चालू घडामोडी (9 मे 2018)
भारतीयांच्या एच1बी व्हिसा प्रमाणात वाढ :
- अमेरिकेने 2016 मध्ये दिलेल्या व्हिसापैकी भारतातील तंत्रज्ञान व्यावसायिकांना 74.2 टक्के एच 1 बी व्हिसा दिले होते व पुढील वर्षी म्हणजे 2017 मध्ये हे प्रमाण वाढून 76.6 टक्के झाले होते, असे असले तरी भारतातील एच 1 बी व्हिसाच्या प्रत्यक्ष लाभार्थीचे प्रमाण घटले होते असे अमेरिकी नागरिकत्व व स्थलांतर सेवा विभागाच्या अहवालात स्पष्ट केले आहे.
- चीनचे एच 1 बी व्हिसा प्रमाण या दोन वर्षांत अनुक्रमे 9.3 व 9.4 टक्के होते. एच 1 बी व्हिसात भारताखालोखाल चीनचा क्रमांक आहे.
- 2017 मध्ये प्रत्यक्षात नोकरीची संधी मिळालेल्या भारतीय एच 1 बी लाभार्थीचे प्रमाण 4.1 टक्के होते. रोजगार चालू ठेवतानाच 12.5 टक्के भारतीय लोकांना एच 1 बी व्हिसा देण्यात आला होता.
- एच 1 बी हा अस्थलांतरित प्रकारचा व्हिसा असून त्यामुळे अमेरिकी कंपन्या परदेशी कामगारांना विशेष कौशल्याच्या कामासाठी रोजगार देऊ शकतात.
नवाबकालीन शाळेच्या जागी नगरपंचायत कार्यालय :
- म्हसळा येथील रायगड जिल्हा परिषदेची शाळा क्रमांक 1 ची इमारत नवाबकालीन आहे. शंभर वर्षे जुनी असलेली ही इमारत पाडून याठिकाणी नगरपंचायतीचे कार्यालय उभारण्यात येणार असल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. त्यामुळे शाळेतील मुलांच्या भवितव्यावर आघात होण्याची शक्यता आहे.
- म्हसळा शहरातील नवाबकालीन शाळेला जमीनदोस्त करून म्हसळा नगरपंचायतीचे कार्यालय बांधण्यासाठीचा ठराव नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. म्हसळा शहरात अनेक ऐतिहासिक इमारती आहेत. त्यापैकी एक जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची शाळा आहे.
- शहरातील व तालुक्यातील नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी तत्कालीन नवाबाने अनेक शासकीय इमारती बांधल्या होत्या. यात महाल आॅफिस (सध्याचे तहसील कार्यालय, पोलीस ठाणे), सरकारी दवाखाना व धर्मशाळा (सध्याचे नवीन ग्रामीण रुग्णालय) यांच्यासह मराठी मुलांची शाळा (सध्याची रा.जि.प. शाळा म्हसळा नं. 1) ही इमारत देखील नवाबाने शंभर वर्षापूर्वी शहरातील व आजूबाजूच्या खेड्यातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी बांधली होती.
- रा.जि.प. शाळा म्हसळा नं. 1 च्या जागी नगरपंचायतीची नवीन इमारत बांधण्यासंदर्भात सर्वसाधारण सभेमध्ये ठराव झाला आहे. परंतु जोपर्यंत या शाळेतील विद्यार्थ्यांची पर्यायी व्यवस्था केली जात नाही, तोपर्यंत शाळेच्या जागेत कोणतेही काम केले जाणार नाही.
आता पाळीव प्राण्यांचेही होणार एमआरआय :
- मुंबईतील पाळीव प्राण्यांना येत्या सात ते आठ महिन्यांत अत्याधुनिक उपचार मिळणार आहेत. गंभीर आजार असलेल्या प्राण्यांच्या एमआरआय, सोनोग्राफी आणि सिटी स्कॅनसारख्या चाचण्या करण्यासाठी यापुढे त्यांना मुंबईबाहेर नेण्याची गरज भासणार नाही. महालक्ष्मीतील महापालिकेच्या प्रस्तावित प्राण्यांच्या रुग्णालयातच सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत.
- मुंबई महापालिकेचा प्राण्यांसाठी स्वतंत्र विभाग नव्हता. पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत पाळीव श्वानांचे परवाने आणि भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जात होते; मात्र आता स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला असून त्याची जबाबदारी देवनार पशुवधगृहाचे महाव्यस्थापक डॉ. योगेश शेट्टे यांच्याकडे देण्यात आली आहे. पहिल्याच टप्प्यात पालिकेने प्राण्यांसाठी रुग्णालय बांधण्याबरोबरच उपनगरात त्यांच्याकरिता दवाखाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- प्राण्यांचे रुग्णालय महालक्ष्मीमध्ये बांधण्यात येणार आहे. त्यासाठी विविध संस्थांकडून निविदा मागवण्यात आल्या आहेत. त्याला काही संस्थांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांची पडताळणी करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असे डॉ. योगेश शेट्टे यांनी सांगितले.
- महालक्ष्मीतील रुग्णालयात सर्व अत्याधुनिक सुविधा असतील. त्याचबरोबर सिटी स्कॅन, एमआरआय आणि अल्ट्रा सोनोग्राफीसारख्या अत्याधुनिक चाचण्याही केल्या जातील. भटक्या प्राण्यांसाठी सुविधा मोफत ठेवण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईत अशा प्रकारचे हे पहिलेच रुग्णालय असेल, असेही त्यांनी नमूद केले.
उत्तर भारतात हाय अलर्ट जारी :
- उत्तर भारतात वादळाचे संकट धडकले आहे. राजस्थान, पंजाब, हरयाणासह दिल्ली-एनसीआर भागाला वादळाचा तडाखा बसला आहे.
- पालम, द्वारका, गुरुग्राम या भागात वेगवान वारे वाहू लागले आहेत. अनेक भागांत वीजपुरवठा खंडित झाला आहे. पुढील 3 ते 4 तास दिल्ली आणि एनसीआर भागात ताशी 50 ते 70 कि.मी. वेगान वारे वाहतील तसेच काही भागांत पाऊसही पडेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दरम्यान, वादळाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर भारतात अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
- धुळीच्या वादळाचा धोका असल्याने दिल्लीत 8 मे रोजी सायंकाळी भरणाऱ्या सर्व शाळा बंद ठेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासह उत्तर भारतातील अनेक राज्यांत सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. उत्तर प्रदेशातही काही जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
माइक पोम्पिओ अमेरिकेचे नवे परराष्ट्रमंत्री :
- अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सीआयएचे माजी संचालक माइक पोम्पिओ यांची नवे परराष्ट्रमंत्री म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी पदाची शपथ घेतली.
- रेक्स टिलरसन यांच्याशी मतभेद झाल्याने ट्रम्प यांनी मार्चमध्ये त्यांना पदावरून दूर केले होते. 54 वर्षीय पोम्पिओ अमेरिकेचे 70वे परराष्ट्रमंत्री ठरले आहेत.
फेसबुकवर नरेंद्र मोदी जगात सर्वाधिक लोकप्रिय :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेसबुकवरील सर्वांत लोकप्रिय नेते ठरले असून, त्यांनी हा मान लागोपाठ दुसऱ्यांदा मिळविला आहे. फेसबुकवरील लोकप्रियतेत त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही मागे टाकले आहे.
- ‘बर्सन कोहन अँड वुल्फ’ने ‘फेसबुकवरील जागतिक नेते’ यावर पाहणी केली असून, ती प्रसिद्ध करण्यात आली. मोदी यांना फेसबुकवर चार कोटी 32 लाख यूजर्स फॉलो करीत असून, ट्रम्प हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ट्रम्प यांना फेसबुकवर दोन कोटी 31 लाख यूजर्स फॉलो करीत आहेत.
- विविध देशांचे प्रमुख, परराष्ट्रमंत्री यांच्या फेसबुकवरील 650 पानांचा अभ्यास या संस्थेने केला असून, त्यात एक जानेवारी 2017 पासूनचा डेटा वापरण्यात आला आहे.
दिनविशेष :
- ‘मेवाड’चे सम्राट महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी झाला.
- थोर समाजसेवक गोपाल कृष्ण गोखले यांचा कातळूक, रत्नागिरी येथे 9 मे 1866 रोजी जन्म झाला.
- 9 मे 1874 रोजी मुंबईत घोड्यांनी ओढल्या जाणार्या ट्राम सुरू झाल्या.
- पश्चिम जर्मनी देशाचा 9 मे 1955 रोजी नाटो (NATO) मध्ये प्रवेश झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा