Current Affairs of 5 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (5 फेब्रुवारी 2018)
अरुणाचलमध्ये 13,700 फूट उंचीवर बोगदा तयार होणार :
- जाहीर झालेल्या 2018-19 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अरुणाचल प्रदेशातील सेला खिंडीच्या मार्गावर बोगदा तयार करण्याची घोषणा केली होती. बोगदा तयार करण्याचे काम सीमा रस्ते संस्थेने रूदेखील केले आहे.
- 13,700 फूट उंचीवरील सेला भागात बोगदा तयार केल्यास अनेक फायदे होतील. पहिला फायदा अरुणाचल प्रदेशातील तवांगला होईल.
- बर्फवृष्टीमुळे तवांगचा नेहमीच उर्वरित भागापासून संपर्क तुटतो. परंतु हा बोगदा तयार झाल्यानंतर मात्र तवांग उर्वरित देशाशी जोडलेला राहील.
- तसेच बोगदा तयार झाल्यामुळे 4 हजार किमी लांबीची भारत-चीन सीमा सुरक्षेच्या दृष्टीने जास्त बळकट होऊ शकेल. तर तवांगपासून चीनचे अंतर 10 किमीने कमी होईल.
Must Read (नक्की वाचा):
भारताचे चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्याच्या तयारीत :
- महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहिमा अत्यल्प खर्चामध्ये आणि यशस्वीरीत्या पूर्ण करून नावलौकिक मिवणाऱ्या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) अजून एका महत्त्वाकांक्षी मोहितीमेची तयारी केली आहे.
- इस्रो आपल्या महत्त्वाकांक्षी चांद्रयान-2 योजनेच्या अखेरच्या टप्प्यात आहे. 2018 मध्ये हे चांद्रयान चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.
- तर चंद्राच्या दक्षिण गोलार्धावरील जागा या मिशनसाठी निवडण्यात आली आहे.
- तामिळनाडूतील महेंद्र गिरी येथील इस्रोच्या लिक्वीड प्रॉपल्शन सिस्टिम सेंटरवर सध्या या चांद्रमोहिम-2 च्या ‘टच डाऊन’ ची तयारी सुरू आहे.
- 70 ते 80 मीटर उंचीवरून चंद्रावर उतरताना किती वेग असावा याचा प्रोटोटाइपवर सराव करण्यात येत आहे.
आता ‘आधार’ लॉक करता येणार :
- बँक, निवृत्तिवेतनासह विविध शासकीय सेवांसाठी आधार कार्ड क्रमांक मागितला जातो. मोबाइलसाठी नवे सिम घ्यायचे असेल तरी आधार कार्डाचा क्रमांक मागितला जातो. यामुळे तुमची वैयक्तिक माहिती अथवा डाटा सार्वजनिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा आधार क्रमांक सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे. यासाठी ऑनलाइनवरून आधार क्रमांक सुरक्षित करू शकता.
- तसेच यूआयडीएआयच्या वेबसाइट udai.gov.in वर जाऊन तुमचा आधार क्रमांक लॉक- अनलॉक करू शकता.
आयसीसी युवा क्रिकेट संघात भारताच्या पाच खेळाडूंना स्थान :
- पृथ्वी शॉ याच्या नेतृत्वाखाली युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या भारतीय खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक संघावर हुकमत पाहायला मिळत आहे.
- आयसीसीने जाहीर केलेल्या जागतिक संघामध्ये भारताच्या पाच खेळाडूंना स्थान देण्यात आले आहे. यामध्ये कर्णधार पृथ्वी शॉ, मनज्योत कालरा, शुबमान गिल, अनुकूल रॉय आणि कमलेश नागरकोटी यांचा समावेश करण्यात आला आहे.
- भारतीय संघाने अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियावर 8 विकेट राखून सहज विजय मिळवत विक्रमी चौथ्यांदा युवा विश्वचषक उंचावण्याचा पराक्रम केला. या संपूर्ण स्पर्धेत फलंदाजी आणि गोलंदाजीत भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडली. त्यामुळेच त्यांना जागतिक संघातही स्थान मिळाले.
उत्तर प्रदेश सरकारची गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना
- उत्तर प्रदेश सरकारने गोमूत्रापासून औषधे तयार करण्याची योजना आखली असून त्याला उत्तेजनही दिले जाणार आहे.
- तेथील आयुर्वेद खात्याचे संचालक डॉ. आर.आर.चौधरी यांनी सांगितले, की आमच्या विभागाने गोमूत्रापासून आठ औषधे बनवली असून ती यकृत आजार, सांधेदुखी, प्रतिकारशक्तीची कमतरता यावर उपयुक्त आहेत.
- तसेच राज्यातील आयुर्वेद विभागाचे लखनौ व पीलभीत येथे दोन औषध प्रकल्प असून तेथे गोमूत्र, गाईचे दूध, तूप यापासून औषधे तयार केली जातात.
- गेल्या ऑगस्टमध्ये मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सरकारी कचेऱ्यात स्वच्छतेसाठी गोमूत्रावर आधारित र्निजतुक औषधांचा वापर करण्याचा आदेश दिला होता.
- तसेच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांनी याबाबत निवडक प्रकल्पांसाठी समिती नेमली असून त्यात पंचगव्यातील शेण, गोमूत्र, तूप, दूध व दही यांचे उपयोग व फायदे शोधून काढण्यास सांगण्यात आले आहे.
100 देशांमध्ये 24 तास ‘डीडी न्यूज’
- विदेशांतील भारतीयांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर भारताची भूमिका मांडण्यासाठी दूरदर्शनची 24 तास वृत्तसेवा 100 देशांत उपलब्ध करून देण्याचा विचार माहिती आणि प्रसारण मंत्रालय करीत आहे.
- सध्या दूरदर्शन इंडिया प्रामुख्याने विदेशांत वेगवेगळे सांस्कृतिक आणि करमणुकीचे कार्यक्रम प्रक्षेपित करीत आहे.
- नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, चीन आणि संयुक्त अरब अमिरात याच देशांत 24 तास वृत्त आणि चालू घडामोडींवरील कार्यक्रम सादर केले जातात.
- तसेच वाहिनी सुरू करताना देशाच्या एकूण लोकसंख्येतील भारतीयांचे प्रमाण, तेथून भारतात होत असलेली थेट गुंतवणूक व भारतातून तिकडे जाणारा पैसा, त्या देशातून येणारे पर्यटक या बाबींचा विचार होईल.
बीसीसीआयची वेबसाईट निघाली विक्रीला :
- जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ बीसीसीआय आपली अधिकृत वेबसाईट डब्ल्यू़ डब्ल्यू़ डब्ल्यू़ बीसीसीआय़ टीव्ही डोमेनचे नूतनीकरण न केल्याने ऑफलाईन झाली़ आहे.
- तर वेबसाईटची नोंदणी करणारी register.com आणि namejet.com ने या डोमेन नावाला सार्वजनिक बोलीसाठी ठेवले आहे़.
- त्याला आतापर्यंत सात बोली मिळाल्या आहेत़. यामध्ये सर्वात मोठी बोली 270 डॉलरची आहे़.
- बीसीसीआयची वेबसाईट ही भारताच्या आणि देशांतर्गत सामन्यांचे स्कॉरबोर्ड बघण्यासाठी आणि बीसीसीआय बोर्डाच्या कामकाज आणि काही महत्वाच्या बातम्यांसाठी महत्वाची ठरत आहे.
फेसबुकवर 20 कोटी बनावट अकाऊंट :
- फेसबुकवर जगभरात 20 कोटी बनावट किंवा दुहेरी खाती (अकाऊंट) असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
- त्यातील बहुतांश खाती भारत, इंडोनेशिया आणि फिलिपिन्स आदी विकसनशील देशांमधील आहेत. फेसबुकने केलेल्या ताज्या पाहणीत ही आकडेवारी उघड झाली.
मुंबई विमानतळाने मोडला स्वत:चा विक्रम :
- सर्वाधिक वर्दळ असलेला रनवे आहे मुंबई विमानतळाचा. तरीही 20 जानेवारी रोजी 24 तासांत 980 विमानांची ये-जा पूर्ण करून, या मुंबई विमानतळाने स्वत:चाच विक्रम मोडीत काढला. यापूर्वी 6 डिसेंबर रोजी याच विमानतळावर 24 तासांमध्ये 974 विमानांची ये-जा झाली होती.
- तसेच लंडनमधील गॅटविक विमानतळाची दर तासाला 55 एअर ट्रॅफिक कंट्रोल करण्याची क्षमता आहे, तर मुंबईची क्षमता 52 आहे.
हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून बनवेल दिवसात 10 हजार बॅरल इंधन :
- कॅनडाच्या कार्बन इंजिनिअर कंपनीने व्हँकोव्हर शहराजवळ एक प्रकल्प तयार केला आहे. तो हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून सिंथेटिक हायड्रोकार्बन इंधन तयार करेल. या इंधनामुळे प्रदूषण मुळीच होणार नाही.
- हा प्रकल्प एक वर्षात 10 लाख टन कार्बन डायऑक्साइड शोषेल. तो सुमारे 2.5 लाख वाहनांतून निघालेल्या कार्बन फुटप्रिंटएवढा असेल.
- तर हवेतून एक टन कार्बन डायऑक्साइड शोषण्यास 25 हजार ते 64 हजार रुपये खर्च येतो. पण कार्बन इंजिनिअरिंग फर्मच्या वैज्ञानिकांच्या मते या प्रकल्पात हा खर्च फक्त 6400 रुपये प्रतिटन असेल.
दिनविशेष :
- 1294 : अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी किल्ला सर केला आणि देवगिरीच्या यादव साम्राज्याचा अस्त झाला.
- 1948 : गांधी वर्धानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सुरक्षा-निर्बंधान्वये अटक झाली.
- 1952 : स्वतंत्र भारतात प्रथमच सार्वत्रिक निवडणुका झाल्या.