17 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (17 सप्टेंबर 2018)
पोलंडमधील स्पर्धेत भारतीय बॉक्सर मेरी कोमला सुवर्णपदक:
- भारताची आघाडीची महिला बॉक्सर मेरी कोमने, पोलंड येथील ग्लिविसेत सुरु असलेल्या सिलेसियान बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. 48 किलो वजनी गटात मेरी कोमने कझाकिस्तानच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 ने पराभव करत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
- राष्ट्रकुल स्पर्धेनंतर झालेल्या दुखापतीमुळे मेरी कोमने आशियाई स्पर्धांमधून माघार घेतली होती. मात्र यानंतर पोलंडमधील स्पर्धेमधून पुनरागमन करत मेरी कोमने सर्वांना आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे. भारताच्या मनिषानेही 54 किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली आहे.
- संपूर्ण सामन्यात मेरी कोमच्या खेळापुढे तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूचा निभावच लागू शकला नाही. मेरीने उजव्या हाताने केलेले प्रहार तिच्या प्रतिस्पर्धी खेळाडूच्या चांगलेच वर्मावर बसले. याचसोबत ज्यावेळी कझाकिस्तानच्या खेळाडूने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी मेरीने तिचे प्रयत्न हाणून पाडले.
- मात्र दुसऱ्या सामन्यात युक्रेनच्या इव्हाना क्रुपेनियाने भारताच्या मनिषावर 3-2 ने मात केली. अटीतटीच्या झालेल्या सामन्या इव्हानाच्या आक्रमक खेळापुढे मनिषाचा निभाव लागू शकला नाही. यामुळे भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
ISRO कडून दोन विदेशी उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण:
- भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) 16 सप्टेंबर रोजी पीएसएलव्ही सी 42च्या सहाय्याने दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन झेपावले.
- श्रीहरिकोट्टा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री 10 वाजून 8 मिनिटांनी अंतराळात झेपावले. हे पूर्णत: व्यावसायिक प्रक्षेपण असल्याचे इस्त्रोचे प्रमुख के. शिवन यांनी सांगितले. या उपग्रह प्रक्षेपणासोबत एकही भारतीय उपग्रह नव्हता.
- या उपग्रहांचे एकत्रित वजन 889 कि.ग्रॅम आहे. या उपग्रहामुळे पृथ्वीवर होणारे पर्यावरणीय बदल, नैसर्गिक आपत्तीबाबतही माहिती घेणे शक्य होणार आहे.
- वनांचे मॅपिंग, पूर आणि नैसर्गिक आपत्तींवर लक्ष ठेवणे तसेच इतरही काही कामांसाठी यांचा उपयोग होईल. हे उपग्रह पृथ्वीपासून 583 किमी उंचीवर सोडण्यात येणार आहेत. ‘सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजीज’ लिमिटेडने हे उपग्रह विकसित केले आहेत.
मॅरेथॉनमध्ये केनियाच्या किपचोगेचा विश्वविक्रम:
- केनियाच्या एलिऊद किपचोगेने मॅरेथॉनमध्ये दोन तास, एक मिनिट आणि 40 सेकंद असा विश्वविक्रम नोंदवत उल्लेखनीय कामगिरी केली.
- 33 वर्षीय माजी ऑलिम्पिक विजेत्या किपचोगेने डेनिस किमेटोने चार वर्षांपूर्वी नोंदवलेला दोन तास, दोन मिनिटे आणि 57 सेकंद हा विश्वविक्रम मोडला. त्याने येथे झालेल्या चुरशीच्या शर्यतीत 25 किलोमीटर अंतरापासून सातत्यपूर्ण वेग ठेवला व ही कामगिरी केली. येथे त्याने पहिले पाच किलोमीटर अंतर 14 मिनिटे 24 सेकंदांत पार केले, तर 10 किलोमीटरचा टप्पा त्याने 29 मिनिटे 21 सेकंदांत पूर्ण केला. त्याने 35 किलोमीटर अंतर एक तास 41 मिनिटांत पूर्ण केले होते.
- किपचोगेने 2013 मध्ये हॅम्बर्ग येथील मॅरेथॉन शर्यतीव्दारे या लांब अंतराच्या धावण्याच्या स्पध्रेला गांभीर्याने प्रारंभ केला. त्याने पाच हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत 2003मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेतील सुवर्ण, तर 2007मध्ये रौप्यपदक मिळवले होते. याच क्रीडा प्रकारात त्याने 2004 व 2008च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे.
- तसेच त्याने आतापर्यंत 11 वेळा विविध आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन शर्यती जिंकल्या आहेत. त्यामध्ये त्याने रिओ येथील ऑलिम्पिक स्पर्धा तसेच हॅम्बर्ग, रॉटरडॅम व शिकागो मॅरेथॉन शर्यतींचा समावेश आहे.
अहमदनगरमध्ये क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी:
- संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या खांद्यावरून मारा करण्याच्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) 15 सप्टेंबर रोजी नगर येथील के.के. रेंज या चाचणी क्षेत्रात यशस्वी चाचणी घेतल्याचे समजते. या क्षेपणास्त्राने अचूक लक्ष्यभेद केल्याचा दावा लष्कराच्या सूत्रांनी केला.
- संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी या यशस्वी चाचणीबाबत वैज्ञानिक आणि अधिकारी यांचे अभिनंदन केले आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी झाली असली तरी त्याच्या विकासाचे अनेक टप्पे अजून बाकी आहेत. हे क्षेपणास्र कमी वजनाचे आहे. त्याचा मारा खांद्यावरून करता येतो.
- अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मॅन पोर्टेबल अँटी टँक गाइडेड मिसाईलचा वापर पायदळ आणि पॅराशूट बटालियनला करता येईल. यावेळच्या चाचणीत या क्षेपणास्त्राने अधिक अचूकतेने लक्ष्यभेद केला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
- तसेच हे क्षेपणास्त्र डीआरडीओ आणि व्हीईएम टेक्नॉलॉजीज या कंपनीने विकसित केले आहे. हे क्षेपणास्त्र म्हणजे नाग क्षेपणास्त्राचाच एक प्रकार आहे.
दिनविशेष:
- 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
- स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म 17 सप्टेंबर 1879 मध्ये झाला.
- महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म 17 सप्टेंबर 1882 मध्ये झाला.
- सन 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा