चालू घडामोडी (8 जून 2018)
आज लागणार दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल :
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 8 जूनला जाहीर केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
- राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना हा निकाल 8 जून रोजी दुपारी 1 वाजता mahresult.nic.in बोर्डाच्या संकेतस्थळावर पाहायला मिळणार आहे.
- राज्यभरातून सुमारे 18 लाख विद्यार्थ्यांनी दहावी बोर्ड परीक्षा दिली. राज्य शिक्षण मंडळाकडून ही परीक्षा मार्च महिन्यात घेण्यात आली होती. त्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांचे जाहीर केले जाणार आहेत.
- बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल 28 मेला जाहीर झाला होता. त्यानंतर आता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 8 जूनला जाहीर केला जाणार आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती देण्यात आली.
आता केंद्राची असणार खासगी आयुष्यावर नजर :
- देशातील जनतेच्या खासगी आयुष्यावर करडी नजर ठेवण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाविरोधातील लढाई तीव्र झाली असून ‘इंटरनेट फ्री फाऊंडेशन‘ या संस्थेने केंद्राला कायदेशीर नोटीस बजावली आहे.
- समाजमाध्यमांवरील लोकांच्या प्रत्येक कृतीची नोंद ‘सोशल मीडिया कम्युनिकेशन हब‘ या यंत्रणेच्या माध्यमातून ठेवली जाणार आहे.
- फेसबुक, ट्विटरसारखी 12 समाजमाध्यमे तसेच ई-मेलमधील माहितीही सरकारकडे जमा होईल. या धोरणामुळे प्रत्येक देशवासीयाच्या खासगी आयुष्यावरच सरकारचे नियंत्रण येणार आहे. त्याला विविध स्तरांतून विरोध होत आहे.
- राज्य घटनेने देशातील प्रत्येक नागरिकाला खासगी आयुष्य जगण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. या अधिकारावरच घाला घातला जात असल्याचे मत ‘इंटरनेट फ्रीडम फाऊंडेशन‘चे सहसंस्थापक आणि सर्वोच्च न्यायालयातील वकील अपार गुप्ता यांनी नोंदवले.
IIT मुंबई ठरले देशातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठ :
- शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञ कंपनी म्हणून ओळख असलेल्या Quacquarelli Symonds (QS) या कंपनीने जगातील विद्यापीठांची रॅकिंग जाहीर केली आहे. यामध्ये भारतातील आयआयटी आणि आयआयएस या संस्था उत्कृष्ट विद्यापीठ ठरल्या आहेत.
- पहिल्या 200 विद्यापीठांच्या यादीत आयआयटी मुंबई 162व्या स्थानावर, आयआयएस बंगळूरू (170) तर आयआयटी दिल्ली 172व्या स्थानावर आहेत. यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीवर मात केली असून ही संस्था देशातील सर्वोत्कृष्ट संस्था ठरली आहे. 6 जून रोजी रात्री हे क्युएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जाहीर करण्यात आले.
- आयआयटी मुंबईने आयआयटी दिल्लीला पिछाडीवर सोडत 17 व्या स्थानाने वर उडी घेतल्याने ती देशातील सर्वात अव्वल रँकची शैक्षणिक संस्था ठरली आहे.
- तर दुसरीकडे आयआयएस बंगळूरू या संस्थेनेही आयआयटी दिल्लीला मागे टाकले आहे. मात्र, असे असले तरी टॉप 150 मध्ये या संस्थेला स्थान मिळवता आलेले नाही.
नवरा बायकोचे डेबिट कार्ड वापरू शकत नाही :
- बँकेकडून देण्यात येणाऱ्या डेबिट कार्डच्या माध्यमातून कोणालाही पैसे काढता येतात. मात्र, आता पती किंवा इतर नातेवाईक आणि मित्रांना पैसे काढण्यास सांगणे, चांगलेच महागात पडणार आहे.
- कारण भारतीय स्टेट बँकेने सांगितले, की डेबिट कार्ड अहस्तांतरित असल्याने खातेदाराशिवाय कोणालाही डेबिट कार्डचा वापर करता येऊ शकत नाही. मग नवरा असो किंवा अन्य कोणीही नातेवाईक.
- मराठाहल्ली येथील रहिवासी असलेल्या वंदना यांनी त्यांचे पती राजेश कुमार यांना त्यांच्या बँक खात्यातून 25 हजार रूपये काढण्यासाठी त्यांचे डेबिट कार्ड पिनसह दिले होते. त्यानुसार राजेश एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. त्यांनी एटीएम कार्डच्या पिनसह रक्कम टाकली. मात्र, एटीएम मशिनमधून पैसे न येता थेट पैसे काढल्याची रिसिटच प्राप्त झाली. त्यामुळे राजेश कुमार यांनी त्वरित याबाबतची माहिती स्टेट बँकेला दिली.
- तसेच यावर स्टेट बँकेने सांगितले, की एटीएम कार्ड हे अहस्तांतरित असून, ज्यांनी ही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला त्यांना पैसे काढण्याचा अधिकार नाही.
भारतीय महिला क्रिकेट संघाचा श्रीलंकेवर विजय :
- बांगलादेशविरुद्ध पराभवाचा झटका बसल्यानंतर, भारतीय महिला क्रिकेट संघाने आशिया चषकात दमदार पुनरागमन केले आहे. श्रीलंकेच्या संघावर 7 गडी राखून मात करत भारतीय महिलांनी स्पर्धेतला आपला तिसरा विजय नोंदवला.
- तसेच या विजयासह भारतीय महिलांचं अंतिम फेरीत स्थान मिळवण्याच्या शक्यता अजुनही कायम आहेत. डावखुरी फिरकीपटू एकता बिश्तची अष्टपैलू कामगिरी आणि इतर गोलंदाजांनी तिला दिलेली साथ हे आजच्या दिवसाच्या खेळाचं प्रमुख वैशिष्ट्य राहिलं.
- मिताली राजने 20 धावात 2 बळी घेत 2 श्रीलंकन फलंदाजांना धावचीत करुन माघारी धाडलं. भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा केल्यामुळे श्रीलंकेचा संघ 107 धावांवर आटोपला.
- श्रीलंकेने दिलेल्या 108 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने डावाची आक्रमक सुरुवात केली. मात्र ठराविक अंतरानंतर भारताच्या 3 फलंदाज माघारी परतल्या. 70/3 या धावसंख्येवरुन वेदा कृष्णमुर्ती आणि अनुजा पाटील यांनी नाबाद 40 धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
दिनविशेष :
- 8 जून हा दिवस जागतिक मेंदूचा ट्यूमर दिन तसेच जागतिक महासागर दिन आहे.
- लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात असताना लिहुन पूर्ण केलेल्या ‘गीतारहस्य‘ या ग्रंथाचे 8 जून 1915 मध्ये गायकवाड वाड्यात प्रकाशन झाले.
- 8 जून 1918 रोजी नोव्हा अॅक्विला या सर्वाधिक तेजस्वी तेजोमेघाचा शोध लागला.
- एअर इंडिया ची 8 जून 1948 मध्ये मुंबई-लंडन विमानसेवा सुरू झाली.
- पहिल्यांदा जागतिक महासागर दिन 8 जून 1992 रोजी साजरा केला गेला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा