30 April 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (30 एप्रिल 2020)
मोदी सरकारचा मोठा निर्णय:
- केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून देशभरात वेगवेगळ्या राज्यांमध्ये अडकलेल्या स्थलांतरित कामगार, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना आपापल्या घरी जाता येणार आहे. गृहमंत्रालयाने अडकलेल्या या सर्वांना प्रवासाला परवानगी दिली आहे.
- केंद्रीय गृहमंत्रालयाने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. त्यांची ने-आण करण्याची व्यवस्था राज्य सरकारला करावी लागणार आहे.
- तर आपल्या आदेशात गृहमंत्रालयाने राज्यांना अडकलेल्या लोकांना इतर राज्यात पाठवताना कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यास सांगितलं आहे.
- तसेच आदेशाप्रमाणे या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्याआधी तपासणी केली जाणार असून करोनाची लक्षणं नसलेल्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे.
महाराष्ट्रतील ग्रामीण भागाच्या विद्युतीकरणासाठी कर्ज :
- महाराष्ट्रातील ग्रामीण भागाचे विद्युतीकरण करण्यासाठी आशियायी विकास बँकेने भारत सरकारला 2616 कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे.
- महाराष्ट्र हे देशात लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावरचे राज्य असून ग्रामीण भागात कृषी क्षेत्रामध्ये सर्वाधिक लोक अजूनही काम करतात.
- कृषी उत्पादनाला पाटबंधारे व वीज, पाणी यांच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे फटका बसत आहे. ग्रामीण भागात उच्च दाबाचा वीज पुरवठा करण्याची गरज असून महाराष्ट्रात नवीन वीज संजालातून वीज देण्यासाठी या कर्जाचा वापर केला जाणार आहे.
- या कर्जातून 33/11 केव्हीची 121 उपकेंद्रे सुरू करण्यात येणार असून 46,800 कि.मी.ची 11 किलोव्होल्टचे विस्तारित वीज संजाल सुरू करण्यात येणार आहे.
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची क्षमताही यात वाढवली जाणार आहे. महाराष्ट्र सरकार व ही कंपनी 703.1 दशलक्ष डॉलर्सच्या प्रकल्पातच 357.1 दशलक्ष डॉलर्सचा वाटा उचलणार आहे.
करोना निदानासाठी स्वस्त, जलद चाचणी विकसित :
- अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कमी किमतीची कोविड 19 निदान चाचणी शोधून काढली असून त्याचा फायदा लोकांच्या मोठय़ा प्रमाणात चाचण्या करण्यासाठी होणार आहे.
- तर या चाचणीचे नामकरण ‘सार्स सीओव्ही 2 डिटेक्टर’असे करण्यात आले असून ही चाचणी करणे व त्याचा अर्थ लावणे सोपे आहे, असे सॅनफ्रान्सिस्कोमधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी सांगितले.
- ‘नेचर बायोटेक्नॉलॉजी’ या नियतकालिकात याबाबत माहिती जाहीर करण्यात आली असून ही चाचणी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
- अन्न व औषध प्रशासनाने अजून या चाचणीला मान्यता दिलेली नाही, पण ती लवकरच मिळेल यात शंका नाही.
प्राध्यापक चार्ल शिऊ यांनी सांगितले की, यात क्रिस्पर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून ही अतिशय प्रगत चाचणी राहील. करोना विषाणूवर क्रिस्पर तंत्रज्ञानावर आधारित ही पहिलीच चाचणी आहे.
पन्नाशीपार पोलिसांना आता कार्यालयीन ड्युटी :
- राज्य पोलीस दलातील पन्नाशीवरील अधिकारी-अंमलदार आता रस्त्यावर बंदोबस्त किंवा नाकाबंदी ड्युटी करणार नाहीत. त्यांना कार्यालयातील सोयीचे काम करायचे आहे. कोरोनाच्या विषाणूचा पोलिसांमध्ये होत असलेल्या वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी पोलीस महासंचालंकानी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- तसेच आरोग्याच्या कारणास्तव रजा हवी असल्यास तातडीने ती मंजूर करावी, असे आदेश त्यांनी राज्यातील सर्व पोलीस घटकप्रमुखांना दिले आहेत.
- राज्य पोलीस दलातील शंभरहून अधिक अधिकारी -अंमलदाराना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या दुप्पटीहून अधिक जणांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. कोरोनामुळे चार पोलिसांचा बळी गेला आहे. त्यामुळे पोलीस दलही हवालदिल झाले आहे.
पंजाबमध्ये 17 मे पर्यंत कर्फ्यू :
- पंजाबमध्ये तीन मे नंतर आणखी दोन आठवडयांसाठी कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी बुधवारी ही घोषणा केली.
- उद्यापासून पंजाबमध्ये मर्यादीत प्रमाणात लॉकडाउनचे निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत. पंजाबमध्ये करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 300 पेक्षा जास्त असून 19 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
- “अजून काही काळासाठी लॉकाडाउनचे निर्बंध कायम ठेवणे आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या समितीचे रिपोर्ट तपासल्यानंतर कर्फ्यू दोन आठवडयांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला” असे सिंग यांनी सांगितले.
- तर लॉकडाउनमधून बाहेर पडण्याची रणनिती ठरवण्यासाठी ही तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे.
तापमान वाढ आणि करोनाच्या फैलावात घट :
- दिवसाच्या सरासरी तापमानात होत जाणारी वाढ आणि Covid-19 च्या फैलावाचे कमी होणारे प्रमाण या दोन गोष्टींचा काही ठराविक शहरांमध्ये परस्परांशी 85 टक्के संबंध आहे. नागपूरमधील नॅशनल एनवायरमेंटल रिसर्च इंजिनिअरींग इन्स्टिटयूटच्या (नीरी) अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.
- नीरीचा हा अभ्यास गणितीय मॉडेलवर आहे. नीरीने जागतिक आरोग्य संघटनेकडून Covid-19 चा डाटा आणि भारतीय हवामान विभागाकडून तापमानाची माहिती मागवून घेतली.
- तर सरासरी तापमान, आर्द्ता यांचा महाराष्ट्र-कर्नाटकात वाढणाऱ्या करोना रुग्णांच्या संख्येशी काय संबंध आहे याचा अभ्यास केला.
- महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातील तापमान, आर्द्ता तपासली गेली. या दोन राज्यांच्या सरासरी तापमानात 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा वाढ होण्यास सुरुवात झाल्यानंतर Covid-19 च्या रुग्ण संख्येमध्ये घट होण्यास सुरुवात झाली असा नीरीच्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. भारतातील उष्ण तापमान करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यामध्ये फायद्याचे ठरणार आहे.
कोरोनाच्या लढ्यात पोलीस कर्मचाऱ्यांना मिळणार ‘रिवार्ड’ :
- कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जीवावर उदार होऊन बंदोबस्तात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी ‘रिवार्ड’ दिला जाणार आहे.
- तर यात ड्युटीवर असताना दुर्दैवाने संबंधित पोलीस कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यास त्याला दहा हजार रुपये रिवार्ड म्हणून दिले जाणार आहेत.
- तसेच या रिवार्डची रक्कम पोलिस कल्याण निधीतून त्यांच्या खात्यात वर्ग केली जाणार असून आगाऊ रक्कम म्हणून एक लाख रुपये संबंधीत पोलिसांना बिगरव्याजी दिले जाणार आहे. अशी घोषणा सह पोलिस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी केली.
- आत्तापर्यंत शहर पोलिस दलात आठ जणांना कोरोनाची लागण झाली आहे, त्या सर्वांना हा रिवार्ड देण्यात येणार आहे.
पृथ्वीच्या जवळून गेले मोठे संकट :
- अंतराळातून रॉकेटच्या तिप्पट वेगाने जाणारा एक मोठा उल्कापिंड 1998 OR2 पृथ्वीच्या जवळून गेला आहे. या उल्कापिंडमुळे पृथ्वीला कोणताही धोका नव्हता. कारण हा उल्कापिंड 63 लाख किमीवरून पुढे गेला आहे.
- तर तो याआधी 12 मार्च 2009 मध्ये पृथ्वीपासून 2.68 कोटी किमी लांबीवरून गेला होता. आता घाबरायचे कारण नसल्याचे वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
- तसेच हा उल्कापिंड पृथ्वीच्या शेजारून यापुढेही जाणार असून त्याचा वेग पाहता तो 11 वर्षांनी पुन्हा येणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे पृथ्वीपासून 1.90 कोटी किमी असणार आहे.
- हा उल्कापिंड दर 11 वर्षांनी पृथ्वीजवळून जातो. भविष्यात हा उल्कापिंड 2031, 2042 आणि नंतर 2068 व 2079 मध्ये पृथ्वीजवळून जाणार आहे.
- यापैकी 2079 मध्ये हा उल्कापिंड पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. यावेळी त्याचे अंतर हे आतापेक्षा 3.5 पटींनी कमी असणार आहे. आज हा उल्कापिंड 63लाख किमी लांबून गेला आहे. 2079 मध्ये हा उल्कापिंड 17.73 लाख किमी अंतरावरून जाणार आहे. हे या उल्कापिंडाचे पृथ्वीपासूनचे सर्वांत कमी अंतर असणार आहे.
लॉकडाऊनंतर डोंबिवलीत होणार पासपोर्ट सेवा केंद्र :
- कल्याण लोकसभा मतदारसंघातील लाखो नागरिकांच्या सोयीसाठी मतदारसंघात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्र व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले असून अखेरीस डोंबिवली एमआयडीसी येथील पोस्ट ऑफिसची त्यासाठी निवड करण्यात आली आहे.
- तर सध्या सुरू असलेले लॉकडाउन उठवण्यात आल्यानंतर लवकरात लवकर हे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना कळवण्यात आले आहे.
- केंद्रातील मोदी सरकारच्या गेल्या कालखंडात दिवंगत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या कार्यकाळात देशभरात पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
- खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी तत्कालीन परराष्ट्रमंत्री दिवंगत सुषमा स्वराज यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून कल्याण लोकसभा मतदारसंघात डोंबिवली येथे पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यास मंजुरी मिळवली होती.
दिनविशेष:
- 30 एप्रिल हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन‘ म्हणून साजरा केला जातो.
- भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक ‘धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके’ यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता.
- माणिक बांडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये झाला.
- वर्ध्याजवळ महात्मा गांधींनी सेवाग्राम आश्रम स्थापना सन 1936 मध्ये केली.
- सन 1977 मध्ये 9 राज्यांमधील विधानसभा बरखास्त झाली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, संघटना काँग्रेस आणि भारतीय लोकदल या पक्षांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
- कलकत्त्यात 1982 या वर्षी बिजान सेतु हत्याकांड घडले होते.
View Comments
👍
👍👍