जसप्रीत बुमराह 3 July 2022 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) चालू घडामोडी (3 जुलै 2022)
ॲड. दीपक चटप यास ब्रिटीश सरकारची 45 लाखांची शिष्यवृत्ती :
दुर्गम भागातील शेतकरी कुटुंबातील ॲड. दीपक यादवराव चटप हा तरुण वकील ब्रिटीश सरकारचा ‘चेव्हनिंग ग्लोबल लिडर’ ठरला आहे. ब्रिटीश सरकारतर्फे देण्यात येणारी ‘चेव्हेनिंग’ ही जागतिक प्रतिष्ठेची 45 लाख रुपयांची शिष्यवृत्ती त्याला मिळाली. तो अवघ्या 24 व्या वर्षी ही शिष्यवृत्ती मिळवणारा देशातील पहिला तरुण वकील ठरला आहे. सामाजिक नेतृत्व करू इच्छिणाऱ्या जगभरातील युवकांना ब्रिटिश सरकारकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते. लंडनच्या ‘सोएस’ या जगातील सर्वोत्तम विद्यापीठात उच्चशिक्षणासाठी दीपकची निवड झाली आहे. त्याच्या शिक्षणाच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी ब्रिटीश सरकारने घेतली आहे. लखमापूर येथील रहिवासी असलेला दीपक ‘पाथ’ या सामाजिक संस्थेचा संस्थापक आहे. या माध्यमातून राज्यातील दुर्बल घटकांच्या मूलभूत प्रश्नांना कायद्याने वाचा फोडण्याचे विधायक काम करत आहे. ‘लढण्याची वेळ आलीय’ हा काव्यसंग्रह वयाच्या 18 व्या वर्षी तर ‘कृषी कायदे: चिकित्सा व न्यायाधिकरणाची गरज’ हे दीपकने लिहीलेले पुस्तक चर्चेत राहीले. बुमराहने रचला विश्वविक्रम :
2007 साली भारताचा स्फोटक फलंदाज युवराज सिंहने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला सहा चेंडूंमध्ये सहा षटकार लगावले होते. असाच काहीसा पराक्रम आज इंग्लंडमधील बर्मिगहॅम येथे सुरु असणाऱ्या पाचव्या कसोटीमध्ये पहायला मिळाला. ऋषभ पंत आणि रविंद्र जाडेजाने पहिला दिवस गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने फलंदाजी करताना केलेली भन्नाट कामगिरी चर्चेचा विषय ठरली. बुमराहची की विक्रमी कामगिरी ठरली. या पूर्वी हा विक्रम ब्रायन लाराच्या नावावर होता. त्याने 2003 साली पिटरसनच्या गोलंदाजीवर एका षटकात 28 धावा कुटलेल्या. सामन्यातील 84 आणि दुसऱ्या दिवसातील 11 व्या षटकामध्ये बुमराहने स्टुअर्ट ब्रॉडची जबरदस्त धुलाई केली. एक वाइड आणि एका नो बॉलच्या जोरावर बुमराहने या षटकामध्ये तब्बल 35 धावा कुटल्या. स्टुअर्ट ब्रॉडने घेतली कुंबळे आणि वॉर्नच्या क्लबमध्ये एंट्री :
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान सुरू असलेल्या एजबस्टन कसोटी सामन्यातील दुसरा दिवस स्टुअर्ट ब्रॉडसाठी संस्मरणीय ठरला. एकाच दिवशी आणि अवघ्या काही मिनिटांच्या फरकाने त्याने दोन चांगले-वाईट विक्रम आपल्या नावे केले. स्टुअर्ट ब्रॉडने आंतरराष्ट्रीय कसोटी कारकिर्दीत 550 बळींचा टप्पा गाठला. मोहम्मद शामी हा ब्रॉडचा 550वा बळी ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये 550 बळी घेणारा तो जगातील सहावा आणि इंग्लंडचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. ब्रॉडच्या अगोदर जेम्स अँडरसनने अशी कामगिरी केलेली आहे. दिनविशेष :
सन 1850 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीच्या स्वाधीन केला. महात्मा फुले यांनी 3 जुलै 1852 मध्ये दलित मुलांसाठी पहिली शाळा काढली. भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ सन 1855 मध्ये झाला. 3 जुलै 1884 मध्ये डाऊ जोन्स (DJIA) हा निर्देशांक सुरू झाला. सन 2006 मध्ये एक्स.पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.