19 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (19 सप्टेंबर 2018)
जगातील पहिली हायड्रोजन ट्रेन ट्रॅकवर:
- एका मर्यादेबाहेर होणारे कार्बन डाय ऑक्साइडचे उत्सर्जन ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलाला कारणीभूत आहे. वाहतुकीच्या साधनांमुळे कार्बन उत्सर्जनातून मोठया प्रमाणात प्रदूषण निर्माण होते.
- बस आणि गाडयांच्या तुलनेत ट्रेनमुळे कमी प्रदूषण होत असले तरी ट्रेनमधून होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण जास्तच आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी हायड्रोजनवर चालणाऱ्या ट्रेनची निर्मिती करण्यात आली आहे.
- हायड्रोजन ऊर्जेवर चालणारी ही ट्रेन संपूर्णपणे प्रदूषण मुक्त आहे. या ट्रेनमधून कुठल्याही प्रदूषणकारी घटकांची निर्मिती होणार नाही. या ट्रेनमध्ये लिथियम-आयन बॅटरीजचा वापर करण्यात आला आहे.
- मोबाइल फोन आणि अन्य घरगुती उपकरणांमध्ये ज्या बॅटरी वापरल्या जातात त्याच बॅटरीचा वापर या ट्रेनमध्ये करण्यात आला आहे. अलस्टोममध्ये या हायड्रोजन ट्रेनची निर्मिती करण्यात आली असून हायड्रोजनच्या सिंगल टँकवर ही ट्रेन 1 हजार किलोमीटरपर्यंत अंतर कापू शकते.
- डिझेल ट्रेन प्रमाणेच या ट्रेनमध्ये इंधनाची रचना आहे. ट्रेनची अतिरिक्त ऊर्जा लिथियम आयन बॅटरीमध्ये साठवून ठेवण्याची सुविधा आहे. प्रवाशांसाठी जगातील या पहिल्या हायड्रोजन ट्रेनची सेवा जर्मनीमध्ये सुरु झाली आहे.
सर्वांत श्रीमंत आमदारांत लोढा दुसऱ्या स्थानी:
- देशातील 3 हजार 145 आमदारांमध्ये सर्वाधिक उत्पन्न असलेल्या पहिल्या 20 आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चार आमदारांनी स्थान मिळवले आहे.
- सुमारे 34 कोटी वार्षिक उत्पन्न असणारे भारतीय जनता पक्षाचे आमदार मंगलप्रभात लोढा हे या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
- कर्नाटकातील कॉंग्रेस आमदार एन. नागराजू पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 157.04 कोटी रुपये आहेत.
- असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म (एडीआर) या संस्थेने ही पाहणी केली आहे. एडीआरने देशभरातील सर्व आमदारांचे सर्वेक्षण केले.
- सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे आमदार दिलीप सोपल सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक उत्पन्न 9.85 कोटी आहे.
- सिडकोचे अध्यक्ष आणि भाजपचे प्रशांत ठाकूर यांचे वार्षिक उत्पन्न 5.61 कोटी रुपये आहे. ते या यादीत 17व्या स्थानी आहेत.
- तसेच कॉंग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे वार्षिक उत्पन्न 4.56 कोटी उत्पन्नासह 20व्या स्थानी आहेत.
ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ चिपळूणकर यांचे निधन:
- ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ वि.वि. चिपळूणकर (वय 89) यांचे 18 सप्टेंबर रोजी निधन झाले. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झालेल्या चिपळूणकर यांनी राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्षे काम केले.
- विद्याधर विष्णू उर्फ वि.वि. चिपळूणकर यांचा जन्म 13 एप्रिल 1929 रोजी मुंबईत झाला. 1948 मध्ये शिक्षकी पेशा पत्कारलेले चिपळूणकर 1987 मध्ये राज्याच्या शिक्षण संचालकपदावरून निवृत्त झाले.
- शिक्षण संचालकपदाच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले. ‘चिपळूणकर समिती‘च्या अहवालामुळे सर्वपरिचित झालेल्या चिपळूणकरांनी ग्रामीण भागातील बुद्धिमान विद्यार्थ्यांसाठी तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या पाठिंब्याने शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली. ‘उद्धरावा स्वये आत्मा‘ हे विद्यानिकेतनचे ब्रीदवाक्य त्यांनीच सुचवले होते.
- माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य, बालभारतीचे संचालक, शिक्षण संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
- शिक्षण क्षेत्रातील बदल आणि आव्हानांवर त्यांनी विपुल लेखन केले. सातारा जिल्ह्यातील नायगावला दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमाला चिपळूणकर यांनी 1982 पासून अनौपचारिकपणे सुरवात केली होती.
अमेरिकन वस्तूंवरील आयात करास भारताची पुन्हा स्थगिती:
- अमेरिकेच्या 29 वस्तूंवर लादलेल्या वाढीव आयात कराच्या अंमलबजावणीस भारताने दुसऱ्यांदा स्थगिती दिली असून, 2 नोव्हेंबरपर्यंत या करांची अंमलबजावणी आता लांबणीवर पडली आहे.
- अमेरिकेने भारताविरुद्ध लावलेल्या वाढीव आयात कराला प्रत्युत्तर म्हणून भारत सरकारने जूनमध्ये या करांची घोषणा केली होती. 4 ऑगस्टपासून त्यांची अंमलबजावणी होणार होती.
- तथापि, या करांना 45 दिवस स्थगिती देऊन अंमलबजावणी 18 सप्टेंबरपर्यंत लांबणीवर टाकण्यात आली होती. या करांना आता पुन्हा एकदा स्थगिती देऊन अंमलबजावणी 2 नोव्हेंबरपर्यंत लांबविण्यात आली आहे.
- नव्या निर्णयाशी संबंधित अधिसूचना जारी करण्यात आली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 9 मार्च रोजी एक निर्णय घेऊन स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवर कठोर आयात कर लावले होते. या निर्णयाचा भारताला फटका बसणार असल्यामुळे भारताने प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेच्या 29 वस्तूंवर वाढीव आयात कर लावण्याचा निर्णय घेतला होता.
- अमेरिकेने लादलेल्या वाढीव आयात करातून भारतीय स्टील आणि अॅल्युमिनियमला सूट मिळावी, यासाठी भारताकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. जनरलाइज्ड सिस्टीम ऑफ प्रेफरन्सेस (जीएसपी) अंतर्गत आपल्या वस्तूंना निर्यातीचे लाभ मिळावेत, अशी भारताची मागणी आहे.
- तसेच 1976 साली करण्यात आलेल्या जीएसपी करारामुळे भारताच्या 3500 वस्तूंना करमुक्त अमेरिकी बाजार उपलब्ध झालेला आहे.
दिनविशेष:
- भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा 19 सप्टेंबर 1965 रोजी क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म झाला.
- सन 2000 मध्ये सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग 69 किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.
- गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना सन 2001 मध्ये जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.
- सन 2007 मध्ये टी-20 क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा