18 August 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 ऑगस्ट 2018)
मानसिक आजारांनाही मिळणार विमा संरक्षण:
- मानसिक आरोग्य विधेयकात मनोविकारांसाठी विमा संरक्षणाचा धावता उल्लेख करण्यात आल्याने विमा कंपन्यांनी ते मनावर घेतले नव्हते. आता मात्र विमा क्षेत्राची नियामक ‘आयआरडीएआय‘ने 16 ऑगस्ट रोजी स्पष्ट आदेश जारी केल्यामुळे आता विमा कंपन्यांना मानसिक आजारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
- मानसिक आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून एकटय़ा भारतात सात कोटी मनोरुग्ण आहेत. प्रदीर्घ काळ चालणाऱ्या या उपचारासाठी लागणारा खर्च कुटुंबाच्या आवाक्याबाहेर जात असतानाही विमा कंपन्यांनी या आजाराला विमा संरक्षण नाकारले होते.
- मानसिक आरोग्य कायदा-2017 मध्ये त्याबाबत उल्लेख होता. तरीही प्रत्यक्षात कृती होत नव्हती. काही विमा कंपन्यांनी रस दाखविला असला तरी त्या भरमसाट प्रीमियम आकारण्याच्या तयारीत होत्या.
- विमा नियामकांनी 16 ऑगस्ट रोजी स्पष्ट आदेश जारी केल्यामुळे आता विमा कंपन्यांना मानसिक आजारांसाठी विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावे लागणार आहे.
म्यानमारच्या लष्करावर अमेरिकेचे निर्बंध:
- रोहिंग्यांचे शिरकाण करणे आणि त्यांना बेघर करून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याबद्दल अमेरिकेने 17 ऑगस्ट रोजी म्यानमारच्या लष्करी कमांडर्स आणि दोन लष्करी विभागांवर निर्बंध लादले.
- म्यानमारच्या राखीन प्रांतात झालेल्या हिंसाचारप्रकरणी लष्कर आणि सीमा सुरक्षा कमांडर्स आँग क्याव झॉ, खिन मौंग सोई, खिन हलेंग आणि थुरा सान लविन हे चौघे सूत्रधार असल्याचा आरोप आहे. तसेच या निर्बंधामुळे त्याचे जागतिक आर्थिक आणि व्यापारी संबंध संपुष्टात येणार असून, परदेशातील संपत्ती गोठविली जाणार आहे.
राज्यातील शाळांत होणार ‘स्वच्छ भारत पंधरवडा’ साजरा:
- स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत शालेय शिक्षण विभाग राज्यातील शाळांत ‘स्वच्छ भारत पंधरवडा‘ साजरा करणार आहे.
- स्वच्छता हे काम नसून ती एक चांगली सवय आहे. या भूमिकेतून 1 ते 15 सप्टेंबर या काळात स्वच्छ भारत पंधरवडा साजरा करण्याच्या सूचना केंद्रीय शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेही या संबंधित सूचना जारी केल्या आहेत.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. त्याच अनुषंगाने सप्टेंबर महिन्यातील 1 ते 15 हे दिवस ‘स्वच्छ भारत’ पंधरवडा साजरा होणार आहे.
- स्वच्छ भारत मिशनचाच एक भाग म्हणून ‘स्वच्छ भारत, स्वच्छ विद्यालय‘ हे मिशन संपूर्ण देशभरात सुरू आहे. राष्ट्रीय अभियानाला प्रतिसाद म्हणूनच महाराष्ट्रातही ‘स्वच्छ विद्यालय, स्वच्छ महाराष्ट्र‘ हे अभियान सुरू करण्यात आले आहे.
ज्येष्ठ विचारवंत फक्रुद्दिन बेन्नूर यांचे निधन:
- ज्येष्ठ विचारवंत, चिंतनशील लेखक प्रा. फकरूद्दिन तथा एफ.एच. बेन्नूर (वय 80 वर्षे) यांचे 17 ऑगस्ट रोजी निधन झाले.
- प्रा. बेन्नूर यांचा जन्म 25 नोव्हेंबर 1938 रोजी सातारा येथे झाला. 1966 ते 1998 पर्यंत त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य केले.
- कर्नाटक विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी हिंदू-मुस्लीम प्रश्न, मुस्लीम राजकारण, सामाजिक सौहार्द, महात्मा गांधी, कार्ल मार्क्स, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी विषयांवर 150 हून अधिक शोधनिबंध सादर केले होते. डॉ. आंबेडकर अकादमीची स्थापना केली होती. सन 2014 मध्ये त्यांनी इतिहास पुनर्लेखन समितीची स्थापना केली.
- गाजीउद्दीन रिसर्च सेंटरच्या वतीने 20 ऑगस्ट रोजी प्रा. बेन्नूर यांचा मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार होता. यावेळी त्यांच्या ‘मुस्लीम राजकीय विचारवंत आणि राष्ट्रवाद‘, ‘भारतीय मुस्लीम विचारक‘ यासह तीन पुस्तकांच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन होणार होते; आता हा सोहळा होणार नसल्याने दुख: व्यक्त होत आहे.
दिनविशेष:
- मराठा साम्राज्याचे पेशवे थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट यांचा जन्म 18 ऑगस्ट 1700 मध्ये झाला.
- सन 1824 मध्ये जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना झाली.
- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे सन 1942 मध्ये तिरंगा फडकावला.
- राजदूत, मुत्सद्दी राजकारणी ‘विजयालक्ष्मी पंडीत‘ यांचा जन्म 18 ऑगस्ट 1900 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा