28 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
28 February 2019 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (28 फेब्रुवारी 2019)
पुलवामा हल्ल्याबाबत सुषमा यांची चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा:
- पुलवामा आत्मघाती दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्या समवेत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत उपस्थित केला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात घुसून दहशतवादी छावण्यांवर हल्ले केले होते.
- स्वराज यांनी सांगितले, की आमच्या देशात दु:ख व संतापाचे वातावरण असताना चीनला भेट देत असून, पाकिस्तानने केलेला दहशतवादी हल्ला हा भयानक होता.
- पाकिस्तानच्या जैश ए महंमद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला होता, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 40 जवान या हल्ल्यात शहीद झाले होते. पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी हा हल्ला करण्यात आला होता.
- जैश ए महंमद ही संयुक्त राष्ट्रांनी प्रतिबंधित केलेली संघटना असून, पाकिस्तानने त्यांच्या बाजूने दहशतवाद्यांना पाठीशी घातले, त्यामुळे त्यांना हा हल्ला करणे शक्य झाले. पाकिस्तान दहशतवादी संघटनांना आश्रय देत आहे असे सुषमा स्वराज यांनी वँग यांना सांगितले. पुलवामा हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांनी एकमुखी निषेध केला असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
Must Read (नक्की वाचा):
लेडी सिंघम प्रिया सिंह यांची एनआयएमध्ये नेमणूक:
- लेडी सिंघम म्हणून ओळख असलेल्या पुणे शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांची राष्ट्रीय गुप्तचर यंत्रणा (एनआयए) दिल्ली येथे बदली करण्यात आली आहे. चार वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर त्यांची नेमणूक नवी दिल्लीतील एनआयएमध्ये करण्यात आली आहे.
- ज्योती प्रिया सिंह यांनी डेप्यूटेशनवर बदलीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर त्यांची या अर्जावरून दिल्लीत एनआयएमध्ये 4 वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे. 2008 बॅचच्या आयपीएस अधिकारी ज्योती प्रिया सिंह यांची लेडी सिंघम म्हणून ओळख आहे.
- तसेच त्यांनी कोल्हापूरमध्ये अतिरिक्त पोलीस अधिक्षक असताना छेडछाडप्रकरणी आलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करत एका राजकिय नेत्याविरोधात छेडछाडप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. एका दिवसात त्यांनी 40 रोडरोमीयोंना हिसका दाखवला होता.
- पुण्यात सध्या त्या सायबर आणि आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. कॉसमॉस बँकेवरील सायबर हल्ला प्रकरणाच्या तपास त्यांच्याकडे आहे. तसेच बीटकॉईन फसवणूक प्रकरणाच्या एसआयटीच्या त्या प्रमुख आहेत.
ISSF स्पर्धेत मनू भाकेर-सौरभ चौधरी जोडीला सुवर्णपदक:
- नवी दिल्लीत सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषकात भारतीय नेमबाज पुन्हा एकदा फॉर्मात परतले आहेत.
- 10 मी. एअर पिस्तुल (मिश्र) प्रकारात भारताच्या मनू भाकेर आणि सौरभ चौधरी जोडीने सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
- अंतिम फेरीत भारतीय जोडीने चीन आणि जपानच्या खेळाडूंची झुंज मोडीत काढली. विश्वचषकाला सुरुवात झाल्यांनंतर अपुर्वी चंदेला आणि सौरभ चौधरी यांनी पहिल्या दोन दिवसांमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती.
- मात्र त्यानंतर भारतीय नेमबाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. अखेरीस मिश्र प्रकारात आणखी एका पदकाची कमाई करत भारताच्या खेळाडूंनी दमदार पुनरागमन केले आहे. दोघांनीही अंतिम फेरीत 483.4 गुणांची कमाई केली.
संरक्षण क्षेत्रात केंद्र सरकारचा मोठा निर्णय:
- पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर घडामोडींना वेग मिळाला असून केंद्र सरकारने 2700 कोटींच्या शस्त्र खरेदीला तातडीने मंजूरी दिली आहे.
- नवी दिल्लीत पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीदरम्यान संरक्षण साहित्य खरेदीला मंजूरी देण्यात आली. दिल्लीत केंद्रीय संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत 2700 कोटी किंमतीचे संरक्षण साहित्य खरेदी करण्यास तातडीने मंजूरी देण्यात आली.
- भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक केल्यानंतर आता पाकिस्तानच्या विमानाने भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याचे समोर आले आहे.
- जम्मू-काश्मीरमधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी विमानाने घुसखोरी केली. यानंतर विमानतळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- लेह, जम्मू, श्रीनगर, पठाणकोट, अमृतसर विमानतळं हाय अलर्टवर असून सुरक्षेच्या कारणास्तव प्रवासी विमानांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
टॉप 10 जागतिक श्रीमंतांच्या यादीत ‘मुकेश अंबानी’:
- रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला. चीनमधील हरून रिसर्चने संपत्तीविषयक जाहीर केलेल्या अहवालानुसार, जगातील टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी यांचा समावेश झाला आहे. ते या यादीत 10 व्या क्रमांकावर आहेत.
- तर, अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस हे प्रथम क्रमांकावर आहेत. मुकेश अंबानी यांच्याकडे 54 अब्ज डॉलरची संपत्ती आहे. विशेष म्हणजे टॉप 10 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी हे संपूर्ण आशिया खंडातून एकमेव व्यक्ती आहेत. त्यांच्या संपत्ती 9 अब्ज डॉलर म्हणजेच 20 टक्क्यांनी वधारली आहे
- मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल 7 लाख 74 हजार 870.23 कोटी आहे. गेल्या महिन्यात कंपनीच्या बाजारभांडवलाने 8 लाख कोटींचा टप्पा पार केला होता. कंपनीत मुकेश यांचा 52 टक्क्यांचा हिस्सा आहे.
- देशांतर्गत श्रीमंत व्यक्तींचा विचार करता, हिंदुजा ग्रुपचे एस पी हिंदुजा (21 अब्ज डॉलर), विप्रोचे अझीम प्रेमजी (17 अब्ज डॉलर), सिरम इन्स्टिट्यूटचे सायरस पुनावाला (13 अब्ज डॉलर) हे अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत.
दिनविशेष:
- 28 फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ आहे.
- मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1897 रोजी झाला होता.
- भारताचे 10वे उपराष्ट्रपती ‘कृष्णकांत‘ यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1927 मध्ये झाला होता.
- सन 1928 मध्ये डॉ. सी.व्ही. रामन यांनी भौतिकशास्त्रातील लावलेल्या शोधला रामन इफेक्ट असे नाव देण्यात आले. यामुळे हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.
- वॅलेस कॅरोथर्स या शास्त्रज्ञाने नायलॉनचा शोध सन 1935 मध्ये लावला होता.
चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा