयएचे संचालक माइक पोम्पिओ :
- अमेरिकेचे संरक्षण मंत्री जेम्स मॅटीस यांच्या पाकिस्तान दौऱ्याला सुरुवात होणार असतानाच अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणा सीआयएचे संचालक माइक पोम्पिओ यांनी पाकला इशाराच दिला आहे.
- दहशतवाद्यांच्या तळांवर पाकिस्तानने कारवाई केली नाही तर अमेरिकाच त्या तळांवर कारवाई करणार, असे त्यांनी म्हटले आहे.
- ‘व्हॉईस ऑफ अमेरिका’ रेडिओशी बोलताना माइक पोम्पिओ यांनी पाकबाबत परखड मत मांडले. ‘अमेरिकेचे संरक्षण मंत्री मॅटीस आधी पाकिस्तानशी चर्चा करतील. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या आश्रयस्थानांवरील कारवाईबाबत गंभीर आहेत. जर पाकने या तळांवर कारवाई केली नाही तर ते तळ अस्तित्वात राहणार नाही यासाठी अमेरिका सर्व मार्गांचा वापर करेल, असा इशाराच त्यांनी पाकला दिला आहे.
- तसेच पाकिस्तानने दहशतवादाविरोधात कठोर भूमिका घेण्याचे आश्वासन दिले होते. पाकिस्तान दिलेला शब्द पाळणार, अशी अमेरिकेला आशा आहे, असे त्यांनी नमूद केले.
महापालिकेच्या वतीने सीएसआर सेलची स्थापना :
- स्मार्ट सिटी कक्ष, सिटी ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसनंतर आता पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अॅक्टिव्हिटी (सीएसआर) सेलची स्थापना करण्यात आली आहे. त्याचे कामकाज सुरू झाले आहे.
- औद्योगिकनगरी म्हणून पिंपरी-चिंचवड शहराची ओळख आहे. याठिकाणी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कंपन्या आहेत. मात्र, त्यांचा निधी हा बाहेरील शहरात वापरला जातो. ही बाब लक्षात आल्यानंतर कामगार क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी आपल्या शहरातील निधी शहरातच वापरला जावा, शहरविकासात उद्योगांना सामावून घ्यावे यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
- तसेच त्यातून सीएसआर सेलची स्थापना झाली आहे. त्यासाठी सन 2017-18 या अर्थसंकल्पात सीएसआर अॅक्टिव्हीटी या लेखाशीर्षाची नव्याने तरतूद केली आहे. त्यानुसार महापालिकेने सदर सेलचे कामकाज पाहण्यासाठी विजय वावरे यांची या अधिकार्यांची नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती 6 महिन्यांसाठी केली गेली आहे. त्यांचे कार्यालय पिंपरी-चिंचवड महापालिका भवनातील चौथ्या मजल्यावरील मुख्य माहिती व तंत्रज्ञान विभाग येथे असणार आहे. प्रत्यक्ष सीएसआर सेलचे कामकाज नुकतेच सुरू झाले आहे.
कोल्हापूर-गगनबावडा आता राष्ट्रीय महामार्ग :
- कोल्हापूर-गगनबावडा, करूळ घाट ते तळेरे या मार्गाचा समावेश 166 जी या राष्ट्रीय महामार्गात झाला आहे. आजपर्यंत या मार्गाला तत्त्वत: मान्यता होती; पण आजपासून हा मार्ग अधिकृत राष्ट्रीय महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे.
- राष्ट्रीय महामार्ग झाल्याने या रस्त्याच्या रुंदीकरणात वाढ होणार असून या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार आहे. त्याचा विकास आराखडा करण्याचे काम यापूर्वीच चालू झाले आहे.
- कोल्हापुरातून सध्या पुणे-बंगळूर व रत्नागिरी-नागपूर हे दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. यांपैकी पुणे-बंगळूर महामार्गास एनएच फोर म्हणून संबोधले जात असले तरी त्याचे नाव एशियन हायवे 48 असे आहे.
- गगनबावडा मार्ग राज्य महामार्गाच्या अखत्यारित होता. त्यावर इतके खड्डे होते की, वाहनचालक गगनबावडा रस्ता वगळून अन्य मार्गाने कोकणात जाणे पसंत करत होते. आता या मार्गाचा राष्ट्रीय महामार्गात समावेश झाल्याने रस्त्याची विकासकामे वेगाने करता येतील, असे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी सांगितले.
‘आयुष’ उद्योग क्षेत्रात अडीच कोटी रोजगार :
- केंद्र सरकारचा उपक्रम असलेल्या ‘आयुष’ उद्योग क्षेत्रात 2020 पर्यंत दहा लाख प्रत्यक्ष आणि जवळपास दोन कोटी 50 लाखांची अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे. सरकारकडून येत्या पाच वर्षांत आयुष क्षेत्राचा तिपटीने विस्तार होईल, असे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली.
- दिल्लीत आयोजित ‘आरोग्य 2017’ या परिषदेत प्रभू बोलत होते. ‘आयुर्वेदिक, योग, निसर्गोपचार, यूनानी आणि होमिओपथीचा समावेश असलेल्या ‘आयुष’ची सध्या देशांतर्गत बाजारपेठ 500 कोटींच्या आसपास आहे, तर निर्यात बाजारपेठ 200 कोटींपर्यंत आहे. अनेक नवे उद्योजक या क्षेत्रात स्टार्टअप सुरू करण्याच्या तयारीत असून, त्यांना खूप संधी आहेत.
- आपल्या देशातील पारंपरिक औषधोपचाराच्या माहितीची एकमेकांना देवाणघेवाण व्हावी, यासाठी सरकार सर्व देशांसोबत काम करण्यास तयार आहे. सरकारने ‘आयुष’ क्षेत्रात 100 टक्के थेट परकी गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.
- भारत हा हर्बल आणि ‘आयुष’ उत्पादनात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा निर्यातदार आहे. भारतात जवळपास 6,600 इतकी औषधी झाडे आढळून येतात. आता आपल्याला भारतीय उपचार पद्धतीला मुख्य प्रवाहात आणण्याची संधी उपलब्ध झाली आहे, असेही प्रभू म्हणाले.
दिनविशेष :
- 5 डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन’ म्हणून पाळला जातो.
- सन 1906मध्ये 5 डिसेंबर रोजी ‘नॅशनल इन्शुरन्स कंपनी’ची स्थापना झाली.
- ‘गौरव गिल’ यांनी 5 डिसेंबर रोजी 2016 आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा