जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : लॉकडाऊन मुळे सरकारला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गर्दी कशी टाळता येईल यासाठी वेगवेगळे उपाय सरकारमार्फत करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लोकांची गर्दी उसळत आहे आणि त्यासाठीच होणारी हि गर्दी टाळण्यासाठी सरकारने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, किराणा दुकाने, मेडिकल ई. यापुढे 24 तास खुली ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे. आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांमार्फत कोरोना उपाययोजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेण्यात आली आणि यामध्ये हा निर्णय घेण्यात आला.
सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी होत आहे आणि यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. भाजीपाला, किराणा ई. वस्तूंची खरेदीसाठीच गर्दी होत असून या व्यतिरिक्त सर्व गोष्टी सुरळीत सुरु आहे.
या बैठकीमध्ये या व्यतिरिक्त, संबंधित दुकानदारांनी ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असून दोन ग्राहकांमधील अंतर, निर्जंतुकीकरण, स्वच्छता याबाबत शासनाने प्रसारित केलेल्या अटींचे तंतोतंत पालन व्हावे असेही निर्देशित करण्यात आले आहे.