चालू घडामोडी (7 मे 2018)
लोहगाव विमानतळ देशात तिसरे :
- प्रवासी संख्येच्या वाढीमध्ये लोहगाव विमानतळाने देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. तब्बल 20.6 टक्क्यांनी प्रवासी संख्या वाढली आहे.
- तसेच कोलकता पहिल्या, तर अहमदाबाद विमानतळ दुसऱ्या स्थानावर आहे.
- देशातील दहा विमानतळांवरून दरवर्षी पन्नास लाखांपेक्षा जास्त प्रवाशांची ये-जा होते. लोहगाव विमातळावरून 2017-18 या वर्षात 81 लाख 60 हजार प्रवाशांची वाहतूक झाली होती. त्यामुळे देशात ते विमानतळ नवव्या स्थानावर होते. परंतु, प्रवासी संख्यावाढीचा लोहगाव विमानतळाचा वेग 20.6 टक्के असल्यामुळ ते तिसऱ्या स्थानावर आले आहे.
- पुण्यातून मध्यम आणि हलक्या आकाराच्या विमानांचीच वाहतूक होत असूनही, पुण्यात प्रवासीवाढीचा वेग मोठा आहे, अशी माहिती लोहगाव विमानतळाचे संचालक अजय कुमार यांनी दिली.
प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण सक्तीचे :
- उच्चशिक्षण क्षेत्रातील प्राध्यापकांना ऑनलाइन प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. ‘स्वयम’च्या माध्यमातून 15 लाख प्राध्यापकांच्या उजळणी प्रशिक्षणासाठी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने 75 राष्ट्रीय केंद्रे अधिसूचित केली आहेत. त्यात पुणे, मुंबई, नागपूर, अमरावती, औरंगाबादमधील 9 शैक्षणिक संस्थांच्या केंद्रांचा समावेश आहे.
- हवामान बदल, ऊर्जा व्यवस्था अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान, अर्थशास्त्र, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास या विषयांचे अभ्यासक्रम असतील.
- केंद्रांमध्ये ऑनलाइन प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केला जाईल. त्यात प्रत्येक विषयाची अद्ययावत माहिती, नवे आणि येऊ शकणारे विषय, शैक्षणिक सुधारणा आणि सुधारित अभ्यासक्रम शिकवण्यासाठीच्या पद्धती या सगळ्यांचा विचार करणे अपेक्षित आहे.
- विषय आणि ज्येष्ठते पलीकडे प्राध्यापकांना नवे तंत्रज्ञान आणि शिकविण्याच्या आधुनिक पद्धतीचे ज्ञान या अभ्यासक्रमातून मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात निवड केलेल्या 75 संस्थांमध्ये पंडित मदनमोहन मालवीय राष्ट्रीय शिक्षक आणि शिक्षण अभियानांतर्गतचे केंद्रीय विद्यापीठ, आयुका, आय.आय.एस., आय.आय.टी., आय.आय.एस.ई.आर., एन.आय.टी. अन् राज्यातील विद्यापीठे आहेत.
- तसेच या संस्थांमधून चालवल्या जाणाऱ्या प्रशिक्षण अभ्यासक्रमांत समाजशास्त्र, विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, वाणिज्य, व्यवस्थापन, शिक्षण नियोजन आणि व्यवस्थापन, सार्वजनिक धोरण, नेतृत्व आणि प्रशासन, लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन सायन्स आणि खगोल विज्ञान अशा अनेक विषयांचा समावेश आहे.
माझी मेट्रो जर्मनीतील मेट्रोपेक्षाही फास्ट असेल :
- नागपुरातील ‘माझी मेट्रो’चे काम जर्मनीतील मेट्रो रेल्वेच्या कामापेक्षाही वेगाने होत आहे. त्यामुळे माझी मेट्रो निश्चित कालावधीत धावेल, असा विश्वास या प्रकल्पाला चार हजार कोटींचे कर्ज देणाऱ्या जर्मनीच्या केएफडब्ल्यू एजन्सीच्या दक्षिण आशिया प्रादेशिक व्यवस्थापक यास्मिन तौफिक यांनी सांगितले. एकूणच मेट्रोचे डिझाइन अद्वितीय असल्याचे नमूद करीत माझी मेट्रोवर त्यांनी स्तुतिसुमने उधळली.
- एअरपोर्ट साऊथ ते खापरीपर्यंत जर्मनीच्या पथकाने आज मेट्रोतून प्रवास केला. अर्थसाहाय्य करणाऱ्या सांघिक मंत्रालयाचे दक्षिण आशिया विभागाचे भारतातील प्रमुख डॉ. वोल्फ्राम क्लेन यांच्या नेतृत्वातील पथकात वरिष्ठ अधिकारी लिस्बेथ मुलर, जर्मन दूतावासातील अर्थपुरवठा विभागाच्या प्रमुख सुजेन डोरासिल, केएफडब्ल्यू बॅंकेच्या दक्षिण आशिया विभागाच्या व्यवस्थापक यास्मिन तौफिक, केएफडब्ल्यूच्या भारतातील नागरी विकास क्षेत्राचे तज्ज्ञ पास्कल सावेड्रा, केएफडब्ल्यूतील नागरी विकास व वाहतूक विभागाचे प्रधान अभियंता पिटर रुनी, स्वाती खन्ना, भारताच्या नागरी विकास विभागाच्या अधिकारी ममता बत्रा आदींचा समावेश होता.
चीनच्या अर्थव्यवस्थेची निर्यातीत घसरण :
- चीनमध्ये पहिल्या तिमाहीत सतरा वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच चालू खात्यावर तूट दिसून आली आहे. गेली काही वर्षे चीनची जगात निर्यातीत मक्तेदारी होती ती आता संपत चालल्याची ही लक्षणे आहेत.
- चीनकडे 3.14 लाख कोटी डॉलर्सची परकीय चलन गंगाजळी होती व सर्वात जास्त परकीय चलन असलेला तो देश होता. चीनमध्ये आता चालू खात्यावर पहिल्या तिमाहीत 28.2 अब्ज डॉलर्सची तूट दिसून आली आहे. 2001 मध्ये यापूर्वी अशी तूट दुसऱ्या तिमाहीत दिसली होती.
- स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज या संस्थेच्या आकडेवारीतून ही बाब सामोरी आली आहे. वस्तूंच्या व्यापारात अजूनही चीनची 53.4 अब्ज डॉलर्सची आघाडी आहे. सेवा व्यापारात 76.2 अब्ज डॉलर्सची तूट दिसून आली जी 1998 पासूनची सर्वात मोठी तूट आहे, असे चीनच्य कैझिन नियतकालिकाने म्हटले आहे.
- स्टेट अॅडमिनिस्ट्रेशन ऑफ फॉरेन एक्सचेंज या संस्थेने म्हटले आहे, की पहिल्या तिमाहीत तूट दिसली असली तरी ती काही मोसमी कारणांमुळे आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते ही तूट तात्कालिक कारणांमुळे नसून तो चीनच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातील परिणाम असून गेल्या दहा वर्षांतील आर्थिक फेरसमतोलाचा तो भाग आहे.
मुंबई ते मांडवा जलवाहतुक सेवेचा काम वेगाने :
- मुंबई ते मांडवा रो-रो जलवाहतुक सेवेच्या कामाचा वेग वाढला आहे. मांडवा टर्मिनलचे काम रंगाळल्याने एप्रिल महिन्यात ही सेवा सुरु होऊ शकली नव्हती. याची गंभीर दखल मेरीटाईम बोर्डाने घेतली आहे. टर्मिनलचे उर्वरीत काम पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली जात आहे.
- केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत, मुंबईतील भाऊचा धक्का ते अलिबाग तालुक्यातील मांडवा दरम्यान सागरी माग्रे रो-रो सेवा सुरु करण्यात येणार आहे.
- केंद्रीय जलवाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी ही सेवा एप्रिल महिन्यात सुरु होईल. असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र मांडवा टर्मिनल येथील काम रखडल्याने रो-रो सेवेचा मुहूर्त टळला.
- एकेकाळी कोकणात प्रवासी आणि मालाच्या वाहतुकीसाठी जलवाहतूक हा प्रमुख पर्याय होता. पुढे गावागावात रस्त्यांचे जाळे विणले गेले. एस.टी. धावू लागली. त्यामुळे जलवाहतूक मागे पडली.
- तसेच आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई ते गोवा अशी पश्चिम किनारपट्टीवर जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारच्या सागरमाला प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्याचा भाऊचा धक्का ते मांडवा अशी प्रवासी रो-रो सेवा सुरू करण्यात येणार आहे.
दिनविशेष :
- जॉन इलियट ड्रिंकवॉटर बेथुन यांनी 7 मे 1849 रोजी कलकत्ता फिमेल स्कूल सुरू केले.
- 7 मे 1880 रोजी भारतरत्न ‘पांडुरंग वामन काणे’ यांचा जन्म झाला.
- मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम 7 मे 1907 मध्ये सुरू झाली.
- 7 मे 1946 रोजी सोनी ह्या कंपनी ची स्थापना झाली.
- एअर इंडिया ची मुंबई-टोकियो विमानसेवा 7 मे 1955 रोजी सुरू झाली.
- 7 मे 1990 मध्ये लता मंगेशकर यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा