चालू घडामोडी (8 जुलै 2017)
अखिल भारतीय संमेलनाच्या अध्यक्षपदी लीला शहा :
- कोल्हापूरजवळील जयसिंगपूर येथे 22 ते 24 सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या 22व्या अखिल भारतीय मराठी जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डोंबिवलीतील प्रथितयश लेखिका लीला शहा यांची निवड करण्यात आली आहे.
- महाराष्ट्र जैन साहित्य परिषद लक्ष्मीसेन महाराज यांच्यातर्फे जैन साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी शहा यांची निवड करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
- समितीचे श्रीधर हिरवडे, डी.ए. पाटील, रावसाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यांनी हा निर्णय शहा यांना कळवला आहे.
- लीला शहा यांचा जन्म 1935 मध्ये झाला. त्यांची मातृभाषा ही गुजराती असली तरी त्यांच्या सात पिढ्यांचा संपर्क हा मराठीशी आहे.
- जैन साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद यापूर्वी सुरेखा शहा व शरयू दप्तरी यांनी भूषवले आहे. त्यांच्यानंतर शहा यांना हा बहुमान मिळाला आहे.
गोवा प्रदेशाध्यक्षपदी शांताराम नाईक यांची नियुक्ती :
- काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी गोव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून शांताराम नाईक यांची नियुक्ती केली आहे.
- शांताराम नाईक हे राज्यसभेचे विद्यमान खासदार आहेत. त्यांची मुदत राज्यसभा खासदार म्हणून याच महिन्याच्या अखेरीस संपुष्टात येणार आहे. त्यांनी यापूर्वी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम केलेले आहे.
- विद्यमान प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी गेल्याच आठवडय़ात आपल्याला पदमुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांच्याकडे केली होती.
- तसेच फालेरो हे 8 जुलै रोजी आपल्या पदाची सूत्रे शांताराम नाईक यांच्याकडे सोपवणार आहे.
जी-20 सदस्य देशांनी केला दहशतवाद खात्म्याचा संकल्प :
- जर्मनीतील हॅम्बर्ग येथे सुरू असलेल्या जी-20 संमेलनातील सर्व नेत्यांनी दहशतवादाविरोधात आपली स्पष्ट भूमिका मांडली.
- संमेलनाच्या शेवटी प्रसिद्ध करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात जी-20 नेत्यांनी जगभरातील दहशतवादी कारवायांचा तीव्र शब्दात निषेध केला. दहशत आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणाऱ्यांविरोधात एकजूट करण्याची घोषणा केली.
- जी-20 संमेलनात जगातील आघाडीच्या देशांचे नेते म्हणाले, “दहशतवादाच्या प्रसारासाठी इंटरनेट आणि सोशल मीडियाचा उपयोग होऊ नये, यासाठी सर्व देश खाजगी विभागासोबत मिळून काम करतील.”
- तसेच यावेळी सर्व देशांमध्ये दहशतवादासंदर्भातील माहितीची देवाणघेवाण करण्याबाबतही एकमत झाले. जेव्हा दहशतवाद्यांना जगात कुठेही सुरक्षित आसरा आणि आर्थिक मदत मिळणार नाही, तेव्हाच दहशतवादाचा खात्मा करणे शक्य होईल, असेही या नेत्यांनी सांगितले.
दिनविशेष :
- 8 जुलै 1497 रोजी वास्को दा गामाने भारताकडे समुद्रमार्गे प्रयाण केले होते.
- भारतीय अर्थशास्त्रज्ञ वी.के.आर.वी.राव (विजेंद्र कस्तुरीरंग वरदराज राव) यांचा जन्म 8 जुलै 1908 मध्ये झाला.
- 8 जुलै 1916 रोजी मराठी कादंबरीकार ‘गोपाल नीलकंठ दांडेकर’ (गो.नी. दांडेकर) यांचा जन्म झाला.
- भारतीय क्रिकेट खेळाडू, माजी कर्णधार ‘सौरव गांगुली’ यांचा 8 जुलै 1972 हा जन्मदिन आहे.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा