20 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
20 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (20 एप्रिल 2019)
नव्या पिढीतील मतदार राजासाठी ‘फ्लिपकार्ट’चा जागर:
- फ्लिपकार्ट या आघाडीच्या इ-कॉमर्समंचाने भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम राबविली आहे.
- नव्या मतदारांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट आपल्या नवीन चित्रफितीद्वारे करत असून मतदान केल्यानंतर काय घडते, याबाबत प्रेक्षकांना जागरुकदेखील करत आहे.
- समानतेच्या दिवसाबद्दल मत मांडताना, फ्लिपकार्टचे नाममुद्रा विपणन संचालक अपूर्व सेठी यांनी सांगितले की, सामाजिकदृष्टय़ा संबंधित विषयावर प्रभाव टाकणारा संवाद निर्माण करण्यासाठी आम्ही फ्लिपकार्ट समूहात नेहमीच प्रयत्नशील असतो. यापूर्वी लैंगिक समानतेच्या मुद्दय़ाला आम्ही पाठबळ दिले होते.
- तर आता देशाच्या लोकशाहीतच समाविष्ट असलेल्या नवीन समानतेच्या कथेमध्ये गुंतवण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मोहिमेच्या माध्यमातून, ग्राहकांशी आम्हाला जोडण्याची, मतभेद विसरून एकत्र येण्याची वेळ म्हणून निवडणुकांकडे पाहण्यासाठी गरज असल्याचे आम्हाला वाटते.
- मतदानाच्या समान अधिकारानुसार, मतदानाच्या दिवशी कोणाही व्यक्तीमध्ये कोणताही भेदभाव नसतो, यावर फ्लिपकार्टने या मोहिमेद्वारे भर दिला असल्याचे सांगण्यात आले.
Must Read (नक्की वाचा):
वेटलिफ्टर्सना ऑलिम्पिक पात्रतेची संधी:
- भारताची माजी जगज्जेती मीराबाई चानू हिच्यासह अन्य वेटलिफ्टर्सना टोक्यो 2020 ऑलिम्पिक पात्रता गाठण्याची संधी मिळणार आहे.
- 20 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करण्याचे ध्येय भारतीय वेटलिफ्टर्सनी बाळगले आहे.
- पाठीच्या दुखण्यामुळे तब्बल 9 महिने खेळापासून दूर राहावे लागलेल्या चानूने दमदार पुनर्रागमन करत ऑलिम्पिकसाठीच्या दावेदारीसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले होते.
- फेब्रुवारीत थायलंडमध्ये झालेल्या ईजीएटी चषक स्पर्धेत चानूने स्नॅच प्रकारात 82 तर क्लिन अॅण्ड जर्क प्रकारात 110 किलो वजन उचलत सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र ऑलिम्पिक पात्रता गाठायची असल्यास चानूला आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे.
- आंतररराष्ट्रीय वेटलिफ्टिंग महासंघाच्या नूतन नियमावलीनुसार चानूला 48 किलो वजनी श्रेणीतून 49 किलो गटात जावे लागले आहे.
- पुरुषांमध्ये भारताच्या सतीश शिवलिंगम याने वैयक्तिक कारणास्तव माघार घेतल्यामुळे सर्व आशा युवा ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता जेरेमी लालरिनुंगा याच्यावर आहेत.
- जेरेमीने नव्या नियमांनुसार 62 किलो गटातून 67 किलो गटात प्रवेश केला आहे. विकास ठाकूर 96 किलो वजनी गटातून तर अजय सिंग 81 किलो वजनी गटातून भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
राज्यातील तंत्रनिकेतन संस्थांना टाळे लागणार:
- घटत्या विद्यार्थी संख्येचा फटका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांप्रमाणेच तंत्रनिकेतन संस्थांनाही बसला आहे. त्यामुळे येत्या शैक्षणिक वर्षांत राज्यभरातील 27 तंत्रनिकेतन संस्थांना (पॉलिटेक्निक) टाळे लागण्याची शक्यता आहे.
- 27 संस्थांनी तंत्रशिक्षण संचालनालयाकडे संस्था बंद करण्यासाठीचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यात नागपूर विभागातील सर्वाधिक तंत्रनिकेतन संस्थांचा समावेश आहे.
- तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमांच्या संस्थांचे स्थलांतर, संस्था बंद करणे, नवीन पदविका सुरू करणे यासाठी ऑनलाइन प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार 27 तंत्रनिकेतन संस्थांनी संस्था बंद करण्यासाठीचे प्रस्ताव सादर केले.
- दहावीनंतर विद्यार्थ्यांचा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), द्विलक्ष्यी (बायफोकल) अभ्यासक्रमांकडे ओढा वाढू लागला आहे. त्यामुळे अभियांत्रिकीप्रमाणे तंत्रनिकेतन संस्थांतील जागा रिक्त राहू लागल्या.
- 2017 मध्ये तंत्रनिकेतनच्या प्रवेश प्रक्रियेतील 80 हजार 835 जागा आणि 2018 च्या प्रवेश प्रक्रियेत राज्यभरातील तंत्रनिकेतनच्या सुमारे 72 हजार जागा रिक्त राहिल्या.
- तंत्रनिकेतन संस्थेत विद्यार्थ्यांना शासकीय नियमानुसार शुल्क भरावे लागत असूनही जागा भरत नाहीत. परिणामी संस्था चालवणे अवघड झाल्याने संस्थाचालकांनी संस्था बंद करण्याचे प्रस्ताव सादर केले. या संस्था बंद झाल्यास तंत्रनिकेतन प्रवेश प्रक्रियेतील सुमारे पाच हजार जागा कमी होतील.
केंद्रावर उशिरा पोहोचल्यास सीईटी परीक्षा देता येणार नाही:
- राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बारावीनंतर विधि (लॉ) शाखेच्या पाच वर्षे पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी येत्या रविवारी, 21 एप्रिलला सीईटी परीक्षा ऑनलाइन घेण्यात येणार आहे.
- राज्यातील एकूण 36 तर महाराष्ट्राबाहेरील 13 शहरांत मिळून एकूण 77 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होईल. विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे, उशीर झाल्यास कोणत्याही परिस्थितीत वेळेनंतर प्रवेश दिला जाणार नाही, असे सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.
- देशभरातून 20 हजार 272 विद्यार्थी ही परीक्षा देणार असल्याची माहिती सीईटी सेलने दिली. यामध्ये महाराष्ट्रातून जवळपास 12 हजार तर महाराष्ट्राबाहेरील 8 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
- विद्यार्थ्यांनी स्वत:सोबत ओळखीच्या पुराव्यासाठी प्रवेशपत्रावरील उल्लेख असलेले मूळ ओळखपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.
- विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे. उशिरा आल्यास त्यांना केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
घटस्फोटानंतर कौटुंबिक हिंसाचार कायदा गैरलागू:
- घटस्फोटानंतर पती-पत्नी नाते संपुष्टात येते व त्या दाम्पत्यात कौटुंबिक संबंध राहत नाहीत. त्यामुळे घटस्फोटित दाम्पत्याला कौटुंबिक हिंसाचार कायदा लागू होत नाही व घटस्फोटित पत्नी या कायद्याखाली कोणताही दिलासा मागू शकत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती मुरलीधर गिरटकर यांनी दिला.
- साधना व हेमंत या दाम्पत्याचा 2008 मध्ये कुटुंब न्यायालयातून घटस्फोट झाला. साधनाने त्यानंतर 2009 मध्ये भरपाई व संरक्षण मिळण्यासाठी हेमंतविरुद्ध कौटुंबिक हिंसाचार कायद्याखाली न्यायालयीन लढा सुरू केला.
- कनिष्ठ न्यायालयात दिलासा न मिळाल्याने तिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयानेही तिची याचिका फेटाळून लावली.
- घटस्फोटानंतर दोघांतील संबंधच संपत असल्याने पत्नीशी कौटुंबिक हिंसाचार होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. साधनाने कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार दाखल केली, तेव्हा ती विभक्त झाली होती. परिणामी, कनिष्ठ न्यायालयांच्या निर्णयांत चुकीचे काही नाही, असेही हायकोर्टाने स्पष्ट केले.
दिनविशेष:
- प्रसिद्ध दर्यावर्दी सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी 1770 यासाली ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
- नाझी हुकूमशहा तसेच दुसर्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे अॅडॉल्फ हिटलर यांचा जन्म 20 एप्रिल 1889 रोजी झाला.
- सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा.ह.भ.प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा 20 एप्रिल 1896 रोजी माहीम, ठाणे येथे जन्म झाला होता.
- सन 1946 मध्ये राष्ट्रसंघ ही संस्था बरखास्त करून पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रूपांतर झाले.
- आंध्रप्रदेश मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म 20 एप्रिल 1950 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा