Current Affairs of 7 February 2018 For MPSC Exams
चालू घडामोडी (7 फेब्रुवारी 2018)
रेशन कार्डही देशातील कोणत्याही दुकानांत चालणार :
- मोबाइल फोनचा नंबर न बदलता कंपनी ज्याप्रमाणे बदलता (पोर्टेबिलिटी) येते, त्याप्रमाणे यापुढे तुमचे रेशन कार्डही देशातील कोणत्याही शिधावाटप दुकानांत चालू शकेल. त्यासाठी एका राज्यातून वा शहरातून दुसरीकडे गेल्यावर आधीचे कार्ड रद्द करून नव्या ठिकाणी नवे कार्ड काढण्याची गरज भासणार नाही. हे शक्य करण्यासाठी सरकार सार्वजनिक वितरणप्रणाली एकीकृत व्यवस्थेवर (आयएम-पीडीएस) सध्या काम करीत आहे.तसेच महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक व तेलंगणासह काही राज्यांत ही पद्धत अंशत: लागू आहे.
- अन्न व सार्वजनिक पुरवठामंत्री रामविलास पासवान यांच्या माहितीनुसार आयएम-पीडीएस नावाची ही योजना 2018-2019 आणि 2019-2020 या काळात लागू होईल व त्यासाठी 127 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे.
- देशव्यापी पोर्टेबिलिटीशिवाय अतिरिक्त डुप्लिकेट रेशन कार्ड रद्द करण्याचेही काम त्याखाली केले जाईल. याअन्वये सार्वजनिक वितरणप्रणाली राज्यांच्या पोर्टल्सला जोडण्याबरोबरच रेशन कार्डचे व्यवस्थापन, वितरण, पुरवठा व रेशन दुकानांच्या स्वयंचलनाचेही काम केले जाणार आहे. याशिवाय पीडीएससाठी वेब आणि मोबाइल अँप्लिकेशनदेखील तयार केले जाणार आहे.
Must Read (नक्की वाचा):
अग्नी-1 क्षेपणास्त्राची उपयोजन चाचणी यशस्वी :
- भारताने अण्वस्त्र वहनक्षमता असलेल्या लघुपल्ल्याच्या अग्नी-1 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली असून ओदिशा येथील किनाऱ्यावर हे क्षेपणास्त्र उडवण्यात आले, अशी माहिती संरक्षण सूत्रांनी दिली. क्षेपणास्त्राचा पल्ला सातशे किलोमीटरचा असून, स्वदेशी बनावटीचे हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे आहे.
- स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडने संचालनात्मक सिद्धतेसाठी या क्षेपणास्त्राची चाचणी केली असून, व्हीलर बेटांवरील (आताचे डॉ. अब्दुल कलाम बेट) चार क्रमांकाच्या तळावरून हे अत्याधुनिक क्षेपणास्त्र सोडण्यात आले आहे. या चाचणीची सर्व उद्दिष्टे पूर्ण झाली असून ती यशस्वी झाली आहे असे सांगण्यात आले आहे.
- रडार, दूरसंवेदन यंत्रणा व प्रकाशीय उपकरणांनी त्याचा मार्ग टिपण्यात आला. लक्ष्य प्रदेशात क्षेपणास्त्राने अचूक मारा केल्याचे स्पष्ट करण्यात आले. अग्नी-1 क्षेपणास्त्रात घन इंधन वापरण्यात आले असून त्यात विशेष दिशादर्शन प्रणाली आहे. तसेच अग्नीची निर्मिती अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लॅबोरेटरीने संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा यांच्या मदतीने केली आहे.
लॅमिनिटेड, प्लास्टिक कोटेड आधार कार्ड बिनकामाचे :
- तुम्ही तुमच्या आधार कार्डला लॅमिनेशन केले असेल किंवा प्लास्टिक कोटिंग लावले असेल तर त्या आधारला काहीही अर्थ उरणार नाही ते बिनकामाचे ठरणार आहे असे आता UIDAI ने स्पष्ट केले आहे.
- लॅमिनेशन केल्याने किंवा प्लास्टिक कोटिंगमुळे आधार कार्डचा क्यू आर कोड काम करणे बंद होऊ शकते, किंवा यामुळे खासगी माहिती चोरली जाऊ शकते अशी शक्यता आहे. त्यामुळेच हा निर्णय UIDAI ने घेतला आहे.
कर्जमाफी न मिळालेल्यांना करता येणार ऑनलाइन तक्रार :
- सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेअंतर्गत आतापर्यंत 31 लाख 32 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम कर्जाची रक्कम वितरित करण्यात आली आहे.
- या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अथवा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.
- कर्ज खाती योजनेच्या निकषात न बसणाऱ्या एकूण 4 लाख 77 हजार कर्ज खात्यांबाबतची (पिवळी यादी) माहिती संकेतस्थळाद्वारे बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यातील 1 लाख 75 हजार खात्यांची तपासणी करून फेर प्रक्रियेसाठी संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे.
दिनविशेष :
- 1971 : स्वित्झर्लंडमधे महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला.
- 1974 : ग्रेनाडा हा देश युनायटेड किंग्डमपासुन स्वतंत्र झाला.
- 1977 : सोवियेत संघाने सोयुझ 24 हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- 1999 : युवराज अब्दुल्ला जॉर्डनच्या राजेपदी विराजमान.