17 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

17 January 2019 Current Affairs In Marathi

17 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)

चालू घडामोडी (17 जानेवारी 2019)

जिओ ठरली देशातील सर्वात जास्त 4जी स्पीड देणारी कंपनी:

  • टेलिकॉम सेक्टरमध्ये आल्यापासून डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल ठरत आहे. पण, डिसेंबर महिन्यात जिओचा सरासरी 4जी डाउनलोड स्पीड 8 टक्क्यांनी घटला. तरीही गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठला.Jio
  • 2018 मध्ये जिओ देशातील सर्वात जास्त 4 जी डाउनलोड स्पीड देणारी कंपनी ठरली आहे. तर अपलोड स्पीडच्या बाबतीत आयडिया कंपनी (5.6 एमबीपीएस) पहिल्या क्रमांकांवर आहे.
  • नोव्हेंबर महिन्यात जिओचा डाउनलोड स्पीड 20.3 एमबीपीएस होता, तो डिसेंबर महिन्यात 18.7 एमबीपीएसवर आला. पण तरीही इतर कंपन्यांच्या तुलनेत ते अव्वल ठरले. दूरसंचार नियामक भारतीय दूरसंचार विनियामक प्राधिकरण (ट्राय)ने याबाबत आकडेवारी जारी केली आहे.
  • ट्रायच्या माय स्पीड पोर्टलवर जारी केलेल्या डेटात ही माहिती देण्यात आली आहे. जिओनंतर भारती एअरटेलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्या खालोखाल व्होडाफोन (6.3 एमबीपीएस) आणि आयडिया (6 एमबीपीएस) चा क्रमांक आहे. वोडाफोन आणि आयडिया या दोन कंपन्यांनी वेगवेगळा डेटा जारी केला आहे.

नवा CBI संचालक निवडण्यासाठी 24 जानेवारीला बैठक:

  • नव्या सीबीआय संचालकांची निवड करण्यासाठी उच्चस्तरीय निवड समितीची 24 जानेवारीला बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नवा सीबीआय संचालक निवडणार आहे.
  • भारताचे मुख्य न्यायमूर्ती आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गेंचा या निवड समितीमध्ये समावेश आहे.
  • सरकारने 21 जानेवारीला बैठकीचा प्रस्तावर दिला होता. पण मल्लिकार्जून खर्गे यांना 24 किंवा 25 जानेवारीला बैठक हवी होती असे सूत्रांनी सांगितले.
  • अखेर परस्परसहमतीने नव्या संचालकांची निवड करण्यासाठी 24 जानेवारीची तारीख ठरवण्यात आली. निवड समितीने आलोक वर्मा यांना हटवल्यापासून सीबीआय संचालकाचे पद रिक्त आहे.
  • आयपीएस अधिकारी नागेश्वर राव सध्या हंगामी सीबीआय संचालक म्हणून कामकाज संभाळत आहेत. सीबीआय संचालकपद रिक्त ठेवल्याबद्दल काँग्रेसकडून मोदी सरकारवर टीका सुरु होती.

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार:

  • जर तुम्ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप वापरत असाल आणि त्यात जर विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, विंडोज 7 चे कम्प्युटर आणि लॅपटॉप कायमचे बंद होणार आहेत.
  • प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज 7 (Windows 7) चा मेनस्ट्रीम सपोर्ट बंद करणार असल्याची घोषणा मायक्रोसॉफ्टकडून करण्यात आली आहे. windows-7
  • पुढील वर्षी 14 जानेवारी 2020 पासून विंडोज 7 चा सपोर्ट बंद करण्यात येणार आहे. म्हणजे याचे अपडेट्स मिळणार नाहीत. या अपडेट्समध्ये सिक्युरिटी फिक्स आणि पॅचेस यांचाही समावेश आहे.
  • या दोन्हीमुळे कम्प्युटरची सुरक्षा होत असते. जर ही सुविधा सुरू ठेवायची असेल तर त्यासाठी पैसे मोजावे लागतील. मायक्रोसॉफ्टने गेल्यावर्षीच्या जून महिन्यातच विंडोज 7 चा अधिकृत फोरम सपोर्ट बंद केला होता.
  • 7 जुलै 2009 रोजी मायक्रोसॉफ्टने Windows 7 सादर केले होते. विंडोज 7 नंतर Windows 8, Windows 8.1 आलं, आणि त्यानंतर जुलै 2015 मध्ये कंपनीने Windows 10 आणले. सध्या विंडोज 10 वापरणाऱ्यांची संख्या 70 कोटींहून अधिक आहे.
  • आता कंपनी Windows 7 Extended Security Updates विकणार आहे यासाठी पैसे मोजावे लागतील. कारण इंटरप्राइजेस युजर्स अनेक वर्षांपासून विंडोज 7 चा वापर करत आहेत, त्यामुळे याचा वापर एकदम बंद करणे त्यांच्यासाठी कठीण आहे.
  • पण, सामान्य ग्राहकांना हे अपडेट मिळणार नाहीत हे देखील कंपनीने स्पष्ट केलंय. यापूर्वी मायक्रोसॉफ्टने Windows XP आणि Vista चाही सपोर्ट बंद केला आहे.

भारत अमेरिकेकडून घेणार संरक्षण सामग्री:

  • भारताने अमेरिकेबरोबर व्यापारी संबंध बळकट करण्यावर भर दिला आहे. भारत दरवर्षी अमेरिकेकडून पाच अब्ज डॉलर्सचे तेल, गॅस विकत घेण्यासाठी कटिबद्ध आहे तसेच 18 अब्ज डॉलर्सची संरक्षण सामग्रीही विकत घेणार आहे. अमेरिकेतील भारताच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
  • अमेरिकेकडून भारतात होणाऱ्या निर्यातीत 30 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे असे अमेरिकेतील भारताचे राजदूत हर्षवर्धन श्रृंगला यांनी अमेरिकेतील उद्योजकांसमोर बोलताना सांगितले. मागच्या दोन वर्षात भारत-अमेरिका व्दिपक्षीय व्यापारामध्ये 119 अब्ज डॉलर्सवरुन 140 अब्ज डॉलरपर्यंत वाढ झाल्याची माहिती त्यांनी दिली.
  • हर्षवर्धन श्रृंगला यांच्या सम्मानार्थ भारत-अमेरिका व्यावसायिक परिषदेने खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. आधीपेक्षा आता भारत मोठया प्रमाणात अमेरिकेकडून खरेदी करत आहे असे त्यांनी सांगितले.

राज्यातील तब्बल 22 हजार धर्मादाय संस्थांना नोटिसा:

  • मराठवाड्यातील आठ; नाशिक, नगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांतील 22 हजार धर्मादाय संस्थांनी 2017-18 या आर्थिक वर्षात विवरणपत्र दाखल न केल्यामुळे प्राप्तिकर विभागातर्फे नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत.
  • करपात्र असतानाही या संस्थांनी विवरणपत्र दाखल न केल्याने ही करवाई सुरू करण्यात आल्याची माहिती औरंगाबाद विभागाचे अतिरिक्‍त प्राप्तिकर आयुक्‍त संदीपकुमार साळुंके व उपायुक्‍त स्वप्नील सावंत यांनी दिली.
  • विश्‍वस्त, धर्मादाय, धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक संस्था (ट्रस्ट) यांना विवरणपत्र भरणे आवश्‍यक असतानाही अनेकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने मंगळवारी बैठक घेतली. यामध्ये साळुंके यांनी ही माहिती दिली.
  • साळुंके म्हणाले, की विवरणपत्र न भरणाऱ्या या संस्थांची यादी विभागाने केली आहे. काही संस्था सक्रिय नसतील असे गृहीत धरले तरी हजारो विश्‍वस्त संस्था, विवरणपत्रे भरत नाहीत, हे निदर्शनास आल्याने या संदर्भात धर्मादाय आयुक्‍त औरंगाबाद, नाशिक व लातूर यांच्याशी पत्रव्यवहार करीत यादी मागवली.

दिनविशेष:

  • सन 1773 मध्ये ‘कॅप्टन जेम्स कुक’ यांनी अंटार्क्टिक वृत्त पार केले.
  • रॉबर्ट फाल्कन स्कॉट हे सन 1912 मध्ये दक्षिण ध्रुवावर पोहचले होते.
  • भारतीय समाजसेविका शकुंतला परांजपे यांचा जन्म 17 जानेवारी 1906 मध्ये झाला होता.
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची (United Nations Security Council) पहिली बैठक सन 1946 मध्ये झाली.
  • सन 1956 मध्ये बेळगाव-कारवर आणि बिदर जिल्ह्यातील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्यासाठी घोषणा झाली होती.

चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like
Leave A Reply

Your email address will not be published.