24 November 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (24 नोव्हेंबर 2018)
सातव्या वेतन आयोगाचा अहवाल चालू महिन्यातच मिळणार:
- सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचा अभ्यास करणाऱ्या समितीचा अहवाल या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेपर्यंत राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. त्यामुळे जानेवारी 2019 पासून राज्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळेल, अशी माहिती वित्त विभागातील उच्चपदस्थ सूत्राने दिली.
- मराठा आरक्षणासंबंधीचा अहवाल सादर झाल्यानंतर सातव्या वेतन आयोगासंबंधीचा अहवालाकडे 17 लाख अधिकारी-कर्मचारी आणि साडे सहा लाख निवृत्त कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. त्याच तारखेपासून राज्यातही आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात, यासाठी कर्मचारी आणि अधिकारी संघटनांनी आंदोलन केले. त्याची दखल घेऊन राज्य सरकारने आयोगाच्या शिफारशी कशा प्रकारे लागू कराव्यात, याचा अभ्यास करण्यासाठी गृह विभागाचे माजी अप्पर मुख्य सचिव के.पी. बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. या समितीने लवकर अहवाल सादर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती.
- वित्त विभागातून मिळालेल्या माहितीनुसार अहवालाचे काम जवळपास पूर्ण झाले असून, या आठवडय़ात किंवा उशिरातउशिरा महिनाअखेरपर्यंत अहवाल सादर होईल. त्यावर काम करायला एक महिना पुरेसा आहे. त्यानंतर 1 जानेवारीपासून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना आयोगाप्रमाणे वेतनवाढ देण्याची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
भारतातील 60 दशलक्ष मोबाइल सिम कार्ड बंद होणार:
- रिलायन्स जिओच्या स्पर्धेत टिकण्यासाठी भारतीय एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्यांनी किमान किमतीचे प्लान बाजारात आणले आहेत. यामुळे आता अनेकांना दोन-दोन सिम कार्ड वापरण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे आगामी सहा महिन्यांत अधिकचे सिम कार्ड वापरण्याचा ट्रेंड कमी होण्याची शक्यता आहे. त्यातून सुमारे 60 दशलक्ष सिम कार्ड बंद होतील, असे दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले.
- ऑगस्ट महिन्यातील मिळालेल्या आकडेवारीनुसार भारतात 1.2 अब्ज मोबाइलचे वापरकर्ते आहेत. यापैकी केवळ एक सिम कार्ड वापरणाऱ्यांची संख्या 730 ते 750 दशलक्ष इतकी आहे. उरलेल्या ग्राहकांकडे दोन-दोन सिम कार्ड आहेत.
- सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सीओएआय) महासंचालक राजन मॅथ्यूज यांनी सांगितले की, बंद होऊ शकणारे आणि नव्याने दिले जाऊ शकणारे सिम कार्ड यांचा एकत्रित विचार केल्यास आगामी सहा महिन्यांत दूरसंचार कंपन्यांची ग्राहकसंख्या 25 ते 30 दशलक्षांनी कमी होईल, असे मला वाटते.
- डेलॉइट इंडियाचे भागीदार हेमंत एम. जोशी यांनी सांगितले की, विविध कंपन्यांच्या प्लानमध्ये असलेला फरक आणि कंपनीकडून दिल्या जाणार्या सेवेचा दर्जा यांचा लाभ घेता यावा यासाठी लोक दोन-दोन सिम कार्ड वापरत असतात.
- आघाडीच्या तीन मोठ्या कंपन्यांचे दर आणि दर्जा आता समान झाल्यामुळे लोक एकच सिम कार्ड वापरण्यास प्राधान्य देतील, असा अंदाज आहे.
सोनिया चहल वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत:
- World Boxing Championship या स्पर्धेत भारताची महिला बॉक्सर सोनिया चहल हिने स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आणि किमान रौप्यपदक निश्चित केले.
- उपांत्य फेरीत सोनियाने उत्तर कोरियाच्या जो सोन व्हा हिचा 5-0 असा पराभव केला. 57 किलो वजनी गटात भारताच्या सोनियाने सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते.
- तिने प्रतिस्पर्धी बॉक्सरला सामन्यात डोके वर काढण्याची संधींचंज दिली नाही. त्यामुळे तिला एकतर्फी विजय मिळवता आला. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सोनिया चहल हिने कोलंबियाच्या येनी कास्टनाडा हिच्यावर 4-1 असा विजय मिळवला होता आणि उपांत्य फेरीत धडक मारली होती.
- तसेच अंतिम सामना अतिशय अटीतटीचा असेल, पण मी माझी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन, अशा भावना तिने व्यक्त केल्या.
फ्रान्समध्ये होणार राफेल डीलची चौकशी:
- राफेल करारावरुन नरेंद्र मोदी सरकारच्या अडचणी वाढलेल्या असताना आता भारता प्रमाणे फ्रान्समध्येही राफेल डीलचा मुद्दा तापत चालला आहे.
- फ्रान्समधील भ्रष्टाचारा विरोधात लढणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेने फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात राफेल डील विरोधात तक्रार दाखल केली आहे. या संस्थेने भारत आणि फ्रान्स सरकारमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या 59 हजार कोटीच्या राफेल कराराची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
- शेरपा या एनजीओने ही तक्रार दाखल केली आहे. बेकायद आर्थिक स्त्रोत, भ्रष्टाचार, कर चुकवेगिरी एकूणच आर्थिक गुन्ह्यांविरोधात आपण लढा देतो असा या संस्थेचा दावा आहे. फ्रान्सच्या मीडियापार्ट संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. फ्रान्सच्या राष्ट्रीय आर्थिक अभियोजक कार्यालयात ऑक्टोंबर अखेरीस ही तक्रार दाखल करण्यात आली.
- भारत आणि फ्रान्समध्ये कुठल्या नियमांच्या आधारावर 36 राफेल विमानांच्या विक्रीचा करार झाला तसेच डासू कंपनीने ऑफसेट भागीदार म्हणून अनिल अंबानींच्या रिलायन्स ग्रुपची निवड कशी केली? त्याची सुद्धा चौकशी करण्याची मागणी शेरपाने केली आहे.
- अनिल अंबानींच्या कंपनीकडे फायटर विमानांच्या निर्मितीचा कुठलाही अनुभव नाहीय तसेच हा करार होण्याच्या 12 दिवस आधी ही कंपनी स्थापन झाली आहे असे मीडिया पार्टने म्हटले आहे.
मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रेमानंद गज्वी:
- 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
- संमेलनाध्यक्षपदासाठी श्रीनिवास भणगे, अशोक समेळ, सुनील साकोळकर ही नावे चर्चेत होती. मात्र प्रेमानंद गज्वी यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. याची घोषणा 23 नोव्हेंबर रोजी माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या तालीम हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी केली.
- 99व्या नाट्य संमेलनाच्या स्थळासाठी परिषदेकडे 12 ठिकाणांहून प्रस्ताव आले. त्यापैकी नागपूर, लातूर, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा अंतिम टप्प्यात विचार करण्यात आला. वरील ठिकाणांपैकी एक नाव जाहीर होण्याची शक्यता आहे.
- नाट्य संमेलन समिती या ठिकाणांचा दौरा करून संमेलनाचे अंतिम ठिकाण लवकरच जाहीर करेल. संमेलन फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान होईल, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली.
दिनविशेष:
- 24 नोव्हेंबर हा दिवस ‘उत्क्रांती दिन‘ आहे.
- सन 1434 मध्ये थेम्स नदी पूर्णपणे गोठली होती.
- बुकर विजेत्या भारतीय लेखिका अरुंधती रॉय यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1961 मध्ये झाला.
- कवी विंदा करंदीकर यांची सन 1992 मध्ये साहित्यक्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणार्क पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली होती.
- समाजसेविकांना दिला जाणारा अहल्यादेवी होळकर पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील नेत्या आणि कार्यकर्त्या शांताबाई दाणी यांना सन 1998 मध्ये प्रदान झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा