चालू घडामोडी (5 मे 2018)
देशात विद्युतीकरणाचे काम चांगल्याप्रकारे सुरू :
- भारतामध्ये विद्युतीकरणाचे काम अत्यंत चांगल्याप्रकारे सुरू असून, जवळपास 85 टक्के नागरिकांना आता वीज उपलब्ध झाली आहे, असे मत जागतिक बॅंकेने व्यक्त केले आहे.
- भारतामध्ये 2010 ते 2016 दरम्यान दरवर्षी 30 दशलक्ष नागरिकांना वीज उपलब्ध झाली असून, ही आकडेवारी इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहे, असे जागतिक बॅंकेने या आठवड्यात प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे.
- देशातील अद्यापही 15 टक्के म्हणजे एक कोटी 25 लाख नागरिकांना वीजपुरवठा करण्याचे आव्हान अद्यापही कायम आहे. 2030 पूर्वी वीज पुरविण्याची उद्दिष्टपूर्ती भारत पूर्ण करेल, असे जागतिक बॅंकेचे अर्थशास्त्री विविएन फोस्टर यांनी सांगितले. देशातील सर्व खेड्यांमध्ये वीज पोचली असल्याचा उल्लेख करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक आठवडाही झाला नसतानाचा जागतिक बॅंकेचा हा अहवाल आला आहे.
- जागतिक बॅंकेच्या अहवालात म्हटले आहे, की देशातील 85 टक्के नागरिकांना वीज उपलब्ध झाली आहे. विद्युतीकरणात भारत उत्तम कामगिरी करीत आहे. भारतातील 85 टक्के नागरिकांना वीज उपलब्ध झाल्याचे आम्ही जाहीर करीत आहोत, असे फॉस्टर यांनी सांगितले.
सेबीचा महत्त्वाचा निर्णय जाहीर :
- भारतीय भांडवल बाजार नियामक सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये व्यवहाराचा कालावधी (ट्रेडिंग) वाढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये आता रात्री 11.55 वाजेपर्यंत व्यवहार करता येणार आहे.
- नवीन बदल 1 ऑक्टोबर 2018 पासून लागू करण्यात येणार आहे. सध्या शेअर बाजारात शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार सकाळी 9:00 पासून दुपारी 3.30 वाजेपर्यंत सुरु असतात.
- स्टॉक एक्सचेंजला इक्विटी डेरिव्हेटिव्हज सेगमेंटमध्ये सकाळी 9:00 वाजेपासून रात्री 11:55 वाजेपर्यंत ट्रेडिंग सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटप्रमाणे आता इक्विटी डेरिव्हेटिव्हजमधील व्यवहार उशिरापर्यंत सुरु राहतील. कमॉडिटी डेरिव्हेटिव्ह सेगमेंटमध्ये सकाळी 10:00 ते रात्री 11:55 दरम्यान व्यवहार सुरु असतात.
- स्टॉक एक्स्चेंजने ट्रेडिंग कालावधी वाढवल्यास सेबीची परवानगी घेताना एक्स्चेंजकडील जोखीम व्यवस्थापन प्रणाली, सेटलमेंटची प्रक्रिया, मनुष्यबळाची उपलब्धता याबाबत सविस्तर माहिती द्यावी लागणार आहे.
‘स्वयम’ या कार्यक्रमांतर्गत महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार :
- केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांसाठीच्या ऑनलाइन रिफ्रेशर अभ्यासक्रमांसाठी देशभरातून निवडलेल्या 75 विद्यापीठे व उच्चशिक्षण संस्थांमध्ये (एनआरसी) महाराष्ट्र व गोव्यातून सर्वाधिक तब्बल दहा संस्थांचा समावेश आहे. ‘स्वयम‘ या कार्यक्रमांतर्गत हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला जाणार आहे.
- निवड झालेल्या संस्थांमध्ये मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, औरंगाबाद आणि गोवा विद्यापीठांचा समावेश आहे.
- यानुसार हवामान बदल, नेतृत्व-प्रशासन, अर्थशास्त्र, विज्ञान-तंत्रज्ञान, सागरी विज्ञान, आपत्ती व्यवस्थापन यांसारख्या अनेक क्षेत्रांत देशाला भविष्यातील दिशा दाखविण्याची जबाबदारी या उच्च शिक्षणसंस्था पार पाडणार आहेत.
- या वर्षअखेरपर्यंत या संस्थांनी उच्चशिक्षण क्षेत्रातील जागतिक संस्थांचा अभ्यास करून गुणात्मक व व्यावहारिक बदलांबाबत केंद्राकडे आराखडा सादर करायचा आहे. त्याचा अभ्यास केल्यानंतर तो देशभरात लागू करण्याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- देशातील उच्चशिक्षण संस्थांमध्ये किमान सुमारे दीड कोटी प्राध्यापक कार्यरत आहेत. यातील निवड झालेली 75 विद्यापीठे व आयआयटी, आयआयएम यांसारख्या शिक्षण संस्थांना एकेक विषय वाटून देण्यात आले आहेत.
भाजपकडून शेतकरी कर्जमाफीची घोषणा :
- कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यांत भाजपने 4 मे रोजी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. कर्नाटकमधील जनतेला मोफत भ्रमणध्वनी, लॅपटॉप देण्यात येणार असून महिलांना मंगळसूत्र आणि शेतकऱ्यांचे एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा करून भाजपने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
- केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पा यांनी निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला.
- शेतकरीवर्ग आणि शेतीशी निगडित उद्योगांना विशेष सवलती देण्यावर भर देण्यात आला आहे. दारिद्रय़रेषेखालील कुटुंबांना स्मार्ट पोन आणि महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप देण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.
महिला विशेष लोकलची 26 वर्षे पूर्ण :
- पश्चिम रेल्वेवर महिला प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या महिला विशेष लोकलला 26 वर्षे पूर्ण झाली. महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र लोकल ही संकल्पना पश्चिम रेल्वेने 6 मे 1992 रोजी सत्यात उतरवली होती. चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यान ही लोकल सुरू करण्यात आली होती.
- चर्चगेट ते बोरीवली स्थानकांदरम्यानच्या या महिला विशेषला महिला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. शिवाय महिला प्रवाशांना हक्काची लोकल मिळाल्यामुळे महिला प्रवाशांनी समाधान व्यक्त केले होते. प्रवाशांनी महिला विशेष लोकल विरारपर्यंत चालविण्याची मागणी केली.
- अखेर प्रवाशांच्या आग्रहास्तव 1993 मध्ये चर्चगेट-विरार स्थानकांदरम्यान महिला लोकलचा विस्तार करण्यात आला. सद्य:स्थितीत अप आणि डाऊन मार्गांवर बोरीवली-चर्चगेटसह विरार-चर्चगेट, भार्इंदर-चर्चगेट आणि वसई रोड-चर्चगेट या स्थानकांदरम्यान एकूण 8 महिला विशेष लोकल फेऱ्या खास महिलांसाठी सुरू आहेत.
दिनविशेष :
- पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी 5 मे 1901 रोजी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
- 5 मे 1922 हा दिवस छत्रपती राजार्षी शाहू महाराज यांचा स्मृतीदिन आहे.
- युरोप परिषदेने सन 1964 रोजी 5 मे हा युरोप दिन घोषित केला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा