24 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
24 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 एप्रिल 2019)
तीन न्यायाधीशांची चौकशी समिती:
- सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध एका माजी महिला कर्मचाऱ्याने केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रार प्रकरणात लक्ष घालण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने न्या. एस.ए. बोबडे, न्या. एन.व्ही. रामण्णा आणि न्या. इंदिरा बॅनर्जी यांची एक समिती स्थापन केली. समिती स्थापन करण्याचा निर्णय ‘पूर्ण न्यायालयाने’ घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
- सरन्यायाधीशांनी सेवाज्येष्ठतेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेले न्या. एस.ए. बोबडे यांना याबाबत पुढील प्रक्रिया सुरू करण्यास सांगितल्याचे वृत्त देण्यात आले होते. त्यानुसार समिती स्थापन करण्याचा ठराव करण्यात आला आणि तो न्यायाधीशांमध्ये वितरित करण्यात आला, न्यायाधीशांनी तो मान्य केला आणि त्यानुसार हा निर्णय घेतला गेला.
- न्या. गोगोई यांच्या घरातील कार्यालयात गेल्या वर्षी ही महिला काम करीत होती. त्यावेळी हा प्रकार घडल्याचा या महिलेचा आरोप आहे. या लैंगिक शोषणाला आपण विरोध केला असता आपल्याला काढून टाकण्यात आले आणि दिल्ली पोलीस दलात हेडकॉन्स्टेबल असलेल्या माझ्या पती आणि दीरालाही निलंबित केले गेले, असा तिचा आरोप आहे.
Must Read (नक्की वाचा):
आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेत स्वप्ना बर्मनला रौप्यपदक:
- आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या आणि गतविजेत्या स्वप्ना बर्मन हिला आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात रौप्यपदकावरच समाधान मानावे लागले.
- मात्र पदकासाठीचा दावेदार समजल्या जाणाऱ्या जिन्सन जॉन्सनने दुखापतीमुळे पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीतून माघार घेतली.
- 22 वर्षीय स्वप्नाने सात क्रीडाप्रकारांमध्ये 5993 गुणांची कमाई करत दुसरे स्थान पटकावले. तिच्यावर उझबेकिस्तानच्या एकतारिना वोरनिना हिने 6198 गुण मिळवत मात केली. याच गटात भारताच्या पूर्णिमा हेमब्राम हिला 5528 गुणांसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
- स्वप्नाच्या रौप्यपदकामुळे भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्ण, चार रौप्य आणि पाच कांस्यपदकांची कमाई केली. तर महिलांच्या 3000 मीटर स्टीपलचेस प्रकारात पारुल चौधरी हिने 10.03.43 सेकंद अशी वेळ देत पाचवे स्थान प्राप्त केले.
तिसऱ्या टप्प्यात राज्यात 61 टक्के मतदान:
- लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 14 मतदारसंघांत 23 एप्रिल रोजी संध्याकाळी सहापर्यंत सरासरी 61.30 टक्के शांततेत मतदान झाल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली. उन्हाचा कडाका असतानाही पश्चिम महाराष्ट्रात उत्साहात मतदान झाले.
- औरंगाबाद, रायगड, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा व रत्नागिरी वगळता इतर 6 ठिकाणी मतदानाची टक्केवारी गेल्या वेळपेक्षा बरीच घसरली. सर्वाधिक कमी मतदान पुण्यात 52 टक्के झाले. ईव्हीएम बिघाडीच्या 600 वर तक्रारी आल्या.
- अहमदनगरमध्ये सर्वाधिक 500 तर कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघात 72 ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याने मतदानप्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली. औरंगाबाद, जळगाव, पुणे, सातारा, सांगली, मराठवाडा आणि रत्नागिरी जिल्ह्यांतही यंत्र बिघाडीच्या घटना घडल्या. त्यामुळे सहा वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी मतदार रांगेमध्ये मतदानासाठी ताटकळत उभे होते.
बजरंगची पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेत सुवर्ण कमाई:
- जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या बजरंग पुनियाने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत कमाल केली. अखेरच्या क्षणी पिछाडीवर असताना सलग 10 गुणांची कमाई करत बजरंगने पुन्हा एकदा आशियाई स्पर्धेच्या सुवर्णपदाकाला गवसणी घातली.
- पुरुषांच्या 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत बजरंगने कझाकस्तानच्या सायाटबेक ओकासोव्ह याच्यावर 12-7 अशी सरशी साधली. राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता बजरंग शेवटच्या 60 सेकंदांचा खेळ शिल्लक असताना 2-7 असा पिछाडीवर पडला होता.
- मात्र तीन वेळा कल्पक डाव आखत बजरंगने प्रतिस्पध्र्याला नामोहरम करत आठ गुणांची कमाई केली. अखेरच्या क्षणी पुन्हा एकदा आक्रमक खेळ करत दोन गुण पटकावून त्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.
- कझाकस्तानचा ओकासोव्ह पूर्णपणे दमला असल्याचा फायदा बजरंगने उठवला. बजरंगने मात्र तणावाच्या स्थितीतही संयम ढळू न देता अतिशय चाणाक्ष पद्धतीने प्रतिस्पध्र्याला अस्मान दाखवले. बजरंगची ऊर्जा वाखाणण्याजोगी होती. बजरंगचे हे या स्पर्धेतील दुसरे सुवर्णपदक तर पाचवे पदक ठरले. याआधी त्याने 2017 मध्ये सुवर्णपदक पटकावले होते.
जंगलातील नैसर्गिक पाणीस्रोताचा शोध:
- उन्हाळ्यात भकास झालेल्या वडाळी वनपरिक्षेत्रात पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधून काढण्यात विभागाला मधमाशांच्या अस्तित्वामुळे यश आले. यामुळे वन्यप्राण्यांना तहान भागवण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.
- वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर यांच्यासह वनरक्षक सुरेंद्र डहाके व निलेश करवाळे हे जंगल परिसरात गस्ती घालत होते. तेव्हा या वन कर्मचाऱ्यांनी मधमाश्यांच्या वास्तव्यातून पाण्याचा नैसर्गिक स्रोत शोधून काढला आहे. हे कर्मचारी आपआपल्या वनक्षेत्रात गस्त घालत असताना, त्यांना एके ठिकाणी दगडांवर मधमाश्यांना असल्याचे आढळले. त्यांनी जवळ जाऊन निरीक्षण केले असता, तेथे त्यांना ओलावा आढळला. त्यामुळे त्यांनी तेथील जागा खोदून मोठा खड्डा केल्यानंतर तेथे स्वच्छ पाणी आढळले. त्यांनी याबाबत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर त्याच ठिकाणी नैसर्गिक पाणवठ्याची निर्मिती करण्यात आली. आता वडाळी वनपरिक्षेत्रात पूर्वीचा एक नैसर्गिक पाणवठा आहे, त्यात आणखी दोन नैसर्गिक पानवठ्यांची भर पडली आहे.
दिनविशेष:
- 24 एप्रिल हा दिवस ‘भारतीय पंचायती राज दिन’ आहे.
- सन 1800 मध्ये जगातील सर्वोत्तम ग्रंथालय लायब्ररी ऑफ काँग्रेसची अमेरिकेत सुरुवात झाली.
- जगप्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू ‘सचिन तेंडुलकर’ यांचा जन्म 24 एप्रिल 1970 रोजी झाला.
- रसाळ लेखन करणारे कादंबरीकार रघुनाथ वामन दिघे यांचा जन्म 24 एप्रिल 1896 मध्ये झाला होता.
- सन 1990 मध्ये अंतराळात हबल ही दुर्बीण सोडण्यात आली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा