चालू घडामोडी (7 जून 2018)
रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दरात वाढ :
- रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात बदल करत पाव टक्क्याची वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता आरबीआयने रेपो रेट 6 टक्क्यांवरून पाव टक्क्याने वाढवत 6.25 टक्क्यांवर आणला आहे. तर, रिव्हर्स रेपो दर देखील 0.25 टक्क्याने वाढवून 6 टक्के करण्यात आला आहे. साडेचार वर्षांनंतर बॅंकेकडून दरवाढ करण्यात आली आहे. गेल्या चार पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात कोणतेही बदल केले नव्हते.
- अन्नधान्ये, भाजीपाला, इंधनातील वाढत्या किंमतींनी महागाईचा आगडोंब उसळल्याने आरबीआयवरील दबाव वाढला होता. महागाईची चिंता लागून राहिलेल्या “आरबीआय”च्या पतधोरण समितीची व्दैमासिक बैठक मुंबईत सुरू होती. आता रेपो दरवाढ झाल्याने कर्जे महागणार असून मासिक हप्त्याचा जादा भार कर्जदाराला सोसावा लागण्याची शक्यता आहे.
- गेल्या महिनाभरात बहुतांश बॅंकांनी ठेवी आणि कर्जदरात वाढ केली होती. त्यामुळे आता आरबीआयने रेपोदर वाढवल्याने कर्जाचा दर आणखी वाढण्याची शक्यता बळावली आहे. एप्रिलमधील पतधोरणाच्या बैठकीत डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य आणि मायकल डी पात्रा या दोन सदस्यांनी व्याजदरवाढीच्या बाजुने कौल दिला होता. यंदा प्रथमच पतधोरण समितीची बैठक तीन दिवस चालली. आधीपासूनच रेपोदरात किमान पाव टक्क्याची वाढ अपेक्षित होती.
जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूंपैकी विराट एक :
- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा फोर्ब्ज मासिकानुसार ‘जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं’पैकी एक आहे. या यादीत तो 83व्या क्रमांकावर आहे.
- भारतीय खेळाडूंपैकी फक्त कोहलीच या यादीत समाविष्ट आहे. 2.4 कोटी अमेरिकन डॉलर कमावणारा विराट हा फोर्ब्जच्या संकेतस्थळानुसार केवळ एकटा भारतीय खेळाडू आहे. विशेष बाब म्हणजे ‘जगात सर्वाधिक कमाई असलेल्या खेळाडूं’च्या ‘टॉप 100‘ यादीत एकाही महिला खेळाडूचे नाव नाही.
- यावेळी फोर्ब्ज संकेतस्थळावर वेगवेगळ्या 11 खेळांमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यात 100 पैकी 40 फुटबॉल खेळाडू आहेत. बेसबॉलमधील 14 खेळाडु, सॉसरमधील 9 खेळाडु, गॉल्फमधील 5 खेळाडु, बॉक्सिंग व टेनिसमधील प्रत्येकी 4 खेळाडु, रेसिंगमधील 3 खेळाडु असे ‘टॉप 100‘ खेळाडु समाविष्ट आहेत.
- महिला खेळाडुंपैकी ली ना, मारिया शारापोआ व सेरेना विल्यम्स या ‘टॉप 100‘च्या यादीत असायच्या, पण ली 2014 मध्ये निवृत्त झाली. तर मारिया शारापोवावर खेळण्याची बंदी असल्याने तीही या यादीत समाविष्ट नाही.
एसटीच्या तिकिटात 18 टक्के दरवाढ :
- एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसच्या तिकीट दरात 15 जूनपासून 18 टक्के वाढ केली जाणार आहे. हा निर्णय नाइलाजास्तव घेण्यात येत आहे, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले.
- रावते म्हणाले, की वाढता डिझेल खर्च आणि कामगारांच्या वेतनवाढीमुळे तिकीटदरात 30 टक्के वाढ करावी, असे महामंडळाने प्रस्तावित केले होते; मात्र प्रवाशांवर अधिक आर्थिक भार पडू नये, यासाठी ही दरवाढ 30 टक्क्यांऐवजी केवळ 18 टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला. इंधन दरवाढीमुळे महामंडळावर दरवर्षी सुमारे 460 कोटींचा बोजा वाढला आहे.
- तसेच कामगारांसाठी नुकतीच 4,849 कोटींची वेतनवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर आर्थिक बोजा पडला आहे. त्यामुळे तिकीट दरवाढ करण्याशिवाय पर्याय नव्हता.
- राज्य सरकारने डिझेलवरील विविध कर माफ करावेत, अशी मागणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मागणीला त्यांच्यासह अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ही मागणी मान्य झाल्यास तिकीट दरवाढीबाबत फेरविचार केला जाईल, असेही रावते यांनी स्पष्ट केले.
ऑस्ट्रेलियाचे सीईओ जेम्स सदरलँड यांचा राजीनामा :
- क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) जेम्स सदरलँड यांनी पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. 17 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सदरलँड हे पद सोडणार आहेत.
- राजीनामा देताना जेम्स सदरलॅंड यांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी सामन्यात झालेल्या बॉल टॅम्परिंग आणि खेळाडूंच्या वेतन करारावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आपण राजीनामा देत आहोत.
- मुख्य कार्यकारी सदरलँडने यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाला 12 महिन्यांची नोटीस दिली असून जोपर्यंत त्यांना योग्य पर्याय मिळत नाही तोपर्यंत ते या पदावर कार्यरत राहतील. सदरलँड म्हणाले, कि जवळपास 20 वर्षाच्या सेवेनंतर आता थांबण्याची ही योग्य वेळ आहे.
- मार्च महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील तिसऱ्या कसोटीदरम्यान माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व फलंदाज कॅमरुन बँक्रॉफ्ट यांना बॉल टॅम्परिंगबद्दल दोषी ठरविण्यात आले. त्यावेळी जेम्स सदरलँड यांच्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव होता. परंतु तत्कालीन प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी राजीनामा दिल्यामुळे सदरलँड पदावर कायम राहिले.
NRI लग्नाची 48 तासात नोंदणी होणे आवश्यक :
- भारतात एखाद्या तरुणीचे एनआरआय पुरुषासोबत लग्न झाल्यास 48 तासात नोंदणी झाली पाहिजे असा आदेश मनेका गांधी यांच्या केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
- सध्या भारतात लग्नाची नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं वेळेचं बंधन नाहीये. कायदा आयोगाच्या अहवालात लग्नाची नोंदणी करण्यासाठी 30 दिवसांचं बंधन असलं पाहिजे, त्यानंतर प्रत्येक दिवसामागे पाच रुपयांचा दंड ठोठावण्यात यावा अशी शिफारस करण्यात आली आहे.
- ‘एनआरआय लग्नाची नोंदणी 48 तासात झाली पाहिजे, अन्यथा पासपोर्ट किंवा व्हिसा मिळणार नाही‘, असं मनेका गांधींनी सांगितलं आहे. पुढे त्यांनी सांगितलं की, महिला आणि बालविकास मंत्रालयाने रजिस्ट्रारना अशा लग्नांची माहिती पुरवण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरुन सेंट्रल डेटाबेसदेखील अपडेट राहिल.
‘दलित’ शब्द वापरण्यावर केंद्र सरकारची बंदी :
- शासकीय कामकाजामध्ये ‘दलित‘ शब्दाचा वापर न करता अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती असा शब्दप्रयोग करावा, अशी अधिसूचना केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने 15 मार्च 2018 ला प्रसिद्ध केली असून त्याच धर्तीवर राज्य सरकारही चार आठवडय़ात निर्णय घेणार आहे.
- केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय व भारतीय प्रेस कौन्सिलने प्रसार माध्यमांमध्येही या शब्दाचा वापर करू नये, यासाठी उपाययोजना करावी, असे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले.
- या संदर्भात दाखल जनहित याचिकेवर न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झका हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यावेळी वरील आदेश दिले. सामाजिक कार्यकर्ते पंकज मेश्राम यांनी ही याचिका दाखल केली होती.
- एका विशिष्ट समुदायासाठी होणारा ‘दलित’ शब्दप्रयोग असंवैधानिक आहे. या शब्द वापराला घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी विरोध केला होता.
- शासकीय, परिपत्रके, अधिसूचना आणि विविध शासकीय दस्तावेजांमध्ये हा शब्द वापरला जातो. हे संविधानाच्या अनुच्छेद 14, 15, 16, 17, 19, 31 आणि 341 चे उल्लंघन आहे. अनुसूचित जाती आयोगानेही याला विरोध केला आहे.
दिनविशेष :
- महात्मा गांधीं यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ 7 जून 1893 मध्ये सुरू केली होती.
- 7 जून 1975 मध्ये क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.
- आंतरराष्ट्रीय नाणे निधीच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी 7 जून 1994 रोजी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा