2 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (2 जानेवारी 2019)
भारताशी संबंध सुधारण्याबाबत ट्रम्प यांची सहमती:
- भारताशी संबंध सुधारण्याबाबत कायद्यावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली आहे. त्यामुले आता दोन्ही देशांच्या आर्थिक, व्यूहात्मक आणि संरक्षणविषयक संबंधांना कायद्याचे कोंदण लाभले आहे. त्यातून चीनच्या वाढत्या कारवायांना आळा घालण्याचा अमेरिकेचा हेतू आहे.
- चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर हक्क सांगत गेल्या काही वर्षांत त्या प्रदेशातील कारवाया वाढवल्या आहेत. त्यामुळे सागरी सीमांविषयक नियमांवर आधारित आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे.
- चीनच्या या कारवायांना आळा घालण्यासाठी अमेरिकेने भारत, जपान आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने नवी आघाडी उघडली आहे. त्यानुसार या चार देशांमध्ये चीनला आवर घालण्यासाठी आर्थिक, संरक्षण आणि व्यूहात्मक विषयांमध्ये सहकार्य केले जात आहे. या व्यवस्थेला आता अमेरिकेने कायद्याचा आधार घालून दिला आहे.
- एशिया रिअॅश्युरन्स इनिशिएटिव्ह अॅक्ट नावाचा कायदा ट्रम्प यांनी संमत केला असून त्याच्या कलम 204 अनुसार भारत आणि अमेरिकेमध्ये सहकार्य वाढीस लागण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.
- अमेरिकेचे सिनेटर कॉरी गार्डनर एड मार्के यांनी हे विधेयक मांडले होते. आता ट्रम्प यांनी त्यावर स्वाक्षरी केली असून त्याचे कायद्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे भारत आणि अमेरिकेतील संरक्षण सहकार्य वाढीस लागणार आहे.
अलाहाबादचे नामांतर करण्यावर केंद्राचे शिक्कामोर्तब:
- उत्तर प्रदेशात अलाहाबादमध्ये काही दिवसांवर कुंभ मेळा येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याच्या उत्तर प्रदेश सरकारच्या निर्णयाला हिरवा कंदील दाखवला आहे.
- अलाहाबादचे नामकरण प्रयागराज करण्यास हरकत नसल्याचे प्रमाणपत्र केंद्रीय गृह खात्याने दिले आहे. यामुळे अलाहाबाद जिल्ह्यातल्या केंद्राच्या अधिपत्याखालील सगळ्या संस्था, रेल्वे स्थानके, उच्च न्यायालय तसेच विद्यापीठांच्या नावामध्ये हा बदल होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
- गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये योगी आदित्यनाथांच्या सरकारने अलाहाबादचे नाव प्रयागराज करण्याचा प्रस्ताव मांडला होता. भारतामध्ये 14 प्रयाग नावाची शहरे होती पण सध्या अलाहाबाद नावाने ओळखले जाणारे प्रयाग सर्व प्रयागांचा राजा होते असे संशोधनांती आढळल्याचे सरकारच्या पत्रात म्हटले आहे.
- गृह खात्यातील एका वरीष्ठ अधिकाऱ्यानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘काही केंद्रीय संस्था अलाहाबाद नावानं ओळखल्या जातात. अन्य खात्यांनाही आता पत्र पाठवण्यात आली असून उत्तर प्रदेश सरकारच्या या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे. अन्य खात्यांकडूनही उत्तर प्रदेश राज्य सरकार संबंधित बदल करून घेईल,’ या अधिकाऱ्याने सांगितले.
अॅक्सिस बँकेच्या सीईओ ‘शिखा शर्मा’ सेवानिवृत्त:
- अॅक्सिस बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शिखा शर्मा निवृत्त झाल्या आहेत.
- शिखा शर्मा यांच्या जागी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर अमिताभ चौधरी यांची नियुक्ती झाली आहे.
- तसेच अमिताभ चौधरी यांची नियुक्ती 1 जानेवारी 2019 पासून लागू झाली आहे.
- चौधरी हे एचडीएफसी स्टॅंडर्ड लाईफ इन्श्युरन्स कंपनीचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. याआधी 8 डिसेंबरला अॅक्सिस बॅंकेने चौधरी यांची बॅंकेच्या संचालक मंडळावर अतिरिक्त संचालकपदावर नियुक्ती केली होती.
- 54 वर्षांच्या अमिताभ चौधरी यांनी 1987 मध्ये बॅंक ऑफ अमेरिकामधून आपल्या कॉर्पोरेट बँकिंगमधील करियरची सुरूवात केली होती. त्यांनी पिलानीच्या बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅंड सायन्समधून बी.टेकची पदवी मिळवली आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या आयआयएममधून एमबीएदेखील केले आहे.
आण्विक आस्थापनांच्या याद्यांचे हस्तांतरण:
- पाकिस्तान आणि भारत या देशांनी आपापल्या आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवाणघेवाण केली. भारत व पाकिस्तान यांच्यात 31 डिसेंबर 1988 रोजी आण्विक आस्थापना व सुविधा हल्ला प्रतिबंधक करार झाला होता. त्यानुसार दोन्ही देशांनी याद्यांची देवाणघेवाण केली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
- आण्विक आस्थापने व सुविधा यांची यादी पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयातील प्रतिनिधींना सादर केली. नवी दिल्ली येथे भारतीय आण्विक आस्थापने व सुविधा यांची यादी पाकिस्तान उच्चायुक्तालयातील प्रतिनिधींना सादर करण्यात आली.
- भारत व पाकिस्तान यांच्यात आण्विक 31 डिसेंबर 1988 रोजी कैदी व आण्विक आस्थापने यांच्या याद्यांची देवाणघेवाण करण्याचा करार झाला होता. त्या कराराची अंमलबजावणी दोन्ही देशांनी 27 जानेवारी 1991 रोजी केली होती. त्यानुसार दर वर्षी एक जानेवारीला आण्विक आस्थापने व सुविधांच्या याद्यांची देवाणघेवाण केली जाते.
- 1 जानेवारी 1992 पासून या याद्यांची देवाणघेवाण सातत्याने होत आहे. दोन्ही देशांतील व्दिपक्षीय संबंध खालावलेले असतानाही या प्रक्रियेत खंड पडलेला नाही.
राज्यात ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ बंधनकारक होणार:
- राज्यात 1 एप्रिलपासून नवीन वाहनांना उच्च सुरक्षायुक्त ‘हाय-सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बंधनकारक होणार आहेत. त्यामुळे ‘दादा’, ‘भाऊ’, ‘नाना’ अशी वाहन क्रमांकाची चालबाजी हद्दपार होणार आहे.
- केंद्रीय परिवहन विभागाने मोटर वाहन अधिनियमांतर्गत 2005 मध्ये देशभरातील एचएसआरपीएफ अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्येच तसा आदेश दिला होता. त्यानंतर 13 वर्षांनी राज्य परिवहन विभागाने एचएसआरपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
- शक्य उच्च सुरक्षायुक्त प्लेट बसविल्यानंतर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रत्येक वाहन पोलीस व परिवहन विभागाला सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ट्रॅक करता येणार आहे. महिला सुरक्षेसाठी असा निर्णय घेण्यात आला आहे.
- हॉट स्टॅम्पिंग व स्नॅप लॉक इंडिया लिहिलेले बारकोड आणि थ्रीडी होलोग्राम नव्या नंबर प्लेटवर राहील. आरटीओ वाहतूक पोलिसांनी बारकोड स्कॅन केल्यास वाहनाची पूर्ण माहिती मिळेल. याशिवाय दहा अंकी युनिक सीरियल नंबरही राहणार आहे.
- वाहनांच्या नंबर प्लेट कंपन्या बनवून देतील आणि विक्रेते क्रमांक करून देतील, असे केंद्रीय परिवहन मंत्रालयाने या महिन्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात स्पष्ट केले आहे. वाहन निर्मात्या कंपन्यांनी या निर्णयाला विरोध केला होता.
दिनविशेष:
- सन 1881 मध्ये लोकमान्य टिळकांनी पुणे येथे मराठा नियतकालिक सुरु केले.
- 2 डिसेंबर 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरु झाले.
- मध्य प्रदेश उच्च न्यायालयाची स्थापना 2 जानेवारी सन 1936 मध्ये झाली.
- राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद यांनी सन 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची स्थापना केली होती.
- सन 1985 मध्ये पुणे येथील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी निमित्ताने टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा