10 October 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (10 ऑक्टोबर 2018)
युवा नेमबाज मनू भाकेरला सुवर्णपदक:
- अर्जेंटीनातील ब्युनास आयर्स येथे सुरु असलेल्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची युवा नेमबाजपटू मनू भाकेरने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. या स्पर्धेतले नेमबाजी प्रकारातले भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले आहे.
- 10 मीटर एअर पिस्तुल प्रकारात 16 वर्षीय मनूने 236.5 गुणांची कमाई करत आपले पहिले स्थान कायम राखले.
आशियाई खेळांमध्ये मनू भाकेरची कामगिरी निराशाजनक झाली होती, यानंतर मनूने जोरदार कमबॅक करत युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. - तसेच या स्पर्धेत रशियाच्या इयाना एनिनाने रौप्यपदक तर जॉर्जियाच्या निनो खुत्सिबेरित्झने कांस्यपदक मिळवले.
अजित डोवाल यांची स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपच्या अध्यक्षपदी वर्णी:
- अजित डोवाल लवकरच देशातले सर्वशक्तिमान नोकरशहा बनणार आहेत. राष्ट्रीय सुरक्षा परिषद (नॅशनल सिक्युरीटी कौन्सिल)च्या सहकार्यासाठी तसेच सुरक्षेची रणनीती ठरवण्यासाठी स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुपचे पुनरुज्जीवन करण्याचे मोदी सरकारने ठरवले आहे. या ग्रुपचे अध्यक्षस्थान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल भूषवणार आहेत. या ग्रुपचे अध्यक्षस्थान यापूर्वी सरकारमधले सर्वात ज्येष्ठ नोकरशहा कॅबिनेट सचिवांकडे असे.
- या ग्रुपमधे डोवाल यांच्याखेरीज सदस्यांमध्ये निती आयोगाचे उपाध्यक्ष, कॅबिनेट सचिव, तिन्ही सैन्यदलाचे प्रमुख, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, परराष्ट्र सचिव, गृह सचिव, अर्थ सचिव व संरक्षण सचिव तथा संरक्षण उत्पादन व पुरवठा विभाग, संरक्षणमंत्र्याचे वैज्ञानिक सल्लागार, कॅबिनेट सचिवालयाचे सचिव, महसूल, अणुउर्जा, अंतराळ विभाग व इंटेलिजन्स ब्युरोचे उच्चपदस्थ अधिकारी आदींचा समावेश असेल.
- आवश्यकता भासल्यास गरजेनुसार अन्य मंत्रालय व विभागप्रमुखांनाही ग्रुपच्या बैठकीत निमंत्रित केले जाईल. ग्रुपची बैठक अजित डोवाल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. ग्रुपने घेतलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी केंद्र सरकारची सर्व मंत्रालये तसेच राज्य सरकारांच्या कॅबिनेट सचिवांमधे समन्वय प्रस्थापित केला जाईल.
- केंद्रातील ज्येष्ठ अधिकाऱ्यानुसार, कारगील युध्दाच्या दरम्यान ज्या त्रुटी आढळल्या, त्याची चौकशी करण्यासाठी संसदीय समितीच्या शिफारशीनुसार स्ट्रॅटेजिक पॉलिसी ग्रुप अस्तित्वात आला होता.
- युपीए सरकारच्या काळातही हा ग्रुप अस्तित्वात होता. सार्वत्रिक निवडणूक येऊ घातली असताना या ग्रुपचे अचानक पुनरूज्जीवन करण्यात आल्याने काही प्रश्न निर्माण झाली आहेत.
महाराष्ट्राचा सुनीत जाधव ‘आशिया-श्री’चा मानकरी:
- पुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या 52व्या आशियाई शरीरसौष्ठव क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुनीत जाधवने ‘आशिया-श्री’ किताबावर नाव कोरले.
- भारताच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत पाच सुवर्ण, सहा रौप्य व चार कांस्यपदकांना गवसणी घातली. स्पर्धेच्या इतिहासातील भारताची ही आजपर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.
- पुरुषांच्या 90 किलो वजनी गटात सुनीतने सुवर्णपदक मिळवले असले तरी त्याला लवकरच ‘जागतिक-श्री’ म्हणूनही नावारूपास यायचे आहे. सुनीतची पत्नी स्वप्नालीने पतीला पाठिंबा देण्यासाठी स्वत:ची नोकरी सोडून त्याच्या आहारावर तसेच तंदुरुस्तीवर लक्ष दिले.
- भारताला दुसरे सुवर्ण नितीन म्हात्रेने पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात मिळवून दिले. चार वेळचा ‘भारत-श्री’ व एकदा ‘जागतिक-श्री’ विजेतेपदावर नाव कोरणाऱ्या नितीनने 14 वर्षांच्या मेहनतीनंतर आशियातील विजेतेपदाला गवसणी घातली. भास्करन (60 किलो), बॉबी सिंग (80 किलो), यतिंदर सिंग (85 किलो) यांनीदेखील सुवर्णपदकाची कमाई केली.
राज्यातील गावांना दुष्काळाची झळ:
- दीड महिन्यांपासून हरवलेला पाऊस, उन्हाच्या वाढत जाणाऱ्या झळा आणि पाण्याची टंचाई यामुळे मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील 201 तालुक्यातील सुमारे 20 हजार गावात भीषण परिस्थिती असून तेथे पुढील आठवडय़ात दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर करून सरकारी सवलती सुरू केल्या जाणार आहेत.
- यासाठी सर्व मंत्री आणि राज्यमंत्र्यांनी आपापल्या भागातील तालुक्यांची पाहणी करून दुष्काळी परिस्थितीचा अहवाल मंत्रिमंडळ उपसमितीस द्यावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.
- दुष्काळी परिस्थितीत मदतीबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मदत आणि पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीला देण्याचा निर्णयही मंत्रीरिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
- राज्यात 201 तालुक्यात सरासरीच्या 75 टक्के पेक्षा कमी पाऊस झाला असून या भागातील पिकेही धोक्यात आली आहेत. मराठवाडय़ातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर या जिल्ह्यांत परिस्थिती गंभीर असून राज्याच्या अन्य भागातही काही तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे.
बिगर सरकारी पीएफवरील व्याजदरात वाढ:
- केंद्र सरकारने बिगर सरकारी भविष्य निर्वाह निधीवरील (पीएफ) व्याजदरात 0.40 टक्के वाढ केली आहे. यावर आता 7.60 ऐवजी किमान 8 टक्के व्याज मिळेल. ही वाढ ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी असेल. याचा लाभ सेवानिवृत्ती व ग्रॅच्युईटीच्या रकमेलाही लाभ मिळणार आहे.
- ज्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या पीएफ रकमेचे स्वत: व्यवस्थापन करतात त्यांचा बिगर सरकारी पीएफ योजनेत समावेश असतो. सरकारच्या विशेष ठेव योजनेंतर्गत हे लाभ कंपन्या कर्मचा-यांना देतात.
- केंद्राने दोन आठवड्यांपूर्वीच अल्प बचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली होती. त्यानंतर हा निर्णय घेतला आहे. नागरिकांना बचतीसाठी प्रोत्साहित करण्याचा सरकारचा मानस यातून दिसून येतो.
- तसेच चालू खात्यातील तूट दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी या योजनेत अधिकाधिक पैसा गुंतवल्यास ही तूट कमी करण्यास मदत होईल, या आशेने केंद्राने ही व्याजदरवाढ केली आहे.
डॉ. रिचा मेहता ठरल्या ‘मिसेस इंडिया यूनिव्हर्स 2018’:
- उपराजधानीतील दंतरोग तज्ज्ञ डॉ. रिचा मेहता (झरारिया) यांनी 7 ऑक्टोबर 2018 रोजी जयपूरला झालेल्या मिसेस इंडिया युनिव्हर्स-2018 या स्पर्धेत विजेतेपद पटकावले असल्याची माहिती डॉ. रिचाचे पती व मेडिकलच्या स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाचे स हयोगी प्राध्यापक डॉ. आशीष झरारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
- कंठा प्रॉडक्शनच्या वतीने जयपूरच्या अथर्व पॅलेस येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेसाठी नागपूर, लखनऊ, जयपूर, लुधीयाना, बेंगळूरू, दिल्ली येथे निवड प्रक्रिया झाली. त्यात प्रत्येक स्पर्धकाला ओळख, ज्ञान, प्रश्नोत्तर या प्रक्रियेतून जावे लागले.
- प्रश्नोत्तरमध्ये पाच प्रश्नांचे अचूक उत्तर दिल्याने डॉ. रिचा हिची दुसऱ्या फेरीसाठी निवड झाली. दुसऱ्या फेरीत देशभरातून 20 स्पर्धक निवडले गेले. त्यात वेगवेगळ्या राज्यातील चित्रपट आणि मालिका क्षेत्राशी संबंधित नागरिकांची संख्या मोठी होती.
- दिल्लीच्या अंतिम फेरीत डॉ. रिचा ही पहिली तर त्यानंतरचे पुरस्कार बेंगळुरूच्या जेननी राजन आणि मुंबईच्या अपूर्वा हीने पटकावले.
दिनविशेष:
- 10 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन‘ तसेच ‘जागतिक लापशी दिन‘ आहे.
- सन 1846 मध्ये इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ विल्यम लॅसेल यांनी नेपच्यून ग्रहाचा सर्वात मोठा चंद्र ट्रायटन चा शोध लावला.
- भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1899 मध्ये झाला.
- श्यामची आई चित्रपटाला 1954 या साली राष्ट्रपतींचे सुवर्णपदक मिळाले.
- सन 1998 मध्ये ‘आदर्श सेन आनंद‘ भारताचे 29वे सरन्यायाधीश बनले होते.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा