5 March 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 मार्च 2019)
‘आयसीसी’क्रमवारीत भारतीय महिला अव्वल स्थानी:
- आयसीसीच्या एकदिवसीय क्रमवारीत भारतीय महिला खेळाडूने वर्चस्व राखले आहे. फलंदाजीच्या क्रमवारीत मराठमोळ्या स्मृती मानधनाने अव्वल स्थान कायम राखले आहे. तर गोलंदाजीमध्ये अनुभवी झुलन गोस्वामीने अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
- सात वर्षानंतर गोलंदाजी आणि फलंदाजीच्या क्रमवारीत भारतीय महिला खेळाडूंनी अव्वल स्थानवार वर्चस्व मिळवले आहे. याआधी 2012 मध्ये मिताली राज आणि झूलन गोस्वामी यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अव्वल स्थान मिळवले होते. आयसीसीने 4 मार्च रोजी क्रमवारी जाहीर केली.
- इंग्लंड विरोधात झालेल्या तीन सामन्याच्या मालिकेत झूलन गोस्वामीने निर्णायक कामगिरी करत भारताला 2-1 ने विजय मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता. तीन सामन्याच्या मालिकेत झूलनने आठ बळी घेतले होते. या कामगिरीचे बक्षीस झूलनला आयसीसी क्रमवारीत मिळाले आहे.
- शिखा पांडेच्या 12 अंकाचा फायदा झाला आहे. गोलंदाजीच्या क्रमवारीत शिखा सध्या पाचव्या स्थानावर पोहचली आहे. अव्वल दहा खेळाडूमध्ये दोन गोलंदाज असण्याचे नऊ वर्षात पहिल्यांदाच झाले आहे.
- 2010 मध्ये गोस्वामी आणि रूमाली धार यांनी अव्वल दहामध्ये स्थान मिळवले होते. 797 गुणांसह स्मृती मानधाना फलंदाजीच्या क्रमावारीत अव्वल स्थानावर विराजमान आहे.
रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा:
- चोऱ्या रोखणे, स्थानकांवरील प्रवाशांची अनावश्यक गर्दी व त्यामुळे होणारे अपघात कमी करणे, जेणेकरून स्थानकांवरील चेंगराचेंगरी यासह अन्य अनुचित प्रकार कमी होण्यास मदत होईल यादृष्टीने रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांप्रमाणे सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. संबंधित मार्गावरील रेल्वेगाडी सुटण्याच्या 20 मिनिटे अगोदर प्रवाशांना स्थानकात सोडण्यात येणार आहे.
- सोलापूरसह देशातील 100 स्थानके स्मार्ट केली आहेत. आता राज्यातील सोलापूरसह नागपूर, पुणे, मुंबई यासह अन्य महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचा यामध्ये समावेश करण्यात आल्याची माहिती रेल्वे सूत्रांकडून देण्यात आली.
- खासगी वाहतुकीचे दर वाढल्याने आणि प्रवास आरामदायी नसल्याने बहुतांश प्रवाशांचा कल आता रेल्वेकडे वाढल्याचे पाहायला मिळते. उन्हाळा असो की हिवाळा, पावसाळा रेल्वे प्रवाशांची गर्दी अद्यापही कमी झाली नाही.
- दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडत असल्याचे दिसून येते. परंतु, काही वेळा अनावश्यक गर्दी अथवा काही अफवांमुळे प्रवाशांची धावपळ होते आणि चेंगराचेंगरीचे प्रकार घडण्याची शक्यता असते. अशा घटनांवर नियंत्रण आणण्याकरिता आता रेल्वे बोर्डाकडून ठोस आराखडा तयार केला जात असल्याची माहिती खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी दिली.
पत्नीला सोडणाऱ्या ‘एनआरआय’चे पासपोर्ट रद्द:
- पत्नीला सोडून देणाऱ्या 45 अनिवासी भारतीयांचे (एनआरआय) पासपोर्ट सरकारकडून रद्द करण्यात आले असून, या सर्वांविरुद्ध लवकरच लुक आउट नोटीस (एलओसी) जारी करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिली.
- याप्रकरणी एक नोडल एजन्सी नियुक्त करण्यात आली असून, महिला व बालविकास मंत्रालयाचे सचिव राकेश श्रीवास्तव हे तिचे प्रमुख आहेत.
- आपल्या पत्नीला सोडून दिलेल्या अनिवासी भारतीयांची छाननी करून आतापर्यंत 45 जणांवर कारवाई करत त्यांचे पासपोर्ट रद्द केले आहेत. या फरार पतींविरुद्ध लुक आउट नोटीस जारी करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे मनेका गांधी यांनी सांगितले.
- दरम्यान, एनआरआय व्यक्तींनी सोडून दिलेल्या महिलांना न्याय मिळवून देण्यासंदर्भातील एक विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आल्याची माहितीही गांधी यांनी या वेळी दिली.
मंगळावर प्राचीन काळी पाणी असल्याचे भूगर्भशास्त्रीय पुरावे:
- मंगळाच्या पृष्ठभागावर प्राचीन काळात एकमेकांशी जोडणारी पाण्याची तळी होती. त्यातील पाच तळ्यांमध्ये जीवसृष्टीस आवश्यक असलेली खनिजेही होती हे सिद्ध करणारे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले असल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
- नेदरलँडसमधील उत्रेख्त विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, आताच्या काळात मंगळाची पृष्ठभूमी कोरडी वाटत असली तरी तेथे पूर्वी पाणी होते याच्या खुणा सापडल्या आहेत.
- गेल्या वर्षी युरोपीय अवकाश संस्थेच्या मार्स एक्स्प्रेस मोहिमेत मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा साठा सापडला होता. जर्नल ऑफ जिओफिजिकल रीसर्च-प्लॅनेटस या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या संशोधनानुसार प्राचीन काळात मंगळावर आताच्या प्रारूपांनी अंदाज केल्यापेक्षा जास्त प्रमाणात पाणी होते.
- तर त्याकाळात मंगळावर पाणी होते नंतर मंगळावरचे वातावरण बदलत गेले त्यामुळे पाणी पृष्ठभागाच्या तळाशी गेले असे उत्रेख्त विद्यापीठाचे फ्रान्सेस्को सॅलेस यांचे म्हणणे आहे. आमच्या अभ्यासात मंगळाच्या पृष्ठभागाखाली मोठय़ा प्रमाणात पाणी असल्याचे भूगर्भशास्त्रीय पुरावे मिळाले आहेत.
एअर इंडियाच्या विमानातही घुमणार ‘जयहिंद’चा नारा:
- एअर इंडियाच्या विमानातही आता जयहिंदचा नारा दिला जाणार आहे. कारण, तसा आदेशच कंपनीने काढला असून विमान प्रवासादरम्यान, सर्व कॅबिन क्रू आणि कॉकपिटमधील क्रू मेंबर्सना तशा सुचना देण्यात आल्या आहेत. तसेच याची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
- एअर इंडियाच्या नव्या नियमावलीनुसार, प्रवासादरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना विमानातील प्रत्येक जाहीर निवेदनानंतर थोडसे थांबून उत्साहात जयहिंदचा नारा देणे बंधनकारक असणार आहे.
- सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियामध्ये सध्या 3500 कॅबिन क्रू आणि 1200 कॉकपिट क्रू मेंबर्स आहेत. या सर्वांसाठी याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
- अश्वनी लोहानी यांनी एअर इंडियाच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदाची सुत्रे पुन्हा एकदा हाती घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यापूर्वी एअर इंडियात मुख्य व्यवस्थापकीय संचालकपदी असताना लोहानी यांनी 2016 मध्येही असाच आदेश काढला होता.
दिनविशेष:
- 5 मार्च 1851 रोजी जिओलॉजीकल सर्व्हे ऑफ इंडिया ची स्थापना झाली.
- 1997 यावर्षी संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा असलेले टपाल तिकीट प्रकाशीत झाले.
- धार्मिक जनजागृतीबद्दल दिला जाणारा जॉन एम. टेम्पलटन पुरस्कार पांडुरंगशास्त्री आठवले यांना सन 1997 मध्ये जाहीर करण्यात आला.
- रशियाकडून घेतलेल्या सिंधुरक्षक पाणबुडीचे मुंबईत सन 1998 मध्ये आगमन झाले होते.
- सन 2000 मध्ये कर्नाटकातील कैगा अणू वीजप्रकल्प पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या हस्ते देशाला समर्पित करण्यात आला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा