चालू घडामोडी (9 जुलै 2018)
जिमनॅस्टीक विश्वचषकात दिपा कर्माकरला सुवर्णपदक :
- तब्बल दोन वर्ष दुखापतीमुळे मैदानापासून बाहेर राहिलेल्या जिमनॅस्ट दिपा कर्माकरने धडाक्यात सुरुवात केली आहे. तुर्कीच्या मेरसिन शहरात सुरु असलेल्या आर्टिस्टीक जिमनॅस्टीक विश्वचषकात दिपाने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- 24 वर्षीय दिपा कर्माकरचे रिओ ऑलिम्पीकमध्ये अवघ्या काही गुणांच्या फरकाने सुवर्णपदक हुकले होते. त्यानंतर दिपा दुखापतीमुळे काहीकाळ जिमनॅस्ट फिल्डच्या बाहेर होती, मात्र महत्वाच्या स्पर्धेआधी दिपाने जोरदार तयारी करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. दिपाचे विश्वचषकातले हे पहिले विजेतेपद ठरले आहे.
- पात्रता फेरीत दिपा कर्माकरने 11.850 गुणांची कमाई केली होती. यानंतर अंतिम फेरीतही आपला फॉर्म कायम राखत दिपाने भारतीय चाहत्यांना निराश होऊ दिले नाही. आगामी आशियाई खेळांसाठी भारताच्या जिमनॅस्ट चमूमध्येही दिपा कर्माकरची निवड करण्यात आलेली आहे.
शिक्षण विभागाकडून शाळेतून छडी हद्दपार :
- राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने केलेल्या सूचनांनुसार शिक्षण विभागाने शाळेतून छडी गायब करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 जुलै रोजी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शाळेमधून छडी वगळण्याच्या आदेश शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांना दिला आहे.
- शाळेत शिक्षकांनी मारले म्हणून विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करावे लागले किंवा शिक्षेमुळे विद्यार्थ्याला मानसिक धक्का बसला अशा विविध घटना सातत्याने समोर येऊ लागल्या. याची दखल राष्ट्रीय बालहक्क आयोगाने घेतली आणि कोणत्या प्रकारच्या शिक्षांमुळे विद्यार्थ्यांवर कसा परिणाम होतो, यावर सविस्तर चर्चा केली. या चर्चेनंतर वर्गातून छडी हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
- राष्ट्रीय बालहक्क आयोगने केलेल्या सूचनेनुसार तसेच शिक्षण हक्क कायदा, 2009 मधील अनुच्छेद 17 नुसार कोणत्याही मुलाला शारीरिक व मानसिक छळाला सामोरे जावे लागू नये, अशी तरतदू करण्यात आली आहे.
- शारीरिक शिक्षांमुळे निरागस विद्यार्थ्यांच्या मनात भीती, राग, दहशत निर्माण होते. तसेच अनेक प्रकणांमध्ये आत्मविश्वासही कमी होतो. यासर्व परिणामांचा विचार करून शाळांमध्ये शारीरिक शिक्षा दिल्या जाऊ नयेत, अशी सूचना राष्ट्रीय बालहक्क आयोगने केली होती.
औरंगाबाद, नाशिकमध्ये लवकरच अत्याधुनिक नियंत्रण कक्ष :
- नागपूरप्रमाणेच औरंगाबाद आणि नाशिकमध्ये लवकरच कमांडिग नियंत्रण कक्ष उभे केले जातील. नागपूरमधील 6 जुलै रोजी झालेल्या पावसानंतर या नियंत्रण कक्षाचा चांगला उपयोग झाला असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याच धर्तीवर औरंगाबाद आणि नाशिकमध्ये सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- 22.27 लाख रुपये खर्चून औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयाच्या तीन मजली नव्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
- शहर पोलीस आयुक्तालयात नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या सुविधांमुळे पोलिसांना काम करणे अधिक सुकर होईल, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी डिजिटायझेशनमुळे पोलीस यंत्रणेत गतिमानता येत असल्याचा दावा त्यांनी केला.
- काही वर्षांपूर्वी दाखल प्रकरणात शिक्षेचा दर केवळ आठ ते दहा टक्के एवढा होता. तपास यंत्रणांनी स्वीकारलेल्या तंत्रज्ञानातील बदलामुळे हा दर आता 55 टक्क्य़ांपर्यंत गेला आहे. सामान्य नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने तक्रार नोंदवता येते.
- तसेच त्यामुळे तक्रार स्वीकारली नाही किंवा तक्रार आलीच नाही, असे म्हणण्याचा वाव कमी झाला आहे. अत्याधुनिक नियंत्रण कक्षामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती राखण्यास मदत होईल.
जुगार, सट्टेबाजीला मान्यता नको – विधी आयोग :
- जुगार आणि सट्टेबाजी सध्याच्या परिस्थितीत कायदेशीर करणे अयोग्य असल्याचे स्पष्टीकरण न्यायाधीश बी.एस. चौहान यांच्या नेतृत्वाखालील विधी आयोगाने दिले आहे.
- विधी आयोगाने जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करण्याची शिफारस केल्याचे वृत्त आले होते. या पार्श्वभूमीवर हा खुलासा करण्यात आला आहे. आयोगाने म्हटले आहे, की जुगार आणि सट्टेबाजी कायदेशीर करणे सध्याच्या परिस्थितीत अयोग्य असल्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे.
- बेकायदा जुगार आणि सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घालण्याची आवश्यकता आहे. जुगार आणि सट्टेबाजीवर पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी व्यवहार्य पर्याय शोधायला हवा, अशी शिफारस करण्यात आली आहे.
- जुगार आणि सट्टेबाजी यांसारख्या बेकायदा गोष्टींवर पूर्णपणे बंदी घालणे शक्य नसल्यास याबाबत नियमावली आखण्याची गरज आहे.
- संसद अथवा राज्यांच्या विधिमंडळांनी या गोष्टींवर नियंत्रण आणण्याबाबत निर्णय घ्यावा. यावर नियंत्रण आणल्यास केवळ उच्च उत्पन्न गटांतील व्यक्तींना जुगार खेळता येईल, अशी शिफारसही करण्यात आल्याचे विधी आयोगाने नमूद केले आहे.
दिनविशेष :
- शिवणयंत्राचे संशोधक ‘एलियास होव‘ यांचा जन्म 9 जुलै 1819 मध्ये झाला होता.
- सन 1873 मध्ये 9 जुलै रोजी मुंबई शेअर बाजार सुरू झाला.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक रामभाऊ म्हाळगी यांचा जन्म 9 जुलै 1921 मध्ये झाला होता.
- सन 1951 मध्ये भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती 9 जुलै 2011 मध्ये झाली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा