चालू घडामोडी (8 मे 2018)
बर्फाचा महाराष्ट्र हा पॅटर्न देशभर लागू :
- महाराष्ट्रातील अन्न प्रशासनाने सुचविलेला बर्फ उत्पादनासंदर्भातील पॅटर्न केंद्र सरकारने स्वीकारला असून देशातील सर्वच राज्यांना तो लागू केला आहे.
- खाद्य व औद्योगिक अशा वर्गीकरणामुळे बर्फ उत्पादकांनी चूक केल्यास भविष्यात कारवाईचा दंडुका उगारला जाणार आहे. हा आदेश देशभरात 1 जून 2018 पासून लागू होणार आहे.
- अन्न प्रशासनाने गेले काही दिवस बर्फ उत्पादनासंदर्भात पाठपुरावा केला. खाद्य व अखाद्य अशा वर्गीकरणातील बर्फ सर्वसामान्यांनाही समजावा यासाठी अभ्यास केला. औद्योगिक (अखाद्य) बर्फ समजावा यासाठी त्यात खाण्यास योग्य असा फिका निळा रंग मिसळण्याचा प्रस्ताव तयार केला.
- खाद्य बर्फ मात्र पारदर्शक असावा, म्हणजे दोन्ही बर्फातील फरक लक्षात येईल, अशी योजना आहे. निळ्या रंगाचा बर्फ खाण्यात आला तरी त्यातील रंगाचा परिणाम होणार नाही असा रंग मिसळावा, अशी योजना आहे. मासे, मटन अशा वेगवेगळ्या पदार्थांच्या साठवणुकीसाठी अखाद्य बर्फ वापरण्यात येतो. यासाठी फिका निळ्या रंगाचा बर्फ वापरला जाईल.
दुबई मॅथेमॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी खेळाडूंची निवड :
- हडपसर-प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या दुबई मेंटल मॅथेमॅटिक्स चॅम्पियनशिपसाठी पुण्यातून 7 जणांची निवड झाली आहे यापैकी 5 जण हडपसरचे आहेत.
- जगभरातील 28 देशांचे स्पर्धक यामध्ये सहभागी होत असून, भारतातर्फे 72 जणांचा संघ सहभागी होत आहे. येत्या 12 मे रोजी दुबई येथे ही स्पर्धा होणार आहे.
- हडपसरमधील मेघ काशिळकर (14 वर्षे) बिशप्स स्कूल उंड्री, सायुज्यता चेतन तुपे (14 वर्षे) पिअरसन स्कूल अमनोरा, आदित्य पाठक (9 वर्षे) लेक्सिकन स्कूल, निसर्ग घुले (12 वर्षे) पिअरसन स्कूल अमनोरा, रिया बावगे (13 वर्षे) दिल्ली पब्लिक स्कूल या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना हडपसरमधील जिनीअस किड्सचे आनंद महाजन व मोनिता महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
- या 5 जणांसोबत पुण्यातून स्वरित वर्मा (10 वर्षे) ब्लू रिज स्कूल हिंजवडी, राकेश गुप्ता (10 वर्षे) विक्टोरियस किड्स खराडी हे दोन स्पर्धक ही सहभागी होत आहेत.
- तसेच ही स्पर्धा तीन प्रकारात होत असून, दोन प्रकार हे क्लिष्ट गणिती प्रक्रियांवर आधारित आहे. एक प्रकार स्मरणशक्तीशी संबंधित आहे. 500 वर्षांच्या कॅलेंडरवर आधारित ही स्पर्धा असून, भारतापुढे दुबईचे आव्हान आहे.
ब्रिटनचे व्हिसा धोरण शिथिल :
- बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन, अभियांत्रिकी, संगणक विज्ञानाबरोबरच सायबर सिक्युरटी, फायनान्शियल टेक्नॉलॉजीसाठी (फिनटेक) फेलोशीप मिळवून पदव्युत्तर किंवा त्यात संशोधन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचाही इंग्लंडकडे ओढा वाढतो आहे. या अभ्यासक्रमांमधून केवळ दर्जेदार तंत्र आत्मसात करण्याचीच नव्हे तर इंग्लंडमधील नामांकित कंपन्यांमधून काम करण्याचीही संधी विद्यार्थ्यांना मिळते.
- म्हणून आमच्या इतर अभ्यासक्रमांबरोबरच या फेलोशीपनाही सध्या भारतीय विद्यार्थ्यांकडून पसंती मिळत असल्याचे इंग्लंडचे डेप्युटी हेड ऑफ मिशन (पश्चिम भारत) पॉल कार्टर यांनी सांगितले.
- विविध प्रकारच्या सायबर गुन्ह्यंचे आव्हान आणि वित्त संस्थांना आपले ऑनलाईन व्यवहार अधिक सुलभ व सुरक्षित करण्याच्या दृष्टीने लागणाऱ्या तंत्राची गरज पाहता या क्षेत्रातील तज्ज्ञांना मागणी वाढते आहे. मात्र भारतात हे अभ्यासक्रम वा प्रशिक्षणाच्या संधी मर्यादित आहे. शिवाय त्याचा दर्जा पाहता अनेक कंपन्याच आपल्या अधिकाऱ्यांना परदेशात या विषयांमध्ये उच्चशिक्षण घेण्यास प्रोत्साहन देत आहेत.
- परदेशी कंपन्याही यासाठी मुक्तहस्ते फेलोशीप देऊ करतात. हा अभ्यासक्रम करू इच्छिणाऱ्यांची पहिली पसंती सध्याच्या घडीला इंग्लंडला मिळते आहे. इंग्लंडमध्ये पहिल्यापासूनच व्यवसाय आणि प्रशासन (बिझनेस अण्ड अडमिनिस्ट्रेशन), अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, संगणक विज्ञान, सामाजिक शास्त्रे, जैवविज्ञान, विधी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे.
- तसेच या पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रमाबरोबरच सायबर सिक्युरटी, फायनान्शियल टेक्नॉलॉजी (फिनटेक) या विषयांमध्ये संशोधन करू इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या वाढते आहे. अनेक कंपन्या त्यासाठी फेलोशीप देऊ करत आहेत. या विद्यार्थ्यांना त्यानंतर इंग्लंडमध्ये कामाचा अनुभवही घेता येतो. त्यामुळे जास्तीत जास्त भारतीय विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घ्यावा, असे कार्टर यांनी सूचित केले.
रशियाच्या अध्यक्षपदी चौथ्यांदा व्लादिमीर पुतिन :
- रशियाच्या अध्यक्षपदी व्लादिमीर पुतिन (वय 65) यांचा चौथ्यांदा शपथविधी झाला असून त्यांची दोन दशकांची सत्ता आणखी सहा वर्षे राहणार आहे. पाश्चिमात्य देशांशी संबंध तणावाचे बनलेले असताना ते पुन्हा अध्यक्ष झाले आहेत.
- 1999 पासून पुतिन सत्तेवर असून ते जोसेफ स्टालिन यांच्यानंतर सर्वाधिक काळ सत्तेवर असलेले नेते ठरले आहेत. मार्चमधील निवडणुकीत त्यांचा विजय झाला होता. पुतिन यांनी एकूण 77 टक्के मते जिंकली होती, पण या निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर बंदी घातली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेचे पुनरूज्जीवन करण्याचे आश्वासन देऊन ते सत्तेवर आले असून त्यांच्यासमोवर अनेक जटिल आंतरराष्ट्रीय पेच आहेत.
- ‘रशियाच्या वर्तमान व भविष्यासाठी सर्व काही करण्याकरिताच माझे आयुष्य आहे व ते मी माझे कर्तव्य समजतो’ असे पुतिन यांनी सांगितले. शपथविधीच्या वेळी अनेकांनी स्मार्टफोनवर चित्रण केले. ऑर्नेट आंद्रयेव हॉल या क्रेमलिन राजप्रासाद संकुलाच्या भागात शपथविधी झाला. काळ्या रंगाच्या रशियन बनावटीच्या लिमोझीन गाडीतून ते आले, गेल्या वेळी त्यांनी मर्सिडीज वापरली होती. रशियन लोकांनी दिलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानून त्यांनी सांगितले, की माझ्यावरच्या मोठय़ा जबाबदारीची मला जाणीव आहे. रशियाचे सामथ्र्य, भरभराट व कीर्ती अनेक पटींनी वाढवण्यासाठी मी प्रयत्न करीन.
सरकारने काढला मराठी सक्तीचा आदेश :
- मुंबई कार्यालयांत अधिकारी इंग्रजीचा वापर बंद करून प्रशासनात मराठी सक्तीचा आदेश राज्य सरकारने काढला. प्रत्येक कार्यालयात मराठीचा पूर्ण वापर होतो का, हे पाहण्यासाठी मराठी भाषा दक्षता अधिकारी नेमण्याचे आदेशही दिले आहेत.
- योजनांची माहिती सामान्यांना देताना वा त्याची चर्चा करताना तसेच दूरध्वनीवरून बोलताना सर्व अधिकारी वा कर्मचार्यांनी मराठीचाच वापर करणे बंधनकारक असेल.
- वारंवार सूचना देऊनही ज्या सरकारी अधिकारी व कर्मचार्यांकडून मराठीचा वापर करण्याबाबत सुधारणा होत नाही, त्यांना लेखी ताकद देणे, गोपनीय अहवालात तशी नोंद करणे, एक वर्षासाठी बढती वा वेतनवाढ रोखणे, अशी कारवाई केली जाणार आहे. या कारवाईचा शासकीय आदेश आधीपासूनच आहे. आता त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल.
- इंग्रजी शेर्यांना बंदी अधिकारी फायलींवर इंग्रजीतूनच शेरे लिहितात. त्यांना मराठी शेरे द्यावे लागतील. शेर्यांसाठी वापरल्या जाणार्यां इंग्रजी शब्दांचे पर्यायी मराठी शब्दच त्यासाठी दिले आहेत.
- त्याची काही उदाहरणे : अॅज अ स्पेशल केस (खास बाब म्हणून), अॅडमिनिस्ट्रेटिव अप्रुव्हल मे बी ऑब्टेंड (प्रशासकीय मान्यता मिळविण्यात यावी), अप्रुव्हड अॅज प्रपोज्ड (प्रस्तावित केल्याप्रमाणे मान्य).
दिनविशेष :
- सन 1912 मध्ये 8 मे रोजी पॅरामाउंट पिक्चर्स या कंपनीची स्थापना झाली.
- 8 मे 1916 रोजी स्वामी चिन्मयानंद यांचा जन्म झाला.
- पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य पं. विनायकराव पटवर्धन यांनी पुणे येथे 8 मे 1932 रोजी गांधर्व महाविद्यालय सुरू केले.
- 8 मे 1962 रोजी पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे रवींद्र भारती विद्यापिठाची स्थापना झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा