5 September 2018 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (5 सप्टेंबर 2018)
शिक्षक दिनानिमित्त गुगलची स्पेशल मानवंदना:
- शिक्षकांचे आपल्या आयुष्यात खास महत्त्व असते. आपल्या आयुष्याला आकार देण्याचे काम शिक्षक करतात. आई हा प्रत्येकाचाच पहिला गुरू असते. त्यानंतर शाळा आणि महाविद्यालयात आपल्याला शिकवणारे शिक्षक हे आपल्या आयुष्यातील वाटचालीतले सोबतीच असतात. अशाच शिक्षकांचा आदर राखत गुगलने एक खास डुडल तयार केले आहे.
- गुगलचे हे खास अॅनिमेटेड डुडल हे जगभरातल्या शिक्षकांसाठी अनोखे गिफ्टच ठरले आहे.
- जगभरातले सुप्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने अत्यंत खास पद्धतीने हे डुडल तयार केले आहे. GOOGLE या अक्षरांमध्ये G हा एक ग्लोब दाखवण्यात आला आहे. हा ग्लोब फिरतो आणि थांबतो. त्याला एक चष्माही लावण्यात आला आहे जो एखाद्या शिक्षकाप्रमाणेच भासतो.
- तसेच हा ग्लोब जेव्हा फिरून थांबतो तेव्हा त्यातून गणित, विज्ञान, अंतराळ, संगीत, खेळ या विषयांशी संबंधित चिन्हे बाहेर येतात. अत्यंत लोभस असे डुडल आपल्याला पुन्हा पुन्हा पाहण्याचा मोह होतो.
- दरवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या सन्मानार्थ हा दिवस शिक्षक दिवस म्हणून साजरा केला जातो. सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती होते.
- सन 1962 मध्ये जेव्हा ते राष्ट्रपती झाले तेव्हा लोकांनी 5 सप्टेंबर हा दिवस राधाकृष्णन दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. मात्र राधाकृष्णन यांनी या निर्णयाला विरोध केला आणि याऐवजी आपण देशातील सगळ्या शिक्षकांचा सन्मान म्हणून शिक्षक दिवस साजरा करू असा प्रस्ताव मांडला. तेव्हापासून शिक्षक दिन दरवर्षी 5 सप्टेंबरला साजरा केला जातो.
आयात निर्यातीवर भारत-अमेरिकेत महत्त्वपूर्ण चर्चा:
- इराणी खनिज तेलाच्या आयातीवर अमेरिकेचे निर्बंध व त्याचे भारतावर परिणाम, इंडो-पॅसिफिक सहकार्य व संरक्षण तंत्रज्ञानाबाबतचे करार हे मुद्दे भारत व अमेरिका यांच्या दरम्यान 6 सप्टेंबर रोजी होणाऱ्या टू प्लस टू संवादात उपस्थित केले जाणार आहेत.
- रशियाकडून एस 400 ट्रायम्फ हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी करण्याच्या 40 हजार कोटींच्या करारास अमेरिकेची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
- रशियावर निर्बंध असल्याने त्यांच्याकडून ही प्रणाली खरेदी करू नये असे अमेरिकेचे म्हणणे होते पण नंतर त्यातून भारताला सूट देण्यात आली होती. व्यापारवाढ, दहशतवादाशी मुकाबला, एच 1 बी व्हिसातील अन्याय हे मुद्देही उपस्थित केले जाऊ शकतात.
- परराष्ट्र मंत्रालयाने यावेळी मांडावयाच्या मुद्दय़ांची चाचपणी केली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन तसेच त्यांचे अमेरिकी समपदस्थ माइक आर पॉम्पिओ व जेम्स मॅटिस यांची 6 सप्टेंबर रोजी होणारी चर्चा टू प्लस टू संवादाअंतर्गत होत आहे. हा प्रस्ताव गेल्या वर्षीच तयार करण्यात आला, पण यापूर्वी दोनदा ही चर्चा लांबणीवर पडली होती.
- अमेरिकी प्रतिनिधी मंडळात ‘यूएस जॉइंट चिफ्स ऑफ स्टाफ जनरल’ हे जोसेफ डनफर्ड यांचाही समावेश आहे. सुषमा स्वराज या माइक पॉम्पिओ यांच्याशी तर निर्मला सीतारामन या जेम्स मॅटिस यांच्याशी 6 सप्टेंबर रोजी व्दिपक्षीय चर्चा करतील. नंतर शिष्टमंडळ पातळीवरची टू प्लस टू चर्चा घेण्यात येईल. दोन्ही बाजूचे बारा अधिकारी या चर्चेत सहभागी होणार आहेत. दुपारी स्वराज, सीतारामन, पॉम्पिओ हे सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील.
2020च्या ऑलिम्पिक अभियानाला प्रारंभ:
- सन 2020 मध्ये टोकियोला होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पध्रेच्या अभियानाला प्रारंभ झाला आहे. खरा प्रवास आता सुरू झाला आहे, असे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांनी सांगितले.
- आशियाई क्रीडा स्पध्रेतील पदकविजेत्या खेळाडूंना 4 सप्टेंबर रोजी केंद्र सरकारकडून रोख रकमेची बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले. वैयक्तिक प्रकारातील सुवर्णपदक विजेत्याला 40 लाख, रौप्यपदक विजेत्याला 20 लाख आणि कांस्यपदक विजेत्याला 10 लाख रुपयाचे इनाम देण्यात आले.
- ‘तुमच्या योगदानाबद्दल सर्व देशवासियांना अभिमान वाटतो आहे. तुमच्या कामगिरीचे सर्वानाच कौतुक आहे. परंतु हा प्रवास अद्याप संपलेला नाही,’ असे राठोड यांनी सांगितले.
- भारताने आशियाई स्पर्धेत 15 सुवर्ण, 24 रौप्य आणि 30 कांस्य अशी एकूण 69 पदकांची कमाई केली. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंग राठोड यांच्या हस्ते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
भारतीय नेमबाज ओमप्रकाश मिठारवालचा सुवर्णवेध:
- भारतीय नेमबाज ओमप्रकाश मिठारवालने आयएसएसएफ जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेच्या 50 मीटर पिस्तूल प्रकारात प्रथमच सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली. याचप्रमाणे कनिष्ठ गटात आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता सौरभ चौधरी आणि अभिज्ञा पाटील यांनी 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक गटात कांस्यपदक पटकावले.
- भारताच्या खात्यावर 4 सप्टेंबर रोजी दोन पदकांची भर पडल्यामुळे याआधीची सर्वोत्तम कामगिरी मागे टाकली आहे. 12 वर्षांपूर्वी झाब्रेग येथे भारताने सहा पदके जिंकली होती.
- काही महिन्यांपूर्वी 23 वर्षीय ओमप्रकाशने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या 10 मीटर एअर पिस्तूल आणि 50 मीटर पिस्तूल प्रकारांमध्ये कांस्यपदके पटकावली होती. विश्व अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 564 गुण मिळवून अव्वल स्थान मिळवले. सर्बियाच्या डॅमिर मिकेसने (562 गुण) रौप्य आणि कोरियाच्या डाइमयुंग ली याने (560 गुण) कांस्यपदक पटकावले.
- 2014 च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक मिळवणाऱ्या जीतू रायने निराशा केली. 552 गुण मिळवणाऱ्या जीतूला 17वा क्रमांक मिळाला. सांघिक गटात मिठारवाल, राय आणि मनजीत (532) यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाला एकूण 1648 गुण मिळाले आणि त्यांना पाचवा क्रमांक मिळाला.
राज्यात मुद्रा कर्ज योजनेत विषमतेची दरी:
- रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत चालू वर्षांत आतापर्यंत 5 हजार 269 कोटी रुपयांचे कर्जवाटप करून महाराष्ट्राने देशात तिसरे स्थान पटकावले आहे. मात्र, कर्जवाटपातून विकसित आणि मागास जिल्ह्यांतील दरी अधोरेखित झाली आहे. कर्जवाटपाचा सर्वाधिक वाटा हा औद्योगिकदृष्टय़ा विकसित जिल्ह्यांनीच उचलल्याचे चित्र आहे.
- मुद्रा योजनेचा उद्देशच आर्थिक विषमता दूर करणे, हा असताना राज्यातील विशेषत: मागास जिल्ह्यांमध्ये योजना प्रभावीपणे राबवण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या. पण, योजनेविषयी माहितीच्या प्रसाराचा अभाव, कर्जवाटपाविषयी बँकांची उदासीनता, कर्जाची थकबाकी या सर्व बाबींचे परिणाम आता जाणूव लागले आहेत. मुद्रा योजनेअंतर्गत महाराष्ट्रात एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2018 अखेर 57 हजार 443 कोटी रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. एकूण 1 कोटी 14 लाख कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.
- देशातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी एप्रिल 2015 पासून मुद्रा योजनेची सुरूवात करण्यात आली. या योजनेत तीन प्रकार आहेत. शिशू गटात उद्योजकांना 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर गटात 50 हजार ते 5 लाखांपर्यंत आणि तरुण गटात 5 लाख ते 10 लाख रकमेचे कर्ज मंजूर केले जाते.
- देशात सर्वाधिक लघू आणि मध्यम उद्योजक हे ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठीचा हा सरकारचा उपक्रम असला, तरी ग्रामीण भागाकडेच दुर्लक्ष होत आहे.
दिनविशेष:
- 5 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय शिक्षक दिन तसेच आंतरराष्ट्रीय दान दिन म्हणून पाळला जातो.
- भारताचे दुसरे राष्ट्रपती, तत्त्वज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 मध्ये झाला होता.
- भाषा व इतिहास संशोधक, लेखक अनंत काकबा प्रियोळकर यांचा जन्म 5 सप्टेंबर 1895 मध्ये झाला.
- सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचा जन्म 5 सप्टेंबर 1928 रोजी झाला.
- सन 1984 मध्ये एस.टी.एस. 41-डी-स्पेस शटल डिस्कव्हरीने आपली पहिली अंतराळयात्रा पूर्ण केली.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा