29 January 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (29 जानेवारी 2019)
माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे निधन:
- देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांचे आज (29 जानेवारी) सकाळी दिल्लीत निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. - जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
- जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स.का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी नेतृत्व केले.
- आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले. जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचे सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
- तसेच जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे देशातील कामगारांसाठी प्राणपणाने झुंजणारा नेता हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे.
एटीपी टेनिस क्रमवारीत जोकोव्हिच अग्रस्थानी:
- सातव्यांदा ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम जेतेपदावर नाव कोरणाऱ्या नोव्हाक जोकोव्हिचने पुरुषांच्या एटीपी टेनिस क्रमवारीमध्ये आपले अग्रस्थान अधिक मजबूत केले. उपांत्यपूर्व फेरीआधीच पराभूत झालेल्या स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररच्या क्रमवारीत घसरण झाली असून तो सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
- स्पेनच्या राफेल नदालला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तरी त्याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. फेडररची तिसऱ्या स्थानावरून सहाव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
- अलेक्झांडर झ्वेरेव याने तिसरे स्थान पटकावले असून हुआन मार्टिन डेल पोट्रो चौथ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनने पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. जपानचा केई निशिकोरीने सातवे स्थान प्राप्त केले आहे.
पॅनकार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक:
- पॅन कार्ड आधार कार्डला अद्यापही लिंक केलेले नसल्यास आपल्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
- आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजले जाईल. प्रत्यक्ष कर संचालक मंडळांनी आधारला पॅन कार्ड लिंक करण्याची मर्यादा वाढवून 31 मार्च 2019 पर्यंत केली आहे.
- तसेच एकदा का आपले आधार कार्ड निष्क्रिय झाले, ऑनलाइन ITR फाइल करता येणार नाही. तसेच कुठूनही येणारा कर परतावाही अडकून पडू शकतो. त्याचबरोबर पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे.
प्रफुल्ल शिलेदार यांना साहित्य अकादमी पुरस्कार:
- साहित्य अकादमीतर्फे अनुवादासाठी दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचा मान यंदा प्रफुल्ल शिलेदार यांनी ज्ञानेंद्रपती यांच्या हिंदीतून अनुवादीत केलेल्या ‘संशयात्मा’ काव्यसंग्रहास मिळाला आहे.
- अकादमीने 2018 मधील अनुवादित साहित्यकृतींच्या पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 24 भाषांमध्ये अनुवाद झालेल्या पुस्तकांना पुरस्कार घोषित झाला आहे.
- राजवाडे लेखसंग्रह या विश्वनाथ राजवाडे लिखित मराठी निबंधांच्या कोंकणी अनुवादासाठी नारायण भास्कर देसाई यांनाही पुरस्कार जाहीर झाला आहे. मराठीच्या निवड मंडळावर अनंत भावे, प्रभा गणोरकर व डॉ. विलास खोले होते. कोंकणी अनुवादीत पुस्तकाचे नाव ‘राजवाडे लेखसंग्रह’ असे आहे.
- फ्रॉम गंगा टू ब्रह्मपुत्रा’च्या आसामी अनुवादासाठी पार्थ प्रतिम हजारिका यांना पुरस्कार घोषित झाला. पन्नास हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. अनुवादित पुस्तकांत मूळ हिंदी साहित्यकृती सर्वात जास्त आहेत. त्याखालोखाल बंगाली साहित्याचा अनुवाद करणार्यांचा आहे.
गिधाडांच्या संवर्धनातही मध्य प्रदेशची आघाडी:
- वाघांच्या मृत्यूचा फटका बसल्यानंतर गांभीर्याने त्याची दखल घेत मध्यप्रदेशच्या वनखात्याने उपाययोजना सुरू केल्या. त्याच बळावर आज व्याघ्रसंवर्धनासाठी या राज्याचे नाव घेतले जाते. देशातून नामशेष होत जाणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनातही या राज्याने आता आघाडी घेतली आहे.
- महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश दोन्ही राज्य शेजारी, पण वाघ असो वा गिधाडे मध्यप्रदेशने संवर्धनाचे घालून दिलेले उदाहरण महाराष्ट्र वनखात्यानेही आत्मसात करायला हवे. संवर्धनामुळेच या राज्यातील गिधाडांची संख्या गेल्या दोन वर्षांत तब्बल बारा टक्क्यांनी वाढली,पण महाराष्ट्रात त्याची संख्या तर दूरच राहिली. त्याच्या एकूणच आजच्या स्थितीची कुणाला माहिती नाही.
- ‘निसर्गाचा स्वच्छतादूत’ म्हणून गिधाडांची ओळख, पण या स्वच्छतादूताची महाराष्ट्रातील आजची स्थिती अतिशय वाईट आहे. व्याघ्र आणि पक्षी संवर्धनावर भर देताना हा स्वच्छतादूत वनखात्याकडूनच नाही तर पक्षीसंवर्धनाचे स्तोम माजवणाऱ्या पक्षीप्रेमींकडूनसुद्धा दुर्लक्षिला गेला आहे.
- निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेने (आययूसीएन) या पक्ष्याला लाल यादीत (रेडलिस्ट) टाकले. अतिशय संकटग्रस्त प्राणी, पक्ष्यांची नावे या यादीत टाकली जातात. त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी आराखडे तयार केले जातात. त्या पद्धतीचे करार केले जातात.
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताने अशा संकटग्रस्त प्रजातींना वाचवण्यासाठी झालेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. आययूसीएनचे सहा करार भारताने मान्य केले असून त्यातच या कराराचा समावेश आहे.
दिनविशेष:
- ओडिया साहित्यिक मधुसूदन राव यांचा जन्म 29 जानेवारी 1853 मध्ये झाला.
- सन 1861 मध्ये कॅन्सास हे अमेरिकेचे 34वे राज्य बनले.
- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4थे सरसंघचालक प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ रज्जू भैय्या यांचा जन्म 29 जानेवारी 1922 रोजी झाला होता.
- ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता भारतीय नेमबाज राज्यवर्धनसिंग राठोड यांचा जन्म 29 जानेवारी 1970 मध्ये झाला.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा