चालू घडामोडी (6 मार्च 2018)
राज्यातील महापालिकांना जीएसटी अनुदान मंजुर :
- जीएसटीपोटी राज्य शासनाने पहिल्या टप्प्यात फक्त 18 महापालिकांसाठी अनुदान मंजूर केले आहे. त्यामध्ये सोलापूर महापालिकेचा समावेश नाही. त्यामुळे फेब्रुवारीचा पगार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या अनुदानापोटी महापालिकेस दरमहा 18 कोटी 60 लाख रुपये मिळतात.
- जीएसटीपोटी द्यावयाच्या अनुदानाचा आदेश दर महिनाअखेरीस किंवा तीन तारखेच्या आत जारी होतो. त्यामध्ये सर्व 27 महापालिकांना द्यावयाच्या अनुदानाचा उल्लेख असतो. मात्र, मार्च महिन्यासाठी शासनाने जारी केलेल्या अनुदानाच्या यादीत फक्त 18 महापालिकांचा समावेश आहे. त्यासाठी 280 कोटी 47 लाख रुपये तरतूद दाखवली आहे. याशिवाय, बृहन्मुंबईसाठी स्वतंत्र आदेश असून त्या महापालिकेस 647 कोटी 34 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
- अनुदान मंजूर झालेल्या महापालिका – जळगाव, नांदेड-वाघेळा, कोल्हापूर, औरंगाबाद, नगर, उल्हासनगर, अमरावती, चंद्रपूर, पिंपरी-चिंचवड, नागपूर, ठाणे, नवी मुंबई, सांगली, मिरज, कुपवाड, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, नाशिक, धुळे व अकोला.
133 देशांमध्ये भारतीय सैन्य चौथ्या क्रमांकावर :
- भारतीय सैन्याचे जगभरात कौतुक होत असल्याचे आपण अनेकदा ऐकतो. मात्र हे आता जगभरात अधिकृतपणे निश्चित झाले आहे. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सने 2017 मध्ये केलेल्या सर्वेक्षणावरुन नुकतीच एक जागतिक यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यानुसार 133 देशांमध्ये भारताचा जागतिक स्तरावर चौथा क्रमांक लागत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारतीय सैन्यासाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
- यामध्ये पहिल्या क्रमांकावर महासत्ता असलेला अमेरिका आहे, तर रशिया दुसऱ्या आणि चीन तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. विशेष म्हणजे भारताचा शत्रू आणि शेजारी असलेल्या पाकिस्तानचा या यादीत 13 वा क्रमांक आहे. मागच्याच वर्षी पाकिस्तानने या यादीत पहिल्या 15 मध्ये प्रवेश केल्यानंतर आपले स्थान कायम राखण्यात त्यांना यश आले आहे.
- तसेच फ्रान्स, यूके, जपान, तुर्की आणि जर्मनी हे देशही पहिल्या दहामध्ये स्थान टिकवून आहेत. या सर्वेक्षणासाठी सैन्याशी निगडित विविध 50 निकषांचा अभ्यास करण्यात आला होता. यात भौगोलिक स्थिती, लष्कराकडे असणारे स्त्रोत, सैनिकांचे प्रशिक्षण, तंत्रज्ञान, सैनिकांची संख्या यांचा आढावा घेण्यात आला.
महात्मा फुलेंना भारतरत्न द्या; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी :
- थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी किताब द्यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत केली. फुले दाम्पत्यास भारतरत्न जाहीर झाल्यास महाराष्ट्रच नव्हे तर देशातील सामाजिक सुधारणांच्या चळवळींचा तो गौरव ठरेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केली. नियम 377 अंतर्गत त्यांनी लोकसभेत ही मागणी केली.
- पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यामध्ये महात्मा फुले यांनी 1848 साली मुलींची शाळा सुरु केली. सावित्रीबाई फुले त्या शाळेतील पहिल्या शिक्षिका होत्या. या दोघांनी तत्कालिन सामाजिक व्यवस्थेला झुगारुन हे क्रांतीकारक पाऊल उचलले. स्त्री-पुरुष समानतेचा पाया त्यांनी घातला, असे सुप्रिया सुळेंनी सांगितले.
- तसेच दलित, शोषित, महिला आणि शेतकरी यांच्या भल्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला. त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा, यासाठी पक्षभेद विसरुन सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
फ्रान्सेस मॅकडोर्मंड ठरली सर्वोत्कृष्ट अभिनेत्री :
- डॉल्बी थिएटरमध्ये 90वा ऑस्कर पुरस्कार मोठ्या थाटात पार पडला. उत्साह, कुतूहल आणि लोकप्रियतेच्या परमोच्च शिखरावर असणाऱ्या या सोहळ्यात ‘थ्री बिलबोर्ड्स आऊटसाईड एबिंग, मिझूरी’ या चित्रपटाची नायिका फ्रान्सेस मॅकडोर्मंड हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
- तसेच याआधी 1997 मध्ये ‘फार्गो’ या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी तिने ऑस्कर पटकावला होता. हा मिळालेला पुरस्कार तिच्या सिनेकारकिर्दीतील दुसरा ऑस्कर ठरला.
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी फ्रान्सेस व्यतिरीक्त सॅली हॉकिन्स (द शेप ऑफ वॉटर), मार्गो रॉबी (आय, टोन्या), साईरसे रोणान (लेडी बर्ड), मेरिल स्ट्रीप (द पोस्ट) यांच्यात चुरशीची लढत होती. पण इतर चारही स्पर्धकांवर मात करत फ्रान्सेस मॅकडोर्मंडने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्कारावर आपले नाव कोरले.
महिला चित्रपट महोत्सव 9 मार्चपासून :
- आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारा महिला चित्रपट महोत्सव यंदा 9 मार्च ते 11 मार्च दरम्यान राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात रंगणार आहे.
- महिला पत्रकारांचा आयाम गट, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि आशय फिल्म क्लब यांच्या वतीने प्रभात रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) येथे हा महोत्सव होणार आहे. महोत्सवाचे यंदाचे नववे वर्ष आहे.
- ‘देशविदेशात भ्रमंती करणार्या प्रवासी महिला’ ही यंदाच्या महोत्सवाची संकल्पना असून, त्यावर आधारित चित्रपट महोत्सवात सादर केले जाणार असल्याची माहिती आयाम ग्रुपच्या मनस्विनी प्रभुणे आणि राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- संकल्पना, विषय आणि चित्रपट मांडणी याला अनुसरून देशविदेशांतील व प्रादेशिक भाषांतील काही गाजलेल्या चित्रपटांची प्रातिनिधिक निवड या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. सर्व चित्रपटांना इंग्रजी सबटायटल असून, हा महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.
दिनविशेष :
- सन 1840 मध्ये 6 मार्च रोजी बाल्टिमोर कॉलेज ऑफ डेंटल सर्जरी हे पहिले दंतवैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले.
- ‘रेआल माद्रिद फुटबॉल क्लब’ची स्थापना 6 मार्च 1902 मध्ये झाली.
- गझल गायक जगजितसिंग यांना मध्य प्रदेश सरकारतर्फे 1998 मध्ये लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
- देशातील पहिला अणुउर्जा प्रकल्प तारापुत येथे 6 मार्च 2005 रोजी सुरु झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा