7 December 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
चालू घडामोडी (7 डिसेंबर 2020)
अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड यशस्वी :
- आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुळ्याची लागवड प्रथमच यशस्वी झाली असून त्यामुळे अवकाशवीरांना आता ताज्या मुळ्यांचा आस्वाद घेता येणार आहे.
- महिला अवकाशवीर केट रुबीन्स यांनी लागवड केलेल्या बियाण्यांना कोंब फुटून नंतर त्याचे रोप झाले व 30 नोव्हेंबरला मुळे तयार झाले आहेत.
- ऐतिहासिक अशी ही घटना मानली जात असून अवकाशस्थानकातील वनस्पती उद्यानात सूक्ष्म गुरुत्वाला मुळ्याची लागवड करण्यात आली होती.
- वनस्पती अवकाशात वाढवणे कठीण असते, त्यामुळे एका विशिष्ट कक्षात त्याची लागवड करून त्यावर एलइडीचा प्रकाश सोडला होता. त्याला नियंत्रित पद्धतीने पाणी, पोषके व खते तसेच ऑक्सिजन देण्यात आला.
- मुळ्याचे रोप परिपक्व होण्यास केवळ 27 दिवस लागतात त्यामुळे मुळ्याची लागवडीसाठी निवड केली आली होती. ते मुळे 2021 मध्ये पृथ्वीवर आणले जाणार आहेत.
- तसेच आतापर्यंत अवकाश स्थानकात कोबी, मोहरी, झिनिया पुष्प वनस्पती, आणि एका रशियन वनस्पतीची लागवड यशस्वी झाली आहे.
- अवकाशवीरांना ताजे अन्न मिळावे व तेथे वनस्पतींची वाढ कशी होते याचा अभ्यास करणे या हेतूने प्रयोग केले जात आहेत.
भारतातही लसवापरासाठी ‘फायझर’चा अर्ज :
- ‘फायझर’ची करोनाप्रतिबंधक लस भारतात वापरण्यासाठी कंपनीने औषध महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. ब्रिटनने या लशीला आधीच परवानगी दिली असून एखाद्या देशात परवानगी मिळालेली करोनावरची ती पहिली लस ठरली आहे.
- आता भारताने या लशीला परवानगी दिली तर ती येथेही उपलब्ध होईल, पण आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी या लशीची गरज नसल्याचे प्रतिपादन यापूर्वी केले आहे.
- तर आपल्याकडे 2—3 लशींची निर्मिती होत असताना या महागडय़ा लशीची खरेदी करण्यात स्वारस्य नसल्याचे त्यांनी म्हटले होते. ही लस साठवण्यासाठी उणे 70 अंश तापमान लागते.
- ब्रिटनमध्ये मंगळवारपासून फायझर लशीच्या मदतीने कोविड 19 लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.
- बहारिननेही या लशीला मान्यता दिली असून फायझरने भारतातही ही लस निर्यात करता यावी यासाठी औषध महानियंत्रकांकडे परवानगी मागितली आहे.
- नवीन औषधे व वैद्यकीय चाचण्या नियम 2019 मधील विशेष तरतुदीखाली फायझर कंपनीने परवानगीसाठी अर्ज केला आहे.
असा पराक्रम करणारा विराट एकमेव कर्णधार :
- भारतीय संघानं दुसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गड्यांनी पराभव करत तीन सामन्याची मालिका 2-0 च्या फरकानं खिशात घातली आहे.
- तर या विजायासह भारतीय संघाचा हा लागोपाठ दहावा विजय होता. भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं ही अतुलनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचा पराभव करत विराट कोहलीनं आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे.
- विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 सामन्याची मालिका जिंकली आहे.
- तसेच आतापर्यंत हा कारनामा कोणत्याही कर्णधाराला करता आलेला नाही. असा पराक्रम करणारा विराट कोहली पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे. विदेशात सर्वाधिक टी-20 जिंकण्याचा पराक्रमही विराटसेनेनं करुण दाखवला आहे.
कॅनडाकडून डॉ. विजया वाड यांचा सन्मान :
- कॅनडाच्या पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी राजपत्र असलेले गौरवपत्र वादळवाट या पुस्तकाच्या लेखिका आणि मराठी विश्वकोशाच्या माजी अध्यक्षा डॉ. विजया वाड आणि वादळवाट पुस्तकातील रमेश खानविलकर यांच्या व्यक्तिमत्त्वावर असल्याने त्यांच्या आई शारदा श्रीराम खानविलकर या दोघींचा मूळचे महाराष्ट्रीयन असलेले कॅनडातील उद्योगपती डॉ. विजय ढवळे यांच्यातर्फे लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या हस्ते एका कार्यक्रमात नुकताच सन्मान करण्यात आला.
- कॅनडाच्या पार्लमेंट हाऊसमध्ये आतापर्यंत फक्त चारच भारतीय लोकांचा सत्कार आणि सन्मान तेथील पंतप्रधानांनी केला आहे.
- तर त्यापैकी एक असलेले मनोहर जोशी म्हणाले की, कॅनडा देशाची राजमुद्रा असलेले गौरवपत्र डॉ. विजया वाड आणि शारदा खानविलकर यांना माझ्या हस्ते देताना कॅनडा सरकारने या दोन मातांबरोबर माझाही गौरव केला आहे. डॉ. विजय ढवळे यांच्यामुळे आज या दोन्ही महान विभूती मातांचा सत्कार करण्याचे भाग्य मला लाभले आहे. यावेळी रमेश खानविलकर हेही उपस्थित होते.
ब्रायन लाराच्या संघात विराट व बुमराहला स्थान :
- विंडीजचा माजी महान फलंदाज ब्रायन लाराने निवडलेल्या सध्याच्या काळातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये दोन भारतीय विराट कोहली व जसप्रीत बुमराह यांना स्थान मिळाले आहे.
- तर वर्तमान काळात वर्चस्व गाजवणाऱ्या अनेक खेळाडूंचा लाराच्या संघात समावेश आहे. संघात पाच गोलंदाज व पाच फलंदाजांचा समावेश आहे. पण, आश्चर्याची बाब म्हणजे या संघात पाकिस्तान, श्रीलंका, वेस्ट इंडिज यासारख्या संघातील खेळाडूंना स्थान मिळालेले नाही.
- तसेच या व्यतिरिक्त लाराने त्याच्या कारकिर्दीत खेळलेल्या सर्वोत्तम खेळाडूंचीही निवड केली आहे. त्यात सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग, जॅक कॅलिस, कुमार संगकारा, राहुल द्रविड, वसीम अक्रम, शेन वॉर्न, वकार युनिस, मुथय्या मुरलीधरन, ग्लेन मॅक् ग्रा आदींचा समावेश आहे,
दिनविशेष:
- 7 डिसेंबर हा दिवस ‘भारतीय लष्कर ध्वज दिन‘ तसेच ‘आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन‘ आहे.
- सन 1825 मध्ये बाष्पशक्तीवर चालणारे एंटरप्राइज हे भारतात आलेले पहिले जहाज होते.
- पहिला उच्चवर्णीय विधवा विवाह कोलकात्यात सन 1856 मध्ये झाला.
- स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू प्रमुख स्वामी महाराज यांचा जन्म 7 डिसेंबर 1921 मध्ये झाला.