25 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
25 April 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 एप्रिल 2019)
अॅथलेटिक्स स्पर्धेत संजीवनी जाधवला कांस्यपदक:
- भारताच्या 4 बाय 400 मीटर मिश्र रिले चमूने आशियाई अजिंक्यपद अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई केली आहे, तर संजीवनी जाधवने 10 हजार मीटर शर्यतीमध्ये कांस्यपदक पटकावले आहे.
- 4 बाय 400 मीटर मिश्र रिले हा प्रकार अॅथलेटिक्स स्पर्धात यंदा प्रथमच समाविष्ट करण्यात आला आहे. भारताच्या मोहम्मद अनास, एम.आर. पूवम्मा, व्ही.के. विस्मया आणि अरोकिया रावजी या चमूने 3:16.47 मिनिटे वेळ राखून दुसरे स्थान मिळवले. या गटात बहरिनने सुवर्णपदक जिंकले. 400 मीटर शर्यतीतून पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेणारी हिमा दास या स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही.
- नाशिकच्या 22 वर्षीय संजीवनीने 32 मिनिटे आणि 44.96 सेकंद अशी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदवताना भारताच्या खात्यावर कांस्यपदक जमा केले. बहरिनची शिताये हॅबटेगेब्रेल (31:15.62 मि.) आणि जपानच्या हितो निया (31:22.63 मि.) यांनी अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्यपदकावर नाव कोरले.
Must Read (नक्की वाचा):
बालाकोटमध्ये सहापैकी पाच लक्ष्यभेद यशस्वी:
- पाकिस्तानच्या बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद प्रशिक्षण शिबिरावर 26 फेब्रुवारीला करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात या परिसरातील सहा इमारतींपैकी पाच लक्ष्ये टिपण्यात भारतीय वायुदलाच्या विमानांना यश आले होते, असे वायुदलाने या हल्ल्यांबाबत केलेल्या पुनरावलोकनात (रिव्ह्य़ू) दिसून आले आहे.
- या सविस्तर पुनरावलोकनात या हवाई मोहिमेची बलस्थाने, कमकुवत बाबी आणि त्यातून शिकलेले धडे यांच्यावर झोत टाकण्यात आला असल्याचे या प्रक्रियेशी संबंधित दोन सूत्रांनी सांगितले.
- लक्ष्याचा नेमका वेध घेण्यासाठी अधिक चांगली शस्त्रे हाताशी असायला हवी होती. त्यातून प्रचारयुद्धातही वरचष्मा राखता आला असता, हे या समीक्षेत मान्य करण्यात आले आहे. याचवेळी, धक्कातंत्र कायम राखणे, मोहिमेची सुरक्षितता, वैमानिकांची कुशलता आणि वापरलेल्या शस्त्रांची अचूकता याबद्दलच्या सकारातामक बाजूंचाही त्यात ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे.
आशियाई कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्राच्या राहुला कांस्यपदक:
- आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात भारतीय खेळाडूंनी दुसऱ्या दिवशीसुद्धा वर्चस्व कायम राखले आहे. अमित धानकरने रौप्यपदक, तर राष्ट्रकुल विजेत्या महाराष्ट्राच्या राहुल आवारेने कांस्यपदकाची कमाई केली.
- 2013 मध्ये 66 किलो गटात सुवर्णपदकाची कमाई करणाऱ्या अमितला 74 किलो फ्रीस्टाइल प्रकारात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम सामन्यात कझाकस्तानच्या डॅनियार कैसानोव्हाने त्याचा 5-0 असा पराभव केला.
- हरयाणाच्या 28 वर्षीय अमितने पात्रता फेरीत इराणच्या अश्घर नोखोडिलारिमीवर 2-1 असा निसटता विजय मिळवला. मग उपांत्यपूर्व सामन्यात जपानचा युही फुजिनामी जखमी झाल्यामुळे त्याला पुढे चाल मिळाली. त्यानंतर उपांत्य सामन्यात अमितने किर्गिझस्तानच्या इगिझ डहाकबेकोव्हाला 5-0 असे नमवले.
- गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 57 किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकणाऱ्या राहुलने 61 किलो फ्रीस्टाइल प्रकारातील कांस्यपदकाच्या लढतीत कोरियाच्या जिनचेओल किमचा 9-2 असा पाडाव केला.
निवडणुकीनंतर जाहीर होणार राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची यादी:
- 66व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावे लोकसभा निवडणुकीनंतर जाहीर होणार आहेत. दरवर्षी एप्रिल महिन्यात राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर होतात. पण यंदा लोकसभा निवडणूक असल्याने नावे जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
- राष्ट्रीय पुरस्कारांदरम्यान चित्रपटांना प्रोत्साहन देणाऱ्या राज्याचाही सन्मान केला जातो. मात्र निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.
- निवडणुकांमध्ये सर्व पक्षांना आणि उमेदवारांना समान संधी मिळणे अपेक्षित असते. अशा वेळी पुरस्कार जाहीर झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, त्यामुळे तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- वर्षभरात चित्रपटसृष्टीत सर्वोत्तम कामगिरी केलेल्यांना दरवर्षी 3 मे रोजी नवी दिल्ली येथील कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले जातात. यावर्षी पुरस्कार वितरणाची तारिख अद्याप जाहीर झालेली नाही.
- गेल्या वर्षी दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांना मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. तर ‘वीलेज रॉकस्टार्स’ या आसामी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला होता. ‘बाहुबली : द कन्क्लुजन’ला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले होते.
हृतिक रोशनचा संघर्ष सातासमुद्रापार:
- लाखो तरुणींच्या हृदयाचा ठोका चुकवणारा ‘ग्रीक गॉड’ अर्थात अभिनेता हृतिक रोशनने 2000 साली ‘कहो ना प्यार है’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
- या चित्रपटामुळे हृतिक रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या डॅशिंग लूक आणि डान्सिंग स्टाइलवर केवळ भारतीय तरुणीच नाही तर विदेशी प्रेक्षकही घायाळ आहेत. त्यामुळे त्याची लोकप्रियता आता पार सातासमुद्रापार पोहोचली आहे.
- मात्र एक सशक्त अभिनेता होण्यासाठी हृतिकने बराच संघर्ष केला असून अनेक वेळा त्याने त्याच्या संघर्षाबाबत खुलेपणाने चर्चा केली आहे. विशेष म्हणजे त्याच्या या संघर्षाची दखल एका आंतरराष्ट्रीय पुस्तकाने घेतली आहे.
- आंतरराष्ट्रीय आणि प्रसिद्ध असलेल्या बेन ब्रूक्स या पुस्तकामध्ये हृतिकने स्थान मिळविले आहे. ‘Stories for boys who dare to be different’ या पुस्तकात बीथोवेन, बराक ओबामा, फ्रॅंक ओसन यांसारख्या महान व्यक्तींसह ऋतिकच्या संघर्षांला चित्रित करण्यात आले आहे. नुकतेच हृतिकने सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली.
दिनविशेष:
- 25 एप्रिल हा दिवस ‘जागतिक मलेरिया दिन‘ म्हणून पाळला जातो.
- रेडिओचे संशोधक गुग्लिल्मो मार्कोणी यांचा जन्म 25 एप्रिल 1874 मध्ये झाला.
- स्वयंचलित वाहनांना नंबर प्लेट सक्तीचे करणारे न्यूयॉर्क हे सन 1901 मध्ये अमेरिकेतील पहिले राज्य बनले.
- सन 1953 मध्ये डीएनए रेणूचे अंतरंग उलगडून दाखवणारा वॉटसन आणि क्रीक यांचा शोध निबंध नेचर मासिकात प्रकाशित झाला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा