25 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (25 जानेवारी 2019)
‘ट्रेन 18’ला विद्युत निरीक्षकांची मंजुरी:
- रेल्वेच्या महत्त्वाकांक्षी ‘ट्रेन 18’ला तीन दिवसांच्या तपासणीनंतर सरकारच्या विद्युत निरीक्षकांकडून मंजुरी मिळाली असल्याचे रेल्वे मंत्रालयातील सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या गाडीला येत्या आठवडाभरात हिरवा झेंडा दाखवण्याची शक्यता असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
- या बहुप्रतीक्षित गाडीने तिच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर आणि रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी तिला सशर्त मंजुरी दिल्यानंतर गेल्या सुमारे महिनाभरापासून ती रखडली होती.
- या अत्याधुनिक गाडीचे डिझाइन तयार करून तिचे उत्पादन करणाऱ्या रोलिंग स्टॉक विभागाच्या आक्षेपांनंतरही रेल्वे बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर ही गाडी विद्युत निरीक्षकांच्या तपासणीसाठी पाठवण्यात आली होती.
- या तपासणीचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठवण्यात येणार असून, त्यानंतर ही गाडी अधिकृतरीत्या केव्हा सुरू करायची याबद्दलचा निर्णय घेतला जाईल.
- 16 डब्यांची ही गाडी 97 कोटी रुपये खर्च करून 18 महिन्यांत तयार करण्यात आली असून, ती शताब्दी एक्स्प्रेसची जागा घेणार आहे. ही देशातील पहिली इंजिनरहित रेल्वेगाडी आहे.
नवीन वर्षातील इस्त्रोची पहिली मोहिम यशस्वी:
- भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने 24 जानेवारी रोजी रात्री मायक्रोसॅट आर आणि कलामसॅट या दोन उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले. या वर्षातील इस्त्रोची पहिलीच मोहिम यशस्वी ठरली आहे.
- मायक्रोसॅट आर हा 740 किलो वजनाचा लष्करी उपग्रह आहे. खास लष्करी उद्देशांसाठी या उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
- श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन रात्री 11.37 मिनिटांनी पीएसएलव्ही सी-44 रॉकेट दोन्ही उपग्रहांना घेऊन अवकाशाच्या दिशेने झेपावले.
- तर कलामसॅट हा विद्यार्थ्यांनी बनवलेला छोटा उपग्रह आहे. अवघ्या 1.2 किलो वजनाचा हा सर्वात हलका उपग्रह आहे.
- पीएसएलव्ही सी-44 ने मायक्रोसॅट आरला कक्षेत यशस्वीरित्या स्थापित केले. संरक्षण संशोधन संस्था डीआरडीओच्या प्रयोगशाळेत मायक्रोसॅट आर उपग्रहाची निर्मिती करण्यात आली आहे.
हार्दिक, राहुलवरील बंदी उठवली:
- कॉफी विथ करण या शो मध्ये महिलांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्यामुळे बंदीची शिक्षा भोगणारे हार्दिक पंड्या आणि के एल राहुल यांच्यावरील बंदी उठवण्यात आली आहे.
- CoA ने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. ही बंदी तत्काळ प्रभावाने उठवण्यात आली असून न्यूझीलंड दौऱ्यातील उर्वरित सामन्यांसाठी हे दोघे लवकरच टीम इंडियाच्या चमूत दाखल होणार आहेत.
- मात्र त्यांना चौकशीपासून पळता येणार नसून लोकपाल (होमडसमन) नेमल्यानंतर त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. पांड्या-राहुल प्रकरणी सुप्रीम कोर्टात 5 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे.
- हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल या दोघांनी शो मध्ये काही विधाने केली होती. त्यामुळे त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यानंतर BCCI च्या प्रशासकीय समितीने या प्रकरणात लक्ष घालत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
- तर अमिकस क्युरी पी एस नरसिंह यांच्याशी चर्चा केल्यानंतर CoA ने त्यांच्यावरील बंदी तत्काळ उठवण्याचा निर्णय घेतला. पांड्या आणि राहुल यांची चौकशी करण्यासाठी लोकपाल नेमण्याची गरज होती.
- मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून अद्याप लोकपाल नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे तात्पुरते हे निलंबन मागे घेण्यात आले आहे.
पुण्यातील हाजिकने बनवले समुद्र स्वच्छ करणारे जहाज:
- समुद्रातील प्रदुषण कमी करणे व समुद्रीय जीवांचे रक्षण करण्याच्या दृष्टिने एका बारा वर्षीय मुलाने एक जहाजाचे डिझायन बनविले आहे. ‘हाझिक काझी’ असे या मुलाचे नाव आहे आणि ‘एर्विस‘ असे नाव त्याने जहाजाला दिले आहे.
- एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत हाझिकने सांगितले, ‘मी काही लघुपट पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की, समुद्रीय जीवांवर प्रदुषण, कचरा याचा कसा परिणाम होतो. हे थांबविण्यासाठी काहीतरी करायला हवे, याची जाणीव मला झाली. जे मासे आपण जेवणात खातो, ते मासे प्लॅस्टिक खातात आणि या माश्यांद्वारे प्रदुषण आपल्या शरीरात पोहोचते. मानवी जीवनावर या प्रदुषणाचा परिणाम घातक असल्याने मला ‘एर्विस’ची कल्पना सुचली.’
- ‘एर्विस’ची कार्यप्रणाली सांगताना हाझिक म्हणाला, ‘सॉसर नावाची यंत्रणा जहाजाला लावली आहे. याद्वारे समुद्रातील कचरा शोषून तो एका युनिटमध्ये जमा केला जातो. ज्यानंतर पाणी, समुद्रीय जीव व कचरा यांना वेगळे केले जाते. या प्रक्रियेनंतर पाणी व समुद्रीय जीव समुद्रात सोडून दिले जातात. पाणी, समुद्रीय जीव व कचरा यांचे वर्गीकरण करण्याच्या दृष्टिने जहाजात सेंसर किंवा यंत्रणा बसविण्यात आली आहे. जी यातील फरक मशीनला कळवते व विभागणी करते. जमा कचऱ्याला पाच भागात विभागले जाते.’
काश्मिरी सैनिकास मरणोत्तर अशोक चक्र:
- गैरसमजाने पत्करलेला दहशतवादाचा मार्ग सोडून समाजात परत आलेल्या आणि नंतर लष्करात दाखल होऊन त्याच दहशतवादाचा पाडाव करण्यासाठी प्राणाहुती दिलेल्या भारतीय सैन्यातील लान्स नाईक नझीर अहमद वणी या बहाद्दर शिपायास अतुलनीय शौर्यासाठीच्या ‘अशोक चक्र‘ या सर्वोच्च पुरस्काराने मरणोत्तर गौरविण्यात येईल.
- लान्स नाईक वणी यांना गेल्या 15 नोव्हेंबर रोजी शोपियान येथे एका घरात दडून बसलेल्या सहा दहशतवाद्यांशी मुकाबला करताना हौतात्म्य आले होते. या चकमकीत समोरून बेछूट गोळीबार होत असूनही वणी यांनी त्या घरात घुसून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.
- 38 वर्षांचे लान्स नाईक वणी मूळचे कुलगाम जिल्ह्यातील अशमुजी येथील होते. तरुणपणी विखारी धार्मिक प्रचाराने प्रभावित होऊन ते दहशतवाद्यांमध्ये सामील झाले होते. मात्र, आपल्याच बांधवांविरुद्ध दहशतवादी मार्गाचा फोलपणा लक्षात आल्यावर ते परत फिरले.
- तर यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काश्मीरच्या या शूरवीरास ‘अशोक चक्र’ने सन्मानित करण्यात येईल. 26 जानेवारी रोजी राजपथावर होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती व तिन्ही सेनादलांचे सर्वोच्च अधिकारी रामनाथ कोविंद लान्स नाईक वणी यांचा हा मरणोत्तर सन्मान त्यांच्या विधवा पत्नीस सुपूर्द करतील.
दिनविशेष:
- 25 जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ आहे.
- 25 जानेवारी 2011 रोजी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत कायदा करून मंत्रालयाच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
- मॉस्को विद्यापीठाची स्थापना सन 1755 मध्ये झाली.
- सेवा सदन च्या संस्थापिका व सामाजिक कार्यकर्त्या ‘रमाबाई रानडे’ यांचा जन्म 25 जानेवारी 1862 रोजी झाला होता.
- सन 1971 या वर्षी हिमाचल प्रदेशला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला व ते भारताचे 18वे राज्य बनले.
- आचार्य विनोबा भावे यांना सन 1982 मध्ये भारतरत्न प्रदान.
- मोरारजी देसाई यांना सन 1991 या वर्षी भारतरत्न प्रदान.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा