18 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (18 जानेवारी 2019)
खो-खोमध्ये महाराष्ट्राला दुहेरी सुवर्णपदक:
- पुण्यातील शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने घवघवीत यश मिळवले.
- खो-खो क्रीडा प्रकारात 17 वर्षांखालील मुले व मुली अशा दोन्ही गटांत महाराष्ट्राने विजेतेपद मिळवले. त्याशिवाय टेनिस, बॉक्सिंगमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अंतिम फेरी गाठून किमान रौप्यपदक निश्चित केले आहे.
- खो-खो क्रीडा प्रकारात मक्तेदारी गाजवणाऱ्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे 17 वर्षांखालील (कुमार) मुले व मुली या दोन्ही विभागांत सुवर्णपदकाला गवसणी घातली. मुलींच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने अलाहिदा डावानंतर दिल्लीचे आव्हान 19-17 असे परतवले, तर मुलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने आंध्र प्रदेशवर 19-8 असा एकतर्फी विजय नोंदवला.
इस्त्रोने सॅटेलाईटशी जोडले रेल्वे इंजिन:
- रेल्वे प्रवाशांसाठी एक खूशखबर आहे. प्रवाशांना आता रेल्वेच्या स्थितीची माहिती सहज आणि अचूक मिळणार आहे. रेल्वेने आपले इंजिन इस्त्रोच्या उपग्रहाशी जोडले आहेत. त्यामुळे उपग्रहाकडून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेचे आगमन आणि प्रस्थानांची माहिती नोंदवणे सोपे जाणार आहे. यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसेल.
- रेल्वे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन वर्षांत ही यंत्रणा कार्यान्वित झाली आहे. रेल्वेच्या आगमन, प्रस्थानाची माहिती मिळणे आणि कंट्रोल चार्ट नोंदवण्यासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्त्रो) उपग्रहावर आधारित रिअल टाइम ट्रेन इन्फर्मेशन सिस्टिमचा (आरटीआयएस) वापर सुरू करण्यात आला आहे.
- ही प्रणाली 8 जानेवारीला माता वैष्णोदेवी-कटरा वांद्रे टर्मिनस, नवी दिल्ली- पाटणा, नवी दिल्ली-अमृतसर आणि दिल्ली-जम्मू मार्गावरील काही मेल आणि एक्स्प्रेस रेल्वेत अंमलात आली आहे.
- नव्या प्रणालीमुळे रेल्वेला आपल्या नेटवर्कमध्ये रेल्वेच्या संचालनासाठी नियंत्रण तसेच रेल्वे नेटवर्कला आधुनिक करण्यासाठी मदत मिळेल.
- इंजिनमध्ये आरटीआयएसयुक्त इस्त्रो व्दारा विकसित गगन जियो पोजिशनिंग सिस्टिमचा वापर केला जात आहे. यामुळे रेल्वेचा वेग आणि स्थितीबाबत माहिती मिळू शकते.
बायोपिकमधून उलगडणार नारायण मूर्तींची यशोगाथा:
- बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेंड आहे. गेल्या वर्षभरात ‘पॅडमॅन‘, ‘संजू‘, ‘सुरमा‘, ‘द अक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर‘ असे अनेक चित्रपट आले.
- तर या वर्षात ‘ठाकरे‘, ‘पीएम नरेंद्र मोदी‘, ‘मणिकर्णिका‘, ‘सूपर 30‘ असे अनेक मोठे बायोपिकही येणार आहेत. विशेष म्हणजे लवकरच इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्या जीवनावरदेखील बायोपिक येणार आहे.
- दिग्दर्शक संजय त्रिपाठी यांनी नारायण मूर्ती यांच्या जीवनावर आधारित चित्रपट काढण्याची इच्छा बोलून दाखवली होती. अखेर आठ महिन्यांनंतर मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे.
- तसेच या चित्रपटात सत्याचा विपर्यास करू नये ही साधी पण महत्त्वाची अट ठेवत मूर्ती यांनी चित्रपटाला संमती दिली आहे. आठ महिन्यांपूर्वी संजय त्रिपाठींनी नारायण मूर्ती यांना बायोपिकची कल्पना बोलून दाखवली होती. अनेक भेटीगाठी झाल्यानंतर मूर्ती यांनी बायोपिक काढण्यास मंजूरी दिली असल्याची माहिती मिळत आहे.
प्राप्तिकर परतावा मिळणार आता एका दिवसात:
- लवकरच तुम्हाला आयकर रिटर्न भरल्यानंतर सरकारकडून टॅक्स रिफंडसाठी 63 दिवस वाट पाहावी लागणार नाही. केवळ एका दिवसात तुम्हाला प्राप्तिकर परतावा मिळेल.
- कारण प्राप्तिकर विवरणपत्राची छाननी अवघ्या एक दिवसात करणाऱ्या एकात्मिक ‘ई-फायलिंग‘ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्याची प्रक्रिया केवळ एका दिवसात होईल.
- जवळपास 4 हजार 241 कोटी रुपयांची गुंतवणूक असलेल्या एकात्मिक ‘ई-फायलिंग‘ आणि केंद्रीकृत प्रक्रिया केंद्राच्या निर्मितीची जबाबदारी आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इंफोसिसकडे देण्यात आली आहे.
- सध्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्यासाठी सध्या 63 दिवसांचा कालावधी लागतो. पण 21 महिन्यांनंतर हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जर तुम्ही विवरणपत्र अचूक दाखल केले असेल तर एका दिवसात परतावा मिळेल. ही नवी सुविधा निर्माण करण्यासाठी 18 महिने लागणार आहेत, त्यानंतर आणखी तीन महिन्यांच्या चाचणीनंतर ते सुरू होईल.
- नवी प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली.
- नव्या प्रक्रियेमुळे प्राप्तिकराचे संकलन वेगाने करणे शक्य होईल. विवरणपत्रातील चुकांची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि झटपट होईल, असे ते म्हणाले.
दिनविशेष:
- न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये झाला होता.
- चंदन तस्कर वीरप्पन याचा जन्म 18 जानेवारी 1952 रोजी झाला होता.
- सन 1998 मध्ये मदनमोहन पूंछी यांनी भारताचे 28वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- नोबेल पारितोषिक विजेते अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना सन 1999 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा