13 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (13 नोव्हेंबर 2018)
केंद्र सरकारने दिली राफेल किमतीची माहिती:
- फ्रान्सच्या दस्सॉल्ट कंपनीकडून घ्यायच्या 36 राफेल लढाऊ विमानांच्या किंमतीची माहिती देण्यास कुरकुर करणाऱ्या केंद्र सरकारने फक्त न्यायाधीशांना पाहण्यासाठी का होईना, पण ती सीलबंद लखोट्यात सर्वोच्च न्यायालयात सादर केली.
- या विमानखरेदीच्या निर्णय प्रक्रियेसह किंमतीची माहितीही द्यावी, असा आदेश न्यायालयाने 31 ऑक्टोबर रोजी दिला, तेव्हा अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाळ यांनी किंमतीची माहिती गोपनीय असल्याने ती उघड करण्यास विरोध केला होता. परंतु सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी आदेशात बदल न करता त्यांना सांगितले की, तर तसे प्रतिज्ञापत्र करा. आम्ही त्याचा विचार करू. त्यानंतर न्यायालयाचा रोष टाळण्यासाठी केंद्राने ती सादर केली.
- राफेल विमाने खरेदीच्या निर्णय प्रक्रियेसंबंधी न्यायालयाने सांगितले होते की, त्यातील जो भाग उघड करणे योग्य आहे असे वाटते तेवढा सरकारने सादर करावा व त्याची एक प्रत याचिकाकर्त्यांनाही द्यावी. यानुसार या माहितीचा दुसरा लखोटाही न्यायालयात सादर करून ती माहिती याचिकाकर्त्यांना दिली. राफेल खरेदीसंबंधी एकूण तीन याचिका न्यायालयापुढे असून त्यावर पुढील सुनावणी बुधवारी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.
14 नोव्हेंबरपासून सुरु होणार रामायण एक्स्प्रेस:
- सध्या देशात राम मंदिर, रामाचा पुतळा, प्रभू रामचंद्र हे सगळेच विषय सुरु आहेत. मंदिर कधी बांधले जाणार? हा प्रश्नही विचारला जातो आहे. अशात भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे.
- रामायण एक्स्प्रेस प्रभू रामचंद्राशी संबंधित सगळ्या स्थळांची यात्रा करणार आहे. यामध्ये श्रीलंकेतील काही ठिकाणांचाही समावेश असणार आहे. तसेच ही एकूण 16 दिवसांची सहल असणार आहे असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे.
- तर 16 दिवसांची ही पॅकेज टूर असणार आहे. एक टूर जाऊन आली की मग दुसरी जाणार आहे. दिल्लीहून या एक्स्प्रेसला हिरवा कंदिल दाखवला जाईल.
- एकीकडे देशात प्रभू रामचंद्रांचे मंदिर उभारले जाणार, पुतळा उभारला जाणार असे म्हटले जाते आहे. योगी आदित्यनाथ यांनीही शरयू नदीच्या किनारी रामाच्या पुतळ्याची घोषणा केली आहे. तर राम मंदिरासाठी अध्यादेश काढला जावा असे म्हटले जाते आहे. अशात आता भारतीय रेल्वेने रामायण एक्स्प्रेसची घोषणा केली आहे.
स्पायडरमॅन, आयर्नमॅनचा निर्माता ‘स्टेन ली’ कालवश:
- जगप्रसिद्ध मार्वल कॉमिक्सचे जनक स्टेन ली यांचे 12 नोव्हेंबर रोजी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
- स्पायडरमॅन, आयर्नमॅन, ब्लॅक पँथर, हल्क यांच्यासारख्या सुपरहिरोंच्या पात्रांची निर्मिती करणाऱ्या स्टेन ली यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अमेरिकेतील कॉमिक बुक संस्कृतीचा चेहरा अशी ली यांची ओळख होती.
- स्टेन ली यांच्या मृत्यूची माहिती त्यांच्या मुलीने दिली. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. ली यांचा जन्म 28 डिसेंबर 1922 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता.
- सन 1961 मध्ये त्यांनी द फॅन्टास्टिक फोरसोबत मार्वल कॉमिक्स सुरु केले. त्यानंतर यामध्ये स्पायडरमॅन, एक्स मॅन, हल्क, आयर्न मॅन, ब्लॅक पँथर आणि कॅप्टन अमेरिका यांसारख्या सुरपहिरोंच्या पात्रांचा समावेश झाला. स्टेन ली काही हॉलीवूड चित्रपटांमध्येदेखील दिसले होते.
दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे विद्यापीठाला पूर्णवेळ कुलसचिव:
- सावित्रीबाई फुले पुणेविद्यापीठाला अखेर दीड वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुर्णवेळ कुलसचिव मिळाले आहेत. प्रभारी कुलसचिव आणि वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रफुल्ल पवार यांचीच कुलसचिवपदी निवड करण्यात आली आहे. तसेच वित्त व लेखा अधिकारीपदी सनदी लेखापाल अतुल पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
- विद्यापीठाचे कुलसचिव पद दीड वर्षांपासून रिक्त होते. तत्कालीन कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर काही महिने विद्यापीठातील इलेक्ट्रॉनिक विभागाचे प्रमुख डॉ. अरविंद शाळीग्राम यांच्याकडे कुलसचिव पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला होता.
- तर काही दिवसांपुर्वीच डॉ. प्रफुल्ल पवार यांच्याकडे पदभार देण्यात आला होता. त्यामुळे सुमारे दीड वर्ष विद्यापीठ पुर्णवेळ कुलसचिवांविना होते. या पदासाठी नुकत्याच 16 उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. अखेर निवड समितीने 12 नोव्हेंबर रोजी या पदासाठी पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
‘पुण्याचे नाव बदलून जिजापूर करा’ अशी मागणी:
- राज्य सरकारचा औरंगाबाद जिल्ह्याचे नाव संभाजीनगर व उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशीव करण्याचा प्रस्ताव आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. यावर पुणे शहर हे राष्ट्रमाता जिजाऊ मॉंसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे ओळखले जाते. त्यामुळे पुण्याचे नाव बदलून जिजापूर करण्यात यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे करण्यात आली.
- तर यासाठी संभाजी ब्रिगेडने राज्य सरकारला पत्र लिहिले आहे. पुण्याला जिजाऊंनी ओळख दिली. त्यामुळे शहराला त्यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेडने घेतली आहे.
- पुणे शहराला जिजाऊंचा वसा व वारसा आहे. हे शहर राष्ट्रमाता जिजाऊंनी सोन्याचा नांगर चालवून वसवले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व खजिना खाली करून आपल्या ‘शेतकऱ्यांना कर्ज मुक्त केले’ त्यामुळे पुण्याचे नाव ‘जिजापुर’ केलेच पाहिजे. असाही उल्लेख संभाजी ब्रिगेडने दिलेल्या पत्रात केला आहे.
- भाजप शिवरायांच्या आशीर्वादाने सत्तेत आले आहे. त्यामुळे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्रींचे नाव पुणे शहराला द्यावं, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
दिनविशेष:
- 13 नोव्हेंबर हा दिवस ‘जागतिक दयाळूपणा दिन‘ म्हणून पाळला जातो.
- शिख साम्राज्याचे संस्थापक महाराजा रणजितसिंग यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1780 मध्ये झाला होता.
- रवीन्द्रनाथ टागोर यांना स्वीडिश अॅकॅडमीने गीतांजली या साहित्यासाठी सन 1913 मध्ये नोबेल पारितोषिक जाहीर केले.
- महाराष्ट्राचे 5 वे व 9 वे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा जन्म 13 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला होता.
- वामनराव पटवर्धनांनी पुढाकार घेऊन सन 1921 मध्ये पुण्यास अखिल भोर संस्थान प्रजा सभा स्थापन केली.
- सन 1931 मध्ये शंकर रामचंद्र तथा मामाराव दाते यांनी मोनोटाईप मशीनवर देवनागरी लिपीची यांत्रिक जुळणी यशस्वी केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
View Comments
18 Nov 2018 Che update dya .....regular date chya update det ja time wadhava .... 10am
आम्ही दररोज अपडेट्स देत असतो. तुम्ही कदाचित व्यवस्थित बघितले नाही. https://www.mpscworld.com/category/current-affairs/ वरील लिंकवर क्लिक करून सर्व लेटेस्ट चालू घडामोडी वाचू शकता. धन्यवाद..